ज्ञानेश भुरे
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तब्बल १५० खेळाडू त्यांचा मातृदेश सोडून अन्य देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्याच देशात जन्मलेले सर्व खेळाडू असणारे यंदा केवळ चार संघ आहेत. फ्रान्सचे ३७ आणि आफ्रिकन देशातून ५० हून अधिक खेळाडू अन्य देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. खेळाडूंच्या स्थलांतरित नियमाविषयी ‘फिफा’ची भूमिका कशी असते, याचा आढावा.
खेळाला सीमा नसते, हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून कसे सिद्ध होते?
अंगोलातील मिकांगो प्रांताला रक्तरंजित हिंसाचाराची मोठी पार्श्वभूमी आहे. हिंसाचाराच्या घटना वगळता या भागाला दुसरी ओळखच नव्हती. २७ वर्षांपासून हा प्रांत सरकार आणि फुटीरतावादी बंडखोरांच्या संघर्षात अडकून पडला होता. पण, या संघर्षमय भागाला एडुवार्डो कामविंगाने केवळ फुटबॉलच्या जोरावर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अंगोलातील कॅबिंडा शहरातील निर्वासित छावणीत कामविंगाचा जन्म झाला. कामविंगा दोन वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबाने देशातून पलायन केले आणि फ्रान्समध्ये निर्वासित झाले. कामविंगा फ्रान्समध्येच लहानाचा मोठा झाला. त्याला फुटबॉलची गोडी लागली. तो वयाच्या २०व्या वर्षी रेयाल माद्रिदकडून खेळला. त्यानंतर २३ नोव्हेंबरला त्याने फ्रान्सकडून विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले. असे जवळपास १५० खेळाडू आपला मातृदेश सोडून अन्य संघांकडून खेळत आहेत. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत अर्जेंटिना, ब्राझील, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया या चारच संघात त्यांच्या देशात जन्मलेले खेळाडू आहेत.
फ्रान्सकडून खेळणारे अन्य प्रमुख खेळाडू कोण?
कामविंगासारखे अनेक खेळाडू फ्रान्सच्या संघात आहेत. यातील बहुतेक खेळाडू हे एकतर आफ्रिकेत जन्मलेले आहेत, किंवा त्यांची मुळे आफ्रिकेतील आहेत. अशा स्थलांतरित खेळाडूंचा फ्रान्सला कायमच फायदा झाला. २०१८मध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या फ्रान्स संघाच्या विजयाचा शिलेदार किलियन एम्बापे हा मिश्र अल्जीरियन आणि कॅमेरूनियन पार्श्वभूमीतून आला आहे. त्याचप्रमाणे एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा या फ्रान्सच्या प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकावे लागले. मात्र, गेल्या काही वर्षांतील फ्रान्सच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कान्टे हा मूळ माली आणि पोग्बा गिनी देशाचा आहे.
विश्लेषण: फुटबॉलमधील युरोप, दक्षिण अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे आशियाई युग अवतरले का?
याबाबत ‘फिफा’चा नियम काय सांगतो?
दुसऱ्या देशांच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी ‘फिफा’ची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार एखादा खेळाडू २१ वर्षे वय होण्यापूर्वी आपल्या देशासाठी तीनपेक्षा अधिक स्पर्धात्मक सामने खेळला नसेल किंवा त्याच्या मूळ देशाकडून खेळला नसेल, तर त्याला अन्य देशाकडून खेळता येते. फुटबॉल खेळाची लोकप्रियताही अधिक असल्यामुळे अनेक खेळाडू संधी शोधण्यासाठी या नियमाला धरून दुसऱ्या देशांचा आधार घेतात.
फ्रान्सचेही खेळाडू अन्य देशांमधून खेळतात का?
दुखापतीमुळे फ्रान्स संघातील खेळाडू एकामागून एक बाहेर पडत असले, तरी त्यांना खेळाडूंची चिंता भासणार नाही. कारण, फ्रान्समध्ये खेळाडूंची कमतरता नाही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील फ्रान्स देश हा खेळाडूंचा सर्वाधिक निर्यातदार संघ म्हणून समोर आला आहे. फ्रान्सचे ३७ खेळाडू सध्या विविध नऊ देशांकडून खेळत आहेत. यातील ३३ खेळाडू आफ्रिकन देशांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. सेनेगल संघात नऊ खेळाडू हे फ्रान्समध्ये जन्मलेले आहेत. या खेळाडूंना अन्य कुठल्याही आफ्रिकन संघाने प्रवेश दिला नाही. ट्यनिशियात १०, कॅमेरून संघात ८, पोर्तुगाल, जर्मनी, स्पेन, कतार संघातील एकेक खेळाडू फ्रान्सचा आहे.
फ्रान्सला खेळाडूंची सर्वाधिक निर्मिती करणारा देश का मानतात?
मुंबईला ज्याप्रमाणे भारतातील क्रिकेटची पंढरी मानली जाते, तसेच काहीसे फ्रान्सचे आहे. आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेपेक्षा अधिक फुटबॉलपटू येथे तयार होतात. ज्याप्रमाणे मुंबईतील मैदाने क्रिकेटपटूंच्या उपस्थितीने भरलेली असतात, तशी येथील मैदाने ही फुटबॉलपटूंनी भरलेली दिसतात. याचे एक कारण म्हणजे फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेली कुटुंबे आपल्या मुलाने सधन खेळाडू बनावे याचाच ध्यास घेतात आणि दुसरे म्हणजे ही कुटुंबे जगण्यासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेतात. स्मार्ट फोनच्या युगातही फ्रान्समधील मुले मैदानावर खेळताना दिसतात. यातील अनेकांचा अव्वल खेळाडू बनण्याचा ध्यास असतो.
फ्रान्सनंतर कोणत्या देशातील खेळाडूंचा दबदबा दिसून येतो?
आफ्रिकन देशांमधील खेळाडूंना त्यांच्या देशातून खेळण्याची संधी मिळत नसली, तरी हे खेळाडू जगभरातील अन्य संघांवर प्रभाव टाकत आहेत. फ्रान्सनंतर आफ्रिकन देशातील सर्वाधिक खेळाडू विविध देशांतून खेळताना दिसतात. विश्वचषक स्पर्धेत खेळणारे सर्वाधिक ५० खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. ते विविध ११ संघांमध्ये पसरले आहेत. विशेष म्हणजे स्थलांतरित खेळाडूंना दिलेल्या वागणुकीवरून चार वर्षांपूर्वी टीका झालेल्या जर्मन संघात आठ आफ्रिकन वंशाचे खेळाडू आहेत. रशियात झालेल्या स्पर्धेत जर्मनीचे आव्हान लवकर संपुष्टात आले. तेव्हा संघातील तुर्की वंशाच्या मेसुट ओझिलवर पराभवाचे खापर फोडण्यात आले होते. निर्वासित खेळाडूंच्या समावेशामुळे पराभव झाला या मतप्रवाहामुळे जर्मनीत खळबळ उडाली होती.
अन्य कुठल्या देशात निर्वासित खेळाडूंचा समावेश?
केवळ फ्रान्स, जर्मनीच नाही, तर नेदरलँड्स, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया संघातून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंची मुळे ही कॅमेरून, सुदान, घाना, माली, गिनी, अंगोला, नायजेरिया, कांगो, आयव्हरी कोस्ट अशा देशांमध्ये जोडली गेली आहे. यातील बहुतेक खेळाडू निर्वासित म्हणून त्यांच्या दत्तक देशांकडून खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातील गारांग कुओल हे याचे उत्तम उदाहरण. कुओलचे कुटुंब दक्षिण सुदानमधून बाहेर पडले. सहा वर्षे ते इजिप्तमध्ये राहिले. तेथेच गारांगचा जन्म झाला. त्यानंतर कुओल कुटंब ऑस्ट्रेलियात आश्रयाला आले आणि त्यांचेच झाले. कुओलप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघातील थॉमस डेंग आणि आवेर माबिल खेळाडूंची कुटुंबे ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यापूर्वी दक्षिण सुदानमधूनच पळून आली होती.