लोकसत्ता टीम
विश्वचषक २०२२ फुटबॉल स्पर्धेचा परमोच्च क्षण नजीक आला आहे. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या दोन संघांमध्ये अंतिम लढत होत असून, ते या स्पर्धेतील सर्वोत्तम म्हणता येतील असे संघ आहेत. दोन्ही संघांना तिसऱ्या विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा आहे. तर फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यास उत्सुक आहे. पण अर्जेंटिनाच्या भात्यात लिओनेल मेसी नावाचा हुकमी एक्का आहे. त्याला सतत हुलकावणारी एकमेव ट्रॉफी मेसी जिंकणार, की अनुभवी फ्रान्ससमोर अपेक्षांच्या दडपणापायी अर्जेंटिना ढेपाळणार हे रविवारी रात्री स्पष्ट होईल. अर्जेंटिनाच्या संघात अनेक चपळ, युवा खेळाडूंचा समावेश आहे. परंतु अनुभवाच्या आघाडीवर फ्रेंच संघ सरस आहे. त्यामुळे ही लढत तुल्यबळ ठरते.
आजवरचे सामने काय सांगतात?
रविवारचा सामना या दोन संघांमधील १३वा सामना असेल. आजवरच्या १२ सामन्यांमध्ये अर्जेंटिनाने ६ वेळा बाजी मारली, फ्रान्स ३ वेळा विजेता ठरला. तर ३ सामने बरोबरीत सुटले. विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांची ही चौथी लढत ठरेल. १९३०मधील स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सला १-० असे पराभूत केले होते. १९७८मध्ये अर्जेंटिनाने २-१ अशी बाजी मारली होती. २०१८मध्ये हे संघ तिसऱ्यांदा आमने-सामने आले. पण बाद फेरीतील या दोघांमधली ती पहिलीच लढत होती, जी फ्रान्सने ४-३ अशी जिंकली.
विश्लेषण: मोरोक्कोची स्वप्नवत घोडदौड फ्रान्सने कशी रोखली?
दोन्ही संघांनी आजवर किती विश्वचषक जिंकले? किती वेळा ते उपविजेते ठरले?
दोन्ही संघांनी पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पर्धेत (१९३०) भाग घेतला. दोन्ही संघांनी आजवर प्रत्येकी दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे. अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६मध्ये अजिंक्यपद पटकावले. फ्रान्स १९९८ आणि २०१८मध्ये जगज्जेता ठरला. दोन्ही संघांचे पहिले जगज्जेतेपद ते त्या स्पर्धांचे यजमान असताना नोंदवले गेले. अर्जेंटिनाने आजवर ६ वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली – १९३०, १९७८, १९८६, १९९०, २०१४, २०२२. फ्रान्स ४ वेळा अंतिम फेरीत पोहोचला – १९९८, २००६, २०१८, २०२२.
सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी आतापर्यंत कोणी गाठली?
इटली (१९३४, १९३८), ब्राझील (१९५८, १९६२), नेदरलँड्स (१९७४, १९७८), अर्जेंटिना (१९८६, १९९०) आणि आता फ्रान्स (२०१८, २०२२) या संघांनी सलग दोन वेळा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तर जर्मनी (१९८२, १९८६, १९९०) आणि ब्राझील (१९९४, १९९८, २००२) या दोनच संघांना सलग तीन वेळा अंतिम फेरीत धडकण्याची करामत साधता आली. इटली (१९३४, १९३८) आणि ब्राझील (१९५८, १९६२) या दोनच संघांना आजवर जगज्जेतेपद राखता आले. फ्रान्सला ती करामत करण्याची संधी ६० वर्षांनी चालून आली आहे. अंतिम फेरीतील दोन्ही संघ साखळी टप्प्यात एकेकदा पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ. अर्जेंटिनाला सौदी अरेबियाने २-१ असे चकवले, तर फ्रान्सचा ट्युनिशियाकडून ०-१ असा पराभव झाला.
अर्जेंटिनाचे बलस्थान, कच्चे दुवे कोणते?
सौदी अरेबियाविरुद्ध पहिल्याच सामन्यात हार पत्करल्यानंतर अर्जेंटिनाने प्रत्येक सामन्यात किमान दोन गोल झळकावले. मेक्सिको, पोलंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स या संघांविरुद्ध त्यांनी २-० अशी आघाडी घेऊन वर्चस्व गाजवले. क्रोएिशियाविरुद्ध ते ३-० असे विजयी ठरले. पेनल्टी-शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सवर विजय मिळवला. या प्रकारात अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाच्या इतिहासात अत्यंत यशस्वी ठरलेला आहे. केवळ मेसीवर हा संघ गोलांसाठी अवलंबून नाही. त्यांच्याकडे तरुण आणि चपळ आघाडीपटू आहेत. अर्जेंटिनाच्या बचावफळीनेही या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेली आहे. पण मेसी, ओटामेंडी आणि डी मारिया वगळता अनुभवाची उणीव हा त्यांचा ठळक कच्चा दुवा ठरतो. आघाडी घेतल्यानंतर हा संघ बऱ्यापैकी ढेपाळतो आणि प्रतिस्पर्ध्यांना प्रतिहल्ल्यांची संधी देतो. ही उणीव विशेषतः नेदरलँड्सविरुद्ध अधोरेखित झाली. मेसीवर त्याच्या कारकीर्दीतली शेवटची ट्रॉफी जिंकून देण्याचे दडपण आहे. हे दडपण संपूर्ण संघाला जाणवू शकते.
फ्रान्सचे बलस्थान, कच्चे दुवे कोणते?
अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही फ्रान्सचा खेळ इतर बहुतेक संघांच्या तुलनेत सरस ठरला. गुणवत्ता आणि अनुभवाची समृद्धी हे त्यांच्या संघाचे वैशिष्ट्य आहे. एमबापे, ग्रिझमान, जिरूड आणि डेम्बेले या चार जणांचे एकत्रित हल्ले थोपवणे हे अर्जेंटिनाच्या बचावफळीसमोरील आव्हान ठरेल. विश्वचषक अंतिम सामन्यात चार वर्षांपूर्वी खेळल्यामुळे या संघाला इतक्या महत्त्वाच्या सामन्याचा अनुभव आहे. फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिए देशांप यांचे संयत मार्गदर्शन हाही या संघाचा महत्त्वाचा दुवा. मात्र लिओनेल मेसीसारख्या अवलियाला रोखण्यात भल्याभल्यांची भंबेरी उडते. फ्रान्सच्या बचाव फळीकडे आणि विशेषतः मधल्या फळीकडे असलेला चापल्याचा अभाव त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. इंग्लंड आणि मोरोक्को या दोन्ही संघांनी प्रतिहल्ले करून फ्रेंच बचावफळीला हैराण केले होते. मेसीला थोपवणे ही त्यांच्यासाठी सर्वांत खडतर कसोटी ठरेल.
FIFA World Cup: अर्जेंटिना आणि फ्रान्स वर्ल्डकपमध्ये कितीवेळा आलेत आमने-सामने, जाणून घ्या
‘मेसी फॅक्टर’ कितपत प्रभावी?
या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात मेसीने गोल केलेला आहे. उत्कृष्ट मैदानी गोल, अफलातून गोलसाह्य (असिस्ट) आणि आत्मविश्वासपूर्ण पेनल्टी किक ही मेसीच्या या स्पर्धेतील खेळाची वैशिष्ट्ये ठरतात. त्याला विश्वविजेतेपदाने जणू भारावून टाकले आहे. गतवर्षी कोपा अमेरिका जिंकल्यावर आपला संघ विश्वचषकही जिंकू शकेल, असा आत्मविश्वास त्याला वाटतो. परंतु त्याला रोखण्यात फ्रान्सचा संघ यशस्वी ठरला, तर अर्जेंटिनाची लय बिघडू शकतो. अर्थात त्याला रोखण्याच्या नादात किमान दोन-तीन खेळाडू गुंतून राहिल्यास, फ्रेंच बचावफळीला खिंडार पडू शकते. मेसी १०० टक्के आत्मविश्वासाने, ऊर्जेने, तंदुरुस्तीने खेळला, तर तो या सामन्यातील निर्णायक घटक ठरेल हे नक्की.