सिद्धार्थ खांडेकर
गेल्या १५ वर्षांत फुटबॉल जगतात सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेले दोन खेळाडू म्हणजे अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. फुटबॉलमधील अत्यंत प्रतिष्ठेचा वैयक्तिक पुरस्कार म्हणजे ‘बॅलन डी ओर’ अर्थात गोल्डन बॉल मेसीने ७ वेळा, तर रोनाल्डोने ५ वेळा पटकावला आहे. परंतु दोघांनाही फुटबॉलमधील सर्वोच्च पारितोषिक, अर्थात विश्वचषक फुटबॉल अजिंक्यपद पटकावता आलेले नाही. पुढील विश्वचषकापर्यंत मेसी ३९ आणि रोनाल्डो ४१ वर्षांचा होईल. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च कामगिरी करण्याची संधी कतार विश्वचषक स्पर्धेतच आहे.
विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी कशी?
मेसी आणि रोनाल्डो हे दोघेही पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धेत उतरत आहेत. दोघांनी जर्मनीत २००६मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपापल्या देशांतर्फे पदार्पण केले. सुरुवातीच्या दोन्ही स्पर्धांमध्ये (२००६, २०१०) दोघांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. २०१४मध्ये अर्जेंटिनाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली, त्यावेळी मेसीला जगज्जेता बनण्याची संधी चालून आली. पण अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला जर्मनीकडून ०-१ अशी हार पत्करावी लागली. त्या स्पर्धेत मेसीने ४ गोल केले आणि रोनाल्डोपेक्षा तो निश्चितच सरस ठरला. २०१८मध्ये मात्र रोनाल्डोने मेसीवर कुरघोडी केली. त्या स्पर्धेत त्याने ४ गोल केले, ज्यात स्पेनविरुद्धच्या हॅटट्रिकचा समावेश आहे. कतार स्पर्धेआधीच्या चार स्पर्धांचा एकत्रित विचार करता, मेसीने १९ सामन्यांत ६ गोल झळकावले, तर ५ गोलांसाठी पासेस (असिस्ट) पुरवले. रोनाल्डोने १७ सामन्यांत ७ गोल झळकावले तर २ गोलांसाठी पासेस (असिस्ट) पुरवले.
दोघांची शैली भिन्न आहे का?
आकडेवारीवर नजर टाकल्यास एक बाब स्पष्ट होते. ती म्हणजे, मेसी हा अधिक सांघिक खेळावर भर देतो. याउलट रोनाल्डोचा खेळ बराचसा वैयक्तिक स्वरूपाचा असतो. भरपूर उंची आणि शारीरिक ताकदीमुळे रोनाल्डोचा वावर अतिशय आत्मविश्वासपूर्ण असतो. याउलट लहान चणीचा मेसी वेगावर अधिक भर देतो. चपळ हालचाली करत पुढे सरकणे आणि कधी स्वतःहून गोल करणे, तर कधी गोलसाठी बहुमोल पासेस पुरवण्याचे काम करतो. रोनाल्डोचा खेळ बहुतांश वैयक्तिक असतो. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गोल करण्यासाठी सज्ज राहण्याचे कसब त्याच्या अंगी पुरेपूर आहे. प्रतिस्पर्ध्याच्या हाफमध्ये गोल करण्याची संधी कशी हेरायची हे रोनाल्डोला बरोबर कळते. याउलट मेसी तुलनेने संघ सहकाऱ्यांवर अधिक अवलंबून राहतो.
कोणती महत्त्वाची विजेतेपदे त्यांच्या नावावर?
दोघांनी आपापल्या देशासाठी खंडीय अजिंक्यपद मिळवलेले आहे. २०१६मध्ये रोनाल्डोच्या पोर्तुगालने युरो अजिंक्यपद पटकावले. तर २०२१मध्ये मेसीच्या अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. क्लब आणि देशासाठीच्या ट्रॉफींची तुलना केल्यास, मेसीच्या नावावर ३७ आणि रोनाल्डोच्या नावावर ३४ ट्रॉफी आहेत. यात युरोपियन चँपियन्स लीग तसेच ला लिगा, प्रिमियर लीग, सेरी आ या विजेतेपदांचा समावेश होतो. मेसीने केवळ ला लिगा आणि चँपियन्स लीग स्पर्धेतच अजिंक्यपदे पटकावलेली आहेत. याउलट रोनाल्डो अधिक लीगमध्ये खेळल्यामुळे विविध क्लबांकडून त्याने अजिंक्यपदे पटकावली.
विश्वचषकाचे महत्त्व का?
फुटबॉलमध्ये क्लब अजिंक्यपदांचा आणि वैयक्तिक पदकांचा कितीही बोलबाला असला, तर जगज्जेतेपदाचे महत्त्व सर्वाधिक आहेत. मेसी आणि रोनाल्डो ढीगभर क्लब अजिंक्यपदे मिळवतात, पण देशाला नावलौकीक मिळवून देण्यात कमी पडतात असा आक्षेप त्यांच्याविषयी नेहमी घेतला जातो. क्लब आणि विश्वचषक फुटबॉल या दोन्हींमध्ये चमकलेले मोजकेच खेळाडू आहेत. यांमध्ये ब्राझीलचे पेले, जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबाउर, इंग्लंडचे बॉबी चार्ल्टन, अर्जेंटिनाचे दिएगो मॅराडोना, फ्रान्सचा झिनेदिन झिदान, ब्राझीलचे रोनाल्डो आणि रोनाल्डिन्यो, स्पेनचे शावी हर्नांडेझ आणि आंद्रेस इनियेस्टा या काही नावांचा उल्लेख आवर्जून होतो. महान फुटबॉलपटू असूनही विश्वचषक जिंकू न शकलेल्यांमध्ये हंगेरीचे फेरेन्क पुस्कास, नेदरलँड्सचे योहान क्रायुफ, फ्रान्सचे मिशेल प्लॅटिनी यांचा समावेश होतो. मेसी आणि रोनाल्डोही यांतलेच.
या दोघांमध्ये अंतिम सामना होऊ शकतो?
हे दोघे महान खेळाडू आजवर विश्वचषक स्पर्धेत कधीही एकमेकांसमोर आलेले नाहीत. विद्यमान स्पर्धेत अर्जेंटिनाचा समावेश सी ग्रुपमध्ये तर पोर्तुगालचा समावेश एच ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे मेसी आणि रोनाल्डो परस्परांसमोर आलेच, तर अंतिम सामन्यातच येऊ शकतात. त्या दुर्मीळ क्षणाची प्रतीक्षा त्यांच्या असंख्य चाहत्यांना राहील.