What was Messi wearing when he lifted the World Cup trophy फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर रविवारी साकार झाले. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ ने पराभव करत ३६ वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. किलियन एम्बापेने हॅट-ट्रीक साधत फ्रान्सला विजय मिळवून देण्याचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला मात्र सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटनेच लागला. अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर चषक स्वीकारण्यासाठी मेसी जेव्हा मंचावर चढला तेव्हा त्याने त्याच्या आयकॉनिक जर्सीवर काळ्या रंगाचं एक कापड घातलेलं दिसलं. मात्र हे काळं कापड नेमकं काय होतं? ते त्याला कोणी आणि कशासाठी घातलं होतं. यासंदर्भात क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम असून याबद्दल गुगल सर्च केलं जात आहे. जाणून घेऊयात मेसीच्या याच चर्चेत असलेल्या काळ्या कापडाबद्दल…
मेसीने नेमकं काय परिधान केलं होतं?
मेसीने फिफाचे अध्यक्ष जेनीन एन्फॅण्टीनो आणि कतारचे राजा तमिम बील अहमद अल थानी यांच्या हस्ते विश्वचषक स्वीकारला. मात्र त्याआधी कतारच्या राजाने मेसीचा एक पारंपारिक कापड देऊन सन्मान केला. मेसीने एखाद्या पारदर्शक कोट प्रमाणे दिसणारा हा कपडा स्वीकारला आणि तसाच चषक स्वीकारुन तो मंचावरील आपल्या संघातील सहकाऱ्यांकडे गेला. मेसीला देण्यात आलेल्या कापडला बिश्त असं म्हणतात.
बिश्त म्हणजे नेमकं काय?
बिश्त हा अरब देशांमधील पुरुषांच्या पारंपरिक पोषाखाचा भाग आहे. मागील हजारो वर्षांपासून अरब देशांमध्ये हा कापडा मानाचं प्रतिक म्हणून वापरला जातो. आपल्याकडे जसा मान-सन्मान करण्यासाठी फेटा किंवा पगडी घालण्याची प्रथा आहे तशीच प्रथा या बिश्तसंदर्भात अरेबियन देशांमध्ये आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : अर्जेंटिना वि. फ्रान्स विश्वचषक फुटबॉल इतिहासातील सर्वांत रोमांचक अंतिम सामना ठरतो का?
खास कार्यक्रमांच्या दिवशी बिश्त परिधान केले जातात. यामध्ये लग्नसमारंभ, सणासुदी किंवा शुभ प्रसंगांचा समावेश होतो. या बिश्तचा अजून एक खास अर्थ आहे. सामान्यपणे हे बिश्त वरिष्ठ अधिकारी परिधान करतात. म्हणजेच हा कापड राजेशाही थाट, श्रीमंती, विशेष सोहळे यांच्याशी संलग्न मानपानाचा एक बाग आहे. पाश्चिमात्य जगामध्ये काळ्या रंगाची टाय घालून महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते तशाचप्रकारे बिश्त परिधान करुन अरब देशांमधील खास कार्यक्रमांना हजेरी लावतात.
स्थानिक पोषाख घालणं बंधनकारक असतं का?
या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यांबद्दल चर्चा होईल त्यावेळी मेसीने परिधान केलेला बिश्त हा नक्कीच वेगळा ठरेल. ३५ वर्षीय मेसी हा फुटबॉल जगतामधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मात्र त्याने परिधान केलेल्या या एका कापडामुळे जेव्हा जेव्हा या जेतेपदाची चर्चा होईल तेव्हा या बिश्तचीही चर्चा होईल.
नक्की वाचा >> अर्जेंटिना FIFA World Cup जिंकला अन् तिने मैदानात कॅमेरासमोरच टॉप काढला; Video Viral झाल्यानंतर…
चाहत्यांकडून टीका
मेसीची आयकॉनिक १० क्रमांकाची जर्सी आणि हातात विश्वचषक असा ऐतिहासिक फोटो या बिश्तमुळे काढता आला नाही अशी टीका अनेक चाहत्यांनी केली आहे. तसेच समलैंगिकांसाठी असलेले आर्मबॅण्डला कतारने विरोध केला मग अशाप्रकारे बिश्त मेसीला का देण्यात आलं याबद्दलही अनेकांनी सोशल मीडियावरुन आक्षेप घेतला. फिफाच्या नियमांनुसार धार्मिक भावना, प्रांतवाद, राजकीय भाष्य यासारख्या गोष्टींशी संबंधित झेंडे, फलक दाखवणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.