-संदीप कदम
कतार येथे सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठणारे बहुतांश संघ अपेक्षितच आहेत. मात्र, उपउपांत्यपूर्व फेरीत एका धक्कादायक निकालाचीही नोंद झाली. माजी विजेत्या आणि जेतेपदासाठी दावेदार असलेल्या स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. आता उपांत्यपूर्व फेरीतही चुरशीचे सामने होणे अपेक्षित आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठणारे आठ संघ कोणते आणि या सामन्यांमध्ये कोणाचे पारडे जड असेल याचा आढावा.
ब्राझील क्रोएशियाहून सरस ठरणार?
विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची सर्वाधिक जेतेपदे मिळवणारा ब्राझीलचा संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. उपउपांत्यपूर्व सामन्यात ब्राझीलने दक्षिण कोरियावर ४-१ असा विजय मिळवत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या वेळी त्यांच्यासमोर गतउपविजेत्या क्रोएशियाचे आव्हान असणार आहे. जपानने निर्धारित वेळेत क्रोएशियन संघाला बरोबरीत रोखले होते. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांनी जपानवर ३-१ असा विजय मिळवला. मात्र, ब्राझीलला नमवायचे झाल्यास क्रोएशियाला आपली कामगिरी उंचवावी लागेल. ब्राझीलकडे नेयमार, व्हिनिशियस ज्युनियर आणि रिचार्लिसनसारखे आघाडीपटू आहेत. हे खेळाडू सामन्याचे चित्र बदलण्यात सक्षम आहेत. दुसरीकडे, क्रोएशियाची मदार अनुभवी लुका मॉड्रिच, माटेओ कोव्हाचिच आणि मार्सेलो ब्रोझोव्हिच यांसारख्या मध्यरक्षकांवर असेल. आघाडीच्या फळीतील इवान पेरिसिचकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
नेदरलँड्सवर अर्जेंटिना वर्चस्व गाजवणार?
अर्जेंटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ आपल्या दिग्गज खेळाडूला विश्वविजयी निरोप देण्याचा प्रयत्न करेल. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर नेदरलँड्सचे आव्हान असेल. मेसी या स्पर्धेत चांगल्या लयीत आहे. त्याने चार सामन्यांत तीन गोल केले आहेत. नुकताच आपल्या व्यावसायिक फुटबाॅलमधील हजारावा सामना खेळणारा मेसी नेदरलँड्सविरुद्ध सामनाही जिंकवून देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. ऑस्ट्रेलियाला २-१ असे नमवून अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. अर्जेंटिनाला १९७८च्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची झाल्यास आपला खेळ आणखी उंचवावा लागेल. मेसीसह ज्युलियन अल्वारेझ, ॲन्जेल डी मारिया यांच्यावरही गोल करण्याची मदार असेल. दुसरीकडे, नेदरलँड्सने उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेवर ३-१ असा विजय मिळवत आगेकूच केली होती. त्यांची मदार डेन्झेल डम्फ्रिस, डेली ब्लिंड, कोडी गाकपो आणि मेम्फिस डिपे यांच्यावर असेल.
नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास
पोर्तुगालसमोर मोरोक्केचे आव्हान…
विश्वचषक स्पर्धेत मोरोक्को संघाने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. त्यांनी उपउपांत्यपूर्व सामन्यात शूटआऊटमध्ये स्पेनला ३-० असे नमवत धक्कादायक निकाल नोंदवला. त्यापूर्वी, साखळी फेरीत आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर त्यांनी गटात अव्वल स्थान मिळवले होते. दुसरीकडे, पोर्तुगालने स्वित्झर्लंडवर ६-१ अशा फरकाने विजय नोंदवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या संपूर्ण स्पर्धेत मोरोक्कोच्या बचावफळीने चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी एकही पराभव पत्करला नाही आणि यादरम्यान त्यांना एकच गोल खावा लागला. संघाच्या या कामगिरीत मध्यरक्षक हकीम झियेश, बचावपटू अश्रफ हकिमी यांनी चमक दाखवली. तर स्पेनविरुद्धच्या सामन्यात गोलरक्षक यासिन बोनोने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक पोर्तुगाल करणार नाही. दुसरीकडे, दक्षिण कोरियाविरुद्धचा पराभव सोडल्यास पोर्तुगालने चांगली कामगिरी केली आहे. तारांकित आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्वित्झर्लंडविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत अंतिम ११मध्ये सुरुवातीपासून स्थान मिळाले नव्हते. त्याच्या जागी गोन्सालो रामोसला संधी मिळाली आणि त्याने हॅटट्रिकची नोंद करत पोर्तुगालसाठी निर्णायक भूमिका बजावली. यासह मध्यरक्षक ब्रुनो फर्नांडेस, बर्नार्डो सिल्वा आणि बचावपटू पेपे यांचे योगदानही पोर्तुगालसाठी महत्त्वाचे असेल.
नक्की वाचा >> विश्लेषण: जपानच्या चमकदार कामगिरीचे रहस्य काय? जे-लीग फुटबॉल…!
इंग्लंड-फ्रान्स चुरस अपेक्षित…
उपांत्यपूर्व फेरीत गतविजेते फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. फ्रान्सची लय पाहता त्यांना रोखणे इंग्लंडपुढील मोठे आव्हान असेल. अखेरच्या साखळी सामन्यात ट्युनिशियाविरुद्धचा पराभव सोडल्यास फ्रान्सची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांचा आघाडीपटू किलियन एम्बापे आतापर्यंत स्पर्धेमध्ये सर्वाधिक पाच गोल झळकावत ‘गोल्डन बुट’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. इंग्लंडला सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास एम्बापेला रोखणे गरजेचे आहे. एम्बापेशिवाय ॲन्टोन ग्रीझमन, ऑलिव्हर जिरूड, उस्मान डेम्बेलेही प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यास सक्षम आहेत. त्यांची बचावफळीही भक्कम असल्याने इंग्लंडला चांगला खेळ करावा लागेल. दुसरीकडे, इंग्लंडनेही या स्पर्धेत अजूनपर्यंत पराभव पत्करलेला नाही. या सामन्यात संघाची मदार ही त्यांचा आघाडीपटू हॅरी केनवर असणार आहे. रहीम स्टर्लिंगच्या अनुपस्थितीत केनवरील जबाबदारी आणखी वाढणार आहे. यासह बुकायो साका, फिल फोडेन, जुड बेलिंगहॅम यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. युरोपमधील दोन आघाडीचे संघ या सामन्यात एकमेकांसमोर येणार असल्याचे फुटबॉल चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. मैदानात एम्बापे वि. केन असे द्वंद्वही पाहायला मिळेल.