-अन्वय सावंत
‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी अर्जेंटिनाचा संघ कतारमध्ये दाखल झाला, तेव्हा सर्वांना या संघाकडून केवळ एकच अपेक्षा होती. विश्वविजेतेपद. अर्जेंटिनाचा संघ गेले सलग ३६ सामने अपराजित होता. त्यातच आपला अखेरचा विश्वचषक खेळणारा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसी पूर्ण लयीत असल्याने चाहत्यांना अर्जेंटिना संघाकडून असलेल्या अपेक्षा अधिकच वाढल्या. मात्र, अर्जेंटिनाला पहिल्याच सामन्यात तुलनेने दुबळ्या सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामागे काय कारणे होती आणि अर्जेंटिनासाठी बाद फेरीचा मार्ग किती खडतर असू शकेल, याचा आढावा.
सामन्यात काय घडले?
अर्जेंटिनाने सामन्याची आक्रमक सुरुवात केली होती. दहाव्याच मिनिटाला मेसीने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करून अर्जेंटिनाला आघाडीवर नेले होते. मध्यंतरापर्यंत अर्जेंटिनाला आघाडी राखण्यात यश आले. मात्र, उत्तरार्धात पाच मिनिटांच्या अंतराने सौदी अरेबियाने दोन गोल करून सनसनाटी निर्माण केली. ४८व्या मिनिटाला सालेह अलशेरी आणि ५३व्या मिनिटाला गोलकक्षाच्या रेषेवरून सालेम अलडावसारी यांनी गोल करत सौदीला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. यानंतर अर्जेंटिनाने आक्रमणाची गती वाढवली. मात्र, सौदीचा गोलरक्षक अल ओवेस आणि बचावपटूंनी मिळून अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे सौदीला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक निकालांपैकी एकाची नोंद करता आली.
अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास महागात पडला का?
अर्जेंटिनाच्या संघाने जुलै २०१९ पासून ३६ सामने खेळले होते आणि यापैकी एकही सामना गमावला नव्हता. इतकेच नाही तर, अर्जेंटिनाच्या संघाने गेल्या वर्षी जवळपास ३० वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यांनी अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलला पराभूत केले, तेही ब्राझीलमध्येच. त्यानंतर अर्जेंटिनाने ‘फिनालिसिमा’च्या सामन्यात युरो चषक विजेत्या इटलीला धूळ चारली होती. त्यामुळे विश्वचषकात सहभागी होण्यापूर्वी अर्जेंटिनाच्या सर्वच खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला होता. मात्र, आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांतील फरक अर्जेंटिनाच्या खेळाडूंना बहुधा समजला नाही. सौदीविरुद्धच्या सामन्यात आपण सहज विजय मिळवू अशी काही खेळाडूंची देहबोली होती. अखेर हीच गोष्ट त्यांना महागात पडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘ऑफ-साइड’ नियम आणि उष्ण वातावरणाचा कितपत फटका?
सौदीविरुद्ध अर्जेंटिनाने पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ केला होता. मेसीने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने दहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवली. त्यानंतर २२ ते ३४व्या मिनिटाच्या कालावधीत अर्जेंटिनाने आणखी तीन गोल (लौटारो मार्टिनेझने दोन, मेसीने एक) केले होते. मात्र, गोल करणारे अर्जेंटिनाचे खेळाडू ‘ऑफ-साइड’ (निर्णायक पासपूर्वीच गोल करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या अखेरच्या बचावपटूच्या पुढे गेला) असल्याने पंचांकडून हे तीनही गोल अपात्र ठरवण्यात आले. अंतिम निकालात हे तीन गोल अपात्र ठरल्याचा अर्जेंटिनाला नक्कीच फटका बसला. तसेच हा सामना दुपारच्या वेळेत झाल्याने वातावरण अधिक उष्ण होते. सौदीच्या खेळाडूंना अशा प्रकारच्या वातावरणात खेळण्याचा अनुभव आहे. याचा त्यांना फायदा झाला. अर्जेंटिनाचे खेळाडू अधिक दमलेले दिसले.
पुढील वाटचाल किती खडतर?
अर्जेंटिनाला विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, पहिलाच सामना गमावल्यामुळे अर्जेंटिनावर आता अतिरिक्त दडपण आले आहे. अर्जेंटिनाचे उर्वरित दोन साखळी सामने मेक्सिको आणि पोलंडविरुद्ध होणार आहेत. मेक्सिको आणि पोलंड यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपल्याने त्यांना प्रत्येकी एकेकच गुणावर समाधान मानावे लागले. ही बाब अर्जेंटिनासाठी सकारात्मक आहे. मात्र, गोलशून्य बरोबरीत संपलेल्या सामन्यात मेक्सिको आणि पोलंड या दोनही संघांनी भक्कम बचाव केला. त्यामुळे त्यांचा बचाव भेदणे अर्जेंटिनापुढील मोठे आव्हान असेल. मात्र, मेसी आणि अन्य आघाडीपटूंनी आपला खेळ उंचावल्यास अर्जेंटिनाला विजय मिळवणे सोपे जाईल. अर्जेंटिनाने हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांना बाद फेरी गाठणे शक्य होईल.
सौदीसाठी विजय का महत्त्वाचा?
सौदी अरेबियाचा हा त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. गेल्या तीन दशकांत विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाला पराभूत करणारा सौदी अरेबिया हा युरोपबाहेरील पहिलाच संघ ठरला. १९९०च्या विश्वचषकात कॅमेरूनने अर्जेंटिनाला धक्का दिला होता. मात्र, सौदीच्या संघाने आता कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास त्यांना १९९४ नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठता येईल. सौदीच्या यशात प्रशिक्षक हर्व रेनार्ड यांची भूमिका महत्त्वाची आहे. रेनार्ड हे आपल्या अचून नियोजनासाठी आणि संघरचनेसाठी ओळखले जातात. रेनार्ड यांच्या मार्गदर्शनात दोन संघांनी (झाम्बिया २०१२ व आयव्हरी कोस्ट २०१५) आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धाही जिंकली आहे. आता विश्वचषकात सौदीला मोठे यश मिळवून देण्याचा रेनार्ड यांचा प्रयत्न असेल.