-संदीप कदम
नेदरलँड्सविरुद्ध चुरशीच्या झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. या सामन्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले. मात्र अर्जेंटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसी हा दोन संघांमधील प्रमुख फरक ठरला. निर्णायक सामन्यात मेसीने पुन्हा एकदा पुढाकार घेत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला आणि आपले महत्त्व सिद्ध केले. यापूर्वी २०१४ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम पेरीत धडक मारली होती. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील थरार कसा होता आणि अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये कशी चमक दाखवली, याचा आढावा.
८०व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाचे वर्चस्व…
अर्जेंटिनाच्या मेसीने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे आणि निर्णायक उपांत्यपूर्व सामन्यात त्याने आपली हीच लय कायम राखली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाच्या आघाडीपटूंनी नेदरलँड्सच्या बचावफळीवर दडपण निर्माण केले. सामन्याच्या ३५व्या मिनिटाला नाहुएल मोलिनाने गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याला या गोलसाठी मेसीने साहाय्य केले. मेसीचा पास अत्यंत अवघड कोनातून दिला गेला. मध्यंतरापर्यंत संघाने आपली ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या टप्प्यातही अर्जेंटिनाने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. डेन्झेल डम्फ्रिसने अर्जेंटिनाचा आघाडीपटू अकुनाला पेनल्टी बॉक्समध्ये पाडले. त्यामुळे सामन्याच्या ७३व्या मिनिटाला पंचांनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर मेसीने गोल करत अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी भक्कम केली. या आघाडीच्या जोरावर अर्जेंटिना विजय मिळवेल असे दिसत असतानाच सामन्याचे चित्र पालटले.
वेगहॉर्स्टने सामन्याचे चित्र कसे पालटले?
नेदरलँड्सचे प्रशिक्षक लुई व्हॅन गाल यांनी सामन्याच्या ७८व्या मिनिटाला मेम्फिस डिपेच्या जागी वॉट वेगहॉर्स्टला मैदानात उतरवले. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ वेगळ्याच ऊर्जेने खेळताना दिसला. सामन्याच्या ८३व्या मिनिटाला स्टीव्हन बर्गहॉइसच्या पासवर वेगहॉर्स्टने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत हेडरच्या साहाय्याने गोल केला. ९० मिनिटांनंतर ११ मिनिटांच्या भरपाई वेळेची घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्जेंटिनाच्या बचाव फळीने सुरेख कामगिरी केली आणि नेदरलँड्सचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना नेदरलँड्सला मिळालेल्या फ्री-किकला टेउन कूपमीनर्सने वेगहॉर्स्टपर्यंत पोहोचवले. मग वेगहॉर्स्टने कोणतीही चूक न करता अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला आणि सामना २-२ असा बरोबरीत आणला. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही गोल न झाल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटमध्ये गेला.
पेनल्टी शूटआऊटचा थरार कसा होता?
शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने निर्णायक भूमिका बजावली. त्याने व्हर्जिल व्हॅन डाइक आणि स्टीव्हन बर्गहॉइसने मारलेले फटके अडवले. त्याच वेळी मेसी आणि लिआंड्रो पेरेडेस यांनी गोल करत अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नेदरलँड्सच्या कूपमीनर्सने गोल केला, तर गोंझालो मॉन्टिएलने गोल झळकावत अर्जेंटिनाला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. चौथ्या प्रयत्नात वेगहॉर्स्टने नेदरलँड्सकडून गोल केला. अर्जेंटिनाचा एंझो फर्नांडेझला मात्र गोल करण्यात अपयश आले. अखेरच्या प्रयत्नात लुक डी यॉन्गने गोल करत ३-३ अशी बरोबरी साधली. मग निर्णायक प्रयत्नात लौटारो मार्टिनझने गोल करत अखेर अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला. नेदरलँड्सच्या या पराभवानंतर ७१ वर्षीय व्हॅन गाल यांचा प्रशिक्षकपदाचा तिसरा कार्यकाळही संपुष्टात आला.
मेसी अर्जेंटिनासाठी का निर्णायक ठरत आहे?
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील मेसीचा हा चौथा गोल आहे. आता सर्व विश्वचषकांत मिळून मेसीचे १० गोल झाले आहेत. या कामगिरीनंतर त्याने आपल्याच देशाच्या गॅब्रिएल बटिस्टुटाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मेसीचे १६९ आंतरराष्ट्रीय सामन्यात आता ९४ गोल झाले आहेत. मेसी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमकरीत्या खेळताना दिसला. तसेच तो आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवरही राग व्यक्त करताना दिसला आणि त्याने पंचांच्या निर्णयांवरही नाराजी व्यक्त केली. मेसीला आजवर विश्वचषक जिंकता आलेला नाही. यंदा त्याने विश्वचषक जिंकण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मार्टिनझने शूटआऊटमध्ये जेव्हा निर्णायक गोल केला, तेव्हा मेसीने गोलरक्षक मार्टिनेझच्या दिशेने धावत जाऊन त्याला मिठी मारली. आतापर्यंतच्या विश्वचषक प्रवासात मेसीचे संघासाठीचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्याने गोल करण्यासह अनेक गोलसाठी साहाय्यही केले आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची झाल्यास क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात मेसीचा खेळ महत्त्वाचा ठरेल.
या सामन्यात सर्वाधिक पिवळे कार्ड का देण्यात आले?
दोन्ही संघांतील खेळाडूंच्या आक्रमक वागणुकीमुळे सामन्यामध्ये एकूण १८ पिवळे कार्ड देण्यात आली. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील हा विक्रम आहे. नेदरलँड्सचा बचावपटू डेन्झेल डम्फ्रिसला दोन पिवळे कार्ड देण्यात आल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागेल. मेसीलाही पिवळे कार्ड देण्यात आले. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी या सामन्याला निराशाजनक संबोधले, तर मेसीने स्पेनचे पंच ॲन्टोनियो माटेउवर टीका केली. ‘‘त्यांचे काम आखून दिलेल्या नियमावलीनुसार होते असे मला वाटत नाही. ते आमच्यासाठी नुकसानदायक ठरले,’’ अशी टीका मेसीने केली. मेसीची अशी भूमिका कमीच पाहायला मिळते. सामन्यानंतर नेदरलँड्सकडून दोन गोल करणाऱ्या वॉट वेगहॉर्स्टवरही मेसी ओरडताना दिसला. मेसी आणि सहकारी सामना संपल्यानंतर जवळपास २० मिनिटे मैदानात आनंद साजरा करत होते.