-ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्रान्सने इंग्लंडचे दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मोडले. विजेत्याच्या थाटात खेळ करून फ्रान्सने इंग्लंडचा नियोजनबद्ध प्रतिकार मोडून काढला. या विजयासह फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या आशाही कायम ठेवल्या. युरोपातील दोन आघाडीचे फुटबॉल संघ आमनेसामने आल्याने या लढतीची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. हा सामना कसा रंगला, कुठला क्षण निर्णायक ठरला याचा आढावा.

सामन्याची सुरुवात कशी झाली?

विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीचे सामने अत्यंत उत्कंठावर्धक झाले. उपांत्यपूर्व फेरीतील प्रत्येक सामना काही ना काही कारणाने चर्चेत राहिला. कधी आक्रमक, तर कधी बचावत्मक खेळ… तसेच काही खेळाडूंचा आक्रस्ताळा खेळही या उपांत्यपूर्व फेरीत दिसून आला. मात्र, इंग्लंड-फ्रान्स सामना याला अपवाद ठरला. दोन्ही संघांचे विजयाचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्नदेखील काहीसे सारखे दिसत होते. फ्रान्सने पहिला गोल केल्यानंतर आपल्या कक्षात राहून बचाव करण्यावर भर दिला. दुसरीकडे इंग्लंडच्या खेळाडूंनी संधी निर्माण करण्यापेक्षा ती कशी चालून येईल याची वाट पाहिली. फ्रान्सच्या गोलकक्षाकडे वेगवान धाव घेत थेट किकचा प्रयत्न न करता पास देत त्यांनी फ्रान्सच्या बचाव फळीच्या संयमाची कसोटी पाहण्याकडे अधिक लक्ष दिले. त्याचा फायदा त्यांना उत्तरार्धाच्या सुरुवातीला मिळाला.

फ्रान्सच्या विजयाचे श्रेय नेमके कोणाला जाते?

फ्रान्सच्या प्रत्येक खेळाडूने या सामन्यात अप्रतिम खेळ केला. बचावात जुल्स कुंडे, राफाएल वरान हे आपली जबाबदारी चोख बजावत होते. त्यांना थिओ हर्नांडेझची साथ मिळत होती. चपळता आणि सामन्याच्या परिस्थितीचे जबरदस्त आकलन ही ॲन्टोन ग्रीझमनच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. इंग्लंडने सातत्याने फ्रान्सच्या गोलकक्षात शिरकाव करण्यावर भर दिला होता. त्यांची ही आक्रमणे हळूहळू धोकादायक होणार याचा अंदाज घेऊन ग्रीझमनने स्वतःहून बचावात आघाडी घेतली. वास्तविक फ्रान्सच्या खेळाचा हा पिंड नाही. मात्र व्यासपीठ विश्वचषकाचे होते आणि सामना उपांत्यपूर्व फेरीचा. हे ओळखून ग्रीझमनने चाल रचण्याबरोबर इंग्लंडच्या खेळाडूंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. अशाच एका प्रयत्नात त्याला पिवळे कार्ड मिळाले. मात्र, आक्रमणात त्याने चाली रचणे सुरूच ठेवले. फ्रान्सच्या दोन्ही गोलला त्याचे साहाय्य होते. चुओमेनीलाही विजयाचे श्रेय जाते. त्याने फ्रान्ससाठी पहिला गोल केला. गोलकक्षाच्या बाहेरून २५ यार्डावरून त्याने चेंडूला दिलेली दिशा अफलातून होती. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात ऑलिव्हिर जिरुडने जबरदस्त हेडर करत फ्रान्सचा विजय निश्चित केला. त्यामुळे जिरुडचे योगदानही विसरता येणार नाही.

नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास

सामन्यातील निर्णायक क्षण कोणता?

चुरशीने झालेला असो किंवा एकतर्फी झालेला सामना, त्यात एखादा निर्णायक क्षण असतोच. एकतर्फी सामना होतो, तेव्हा वर्चस्व राखणाऱ्या संघाचे नियोजन निर्णायक ठरत असते. सामना चुरशीचा होतो, तेव्हा एक क्षणही सामन्याचे चित्र एकदम पालटून जाते. इंग्लंड-फ्रान्स सामन्यात उत्तरार्धात अगदी अखेरच्या टप्प्यात लांबवरून आलेल्या क्रॉसवर जिरुडने केलेले अफलातून हेडर फ्रान्सच्या विजयासाठी पुरेसा ठरला. सामन्याच्या ७८व्या मिनिटाला हा गोल झाला, मात्र खरे नाट्य यानंतर घडले. इंग्लंडने खेळाला वेग देत आक्रमणावर भर दिली. चेंडू ताब्यात घेऊन थेट गोलकक्ष गाठण्याकडे इंग्लंडचा कल राहिला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. सामन्याच्या ८१व्या मिनिटाला इंग्लंडच्या माउंटला हर्नांडेझने जाणूनबुजून पाडले. इंग्लंडच्या खेळाडूंनी अर्थातच पेनल्टीची मागणी केली. मात्र पंचांनी खेळ चालू ठेवला. शेवटी ‘व्हीएआर’ची मदत घेऊन इंग्लंडला पेनल्टी देण्यात आली. इंग्लंडकडून सर्वाधिक ५३ गोल करण्याच्या रुनीच्या विक्रमाची बरोबरी करणाऱ्या हॅरी केनने ही किक घेतली. मात्र त्याची किक स्वैर ठरली. चेंडू गोलपोस्टच्या वरून गेला. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच पेनल्टीची संधी साधणाऱ्या केनची अखेरच्या सत्रात हुकलेली किक हाच खरा सामन्याचा निर्णायक क्षण ठरला.

साकाचे प्रयत्न इंग्लंडसाठी तोकडे पडले का?

इंग्लंडचे खेळाडू नियोजनबद्ध खेळ करत असताना चेंडूवर ताबा मिळवून तो खेळविण्याची जबाबदारी या सामन्यात जणू बुकायो साकाने घेतली होती. साकाला रोखणे हे फ्रान्सच्या बचाव फळीपुढे उभे राहिलेले आव्हान होते. कमालीच्या वेगाने साका मैदानात धावत होता. त्याचा वेग रोखण्यात फ्रान्सला अडचण येत होती. त्याने अनेकदा फ्रान्सच्या गोलकक्षात धडक मारली. गोलकक्षाच्या बाहेरून थेट किक मारण्याचाही प्रयत्न साकाकडून अनेकदा झाला. पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. इंग्लंडच्या अन्य आक्रमकपटूंचा खेळ फारसा बहरला नाही.

नक्की वाचा >> विश्लेषण: अर्जेंटिना विश्वविजयाच्या दिशेने! मेसीचे योगदान किती महत्त्वाचे?

इंग्लंडचे नेमके चुकले कुठे?

फ्रान्स आणि इंग्लंड यांचा खेळ पू्र्णपणे ठरवल्याप्रमाणे होता. मात्र, परिस्थिती पाहून ग्रीझमनने आघाडी घेत ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडला या आघाडीवर अपयश आले. केन, फोडेन हे आघाडीवर खेळणारे खेळाडू साकाला साथ देऊ शकले नाहीत. दुसरे म्हणजे फ्रान्सच्या गोलकक्षातील बचावाचा अंदाज घेत थेट गोल करण्याचे इंग्लंडचे प्रयत्न फोल ठरले. एक तर अशा फटक्यात जोर नव्हता आणि अचूकतेचाही अभाव होता. याचा फटका इंग्लंडला निश्चितपणे बसला.

सामन्यातील अन्य वैशिष्ट्य काय?

फ्रान्स सातव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला. या वेळी त्यांनी सलग दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली. यापूर्वी १९८२ आणि १९८६ मध्ये फ्रान्सने अशी कामगिरी केली होती. इंग्लंड सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत गारद झाले. स्पर्धेच्या इतिहासात हा विक्रम ठरला. फ्रान्स प्रशिक्षक दिदिएर देशॉप यांचा विश्वचषक स्पर्धेतील हा १३वा विजय ठरला. त्यांनी १७ सामन्यांत ही कामगिरी केली. लुइस फिलिपे स्कोलारी यांनी १४, तर हेल्मट शॉन यांनी १६ विजय मिळविले आहेत. वयाच्या ३६व्या वर्षी एका स्पर्धेत चार गोल करण्याची कामगिरी फ्रान्सच्या जिरुडने केली. अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू ठरला. यापूर्वी १९९० मध्ये कॅमेरुनच्या रॉजर मिलाने वयाच्या ३८व्या वर्षी अशी कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup match analysis england vs france print exp scsg