-संदीप कदम
मोरोक्कोने पोर्तुगालसारख्या आघाडीच्या संघाला १-० अशा फरकाने पराभूत करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. मोरोक्कोचा संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारेल, याची विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. आता उपांत्य फेरीत त्यांची गाठ गतविजेत्या फ्रान्सशी पडणार आहे. पोर्तुगालविरुद्धची मोरोक्कोची कामगिरी कशी होती आणि त्यांनी रोनाल्डोसारख्या आघाडीपटूला कसे रोखले याचा आढावा.
चांगल्या सुरुवातीनंतरही पोर्तुगाल पूर्वार्धात पिछाडीवर का?
पोर्तुगाल संघाने सामन्याला आक्रमक सुरुवात केली आणि मोरोक्कोवर दडपण निर्माण करण्याचे प्रयत्न केले. पोर्तुगालने पूर्वार्धात आपल्या अंतिम ११मध्ये तारांकित आघाडीपटूू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या जागी गोन्सालो रामोसला संधी दिली. रामोसने उपउपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडविरुद्ध हॅट्ट्रिकची नोंद केली होती. आक्रमक सुरुवातीचा फायदा पोर्तुगालला चौथ्याच मिनिटाला फ्री-किकच्या रूपात मिळाला. मोरोक्कोचा गोलरक्षक बोनोने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर पोर्तुगालला काही संधी मिळाल्या. मात्र, त्यांना यश मिळाले. पूर्वार्धात ४० मिनिटांपर्यंत पोर्तुगालने मोरोक्कोवर दडपण निर्माण केले होते. मात्र, यानंतर सामन्याचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. ४२व्या मिनिटाला मोरोक्कोच्या युसूफ एन नेसरीने पोर्तुगालचा गोलरक्षक डियोगो कोस्टाला चकवत गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने हवेत उंच झेप घेत हेडरमार्फत हा गोल केला. पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत त्यांना आघाडी दुप्पट करण्याची संधी होती. मात्र, त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
उत्तरार्धात मोरोक्कोने वर्चस्व कसे राखले?
दुसऱ्या सत्रात मोरोक्कोच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला अश्रफ हकिमीवरील फाउलसाठी मोरोक्कोला फ्री-किक बहाल करण्यात आली. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आले. पोर्तुगालने ५१व्या मिनिटाला रोनाल्डोला मैदानावर उतरवले. तीन मिनिटांनंतरच पोर्तुगालचा प्रयत्न बोनोने हाणून पाडला. पोर्तुगालचा संघ सामन्याच्या ६४व्या मिनिटाला बरोबरी करण्याच्या जवळ पोहोचला. यावेळीही त्यांच्या पदरी निराशा आली. वालिद चेदीराला सामन्याच्या अखेरच्या क्षणात दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने त्याचे रूपांतर लाल कार्डात झाले. अखेरच्या सहा मिनिटांत मोरोक्कोचा संघ दहा खेळाडूंनिशी खेळत होता. तरीही पोर्तुगालला सामन्यात बरोबरी साधण्याची कोणतीच संधी मोरोक्कोने दिली नाही. अखेरच्या काही मिनिटांत पोर्तुगालने अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांनी मोरोक्कोच्या बचाव फळीसमोर अखेर गुडघे टेकले.
नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास
तारांकित खेळाडू असूनही पोर्तुगालचा संघ अपयशी का ठरला?
ख्रिस्तियानो रोनाल्डो, जाओ फेलिक्स यांसारखे नावाजलेले आघाडीपटू संघात असूनही पोर्तुगालचा संघ मोरोक्कोविरुद्ध अपयशी ठरला. स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या रामोसने हॅट्रिकची नोंद केली होती. मात्र, या सामन्यात संघासाठी त्याला निर्णायक कामगिरी करता आली नाही. स्वित्झर्लंडविरुद्ध रोनाल्डोला बराच काळ मैदानाबाहेर ठेवण्यात आले. मोरोक्कोविरुद्धच्या लढतीतही त्याला पूर्वार्धात मैदानात बसवून ठेवण्यात आले. बचावपटू पेपे, मध्यरक्षक ब्रुनो फर्नांडेस, बर्नांडो सिल्वा यांनाही फारशी चुणूक दाखवता आली नाही. पोर्तुगालच्या आघाडीपटूंनी गोल करण्यासाठी सामन्यात प्रयत्न केले. मात्र, त्यांचे बरेचशे फटके हे दिशाहीन होते किंवा त्यांच्या फटक्यांना साहाय्य करण्यास दुसरीकडे कोणीच खेळाडू नव्हते.
नक्की वाचा >> विश्लेषण: फ्रान्सने इंग्लंडचे नियोजन कसे मोडून काढले?
गोलरक्षक यासिन बोनो मोरोक्कोसाठी का ठरतोय निर्णायक?
मोरोक्कोला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यात सर्वांत महत्त्वाचे योगदान गोलरक्षक यासिन बोनोचे आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच बोनोने संघासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मोरोक्काच्या आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेच्या प्रवासात एकच गोल खावा लागला आहे. यावरून आपल्याला बोनोच्या कामगिरीचा अंदाज येऊ शकतो. स्पेनविरुद्धच्या शूटआऊटमध्येही बोनोने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही. पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यातही बोनोने महत्त्वाचे योगदान दिले. त्याने अनेक प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे आगामी सामन्यातही बोनोच्या कामगिरीवर मोरोक्कोचे विश्वचषक स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असणार आहे.
मोरोक्कोची ही कामगिरी ऐतिहासिक का आहे?
मोरोक्कोने पोर्तुगालला नमवत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. असे करणारा मोरोक्को हा पहिला अरब देश ठरला. जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी असलेल्या मोरोक्कोने नवव्या स्थानी असलेल्या पोर्तुगालला नमवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकी देश आहे. यापूर्वी आफ्रिकेच्या कॅमेरून (१९९०), सेनेगल (२००२) आणि घाना (२०१०) यांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे मोरोक्कोची ही कामगिरी ऐतिहासिक राहिली.