FIFA World Cup Qatar 2022: फिफा फुटबॉल विश्वचषक यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. २० नोव्हेंबरला कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने या भव्य स्पर्धेची सुरुवात झाली होती. यंदाच्या फिफा विश्वचषकात जगभरातील ३२ सर्वोत्तम संघ सहभागी होणार असून २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत ही भव्य दिव्य सामने पार पडणार आहेत. फुटबॉलचे स्टार खेळाडू रोनाल्डो व मेस्सीसाठी यंदाचा विश्वचषक हा अत्यंत खास असल्याने त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, अंतिम सामन्यात या दोघांना आमनेसामने खेळताना पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. फिफा विश्वचषकाच्या विजयी संघाला फिफाची वर्ल्डकप ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की, फिफा विश्वचषकात अंतिम सामन्यात जिंकूनही कोणत्याच संघाला मूळ फिफाची ट्रॉफी दिली जात नाही उलट त्याची प्रतिकृती देऊन गौरवण्यात येते. फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या ट्रॉफीशी संबंधित काही रंजक तथ्य आज आपण जाणून घेऊयात..
फिफा वर्ल्डकप ट्रॉफी इतकी खास का आहे?
१९३०- १९७० या काळात फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाला दिली जाणारी ट्रॉफी ही ‘जूल्स रिमेट ट्रॉफी’ म्हणून ओळखली जात होती मात्र १९७४ पासून या चषकाचे नाव बदलून फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी असे ठेवण्यात आले. फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे डिझाईन हे अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे. ट्रॉफीच्या डिझाईनसाठी तब्बल ५३ देशातून विविध प्रस्ताव आले होते. इटलीतुन सिल्वियो गाजानिगा यांचे डिझाईन सर्वाधिक सदस्यांना आवडल्याने त्यांना फिफाची ट्रॉफी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
कशी आहे फिफाची वर्ल्ड कप ट्रॉफी?
फिफाची वर्ल्ड कप ट्रॉफी लांबीने ३६. ५ सेंटीमीटर आहे. ट्रॉफी बनवण्यासाठी तब्बल ६. १७ किलो सोन्याचा वापर करण्यात आला होता. ट्रॉफीचा गोलाकार बेस हा १३ सेमी व्यासाचा आहे. ज्यावर FIFA World Cup असे लिहिण्यात आले आहे. फिफाची वर्ल्ड कप ट्रॉफी हे आतल्या बाजूने पोकळ असते. प्राप्त माहितीनुसार फिफाची वर्ल्ड कप ट्रॉफी हे आंतरराष्ट्रीय खेळांमधील सर्वात महाग ट्रॉफी मानली जाते, यूएसए टुडेच्या माहितीनुसार २०१८ मध्येच या ट्रॉफीची किंमत २० मिलियन डॉलर म्हणजेच १,६३, ५५ , ८३ ००० भारतीय रुपये इतकी आहे.
विश्वचषक जिंकूनही का मिळत नाही फिफा वर्ल्डकप ट्रॉफी?
१९३०- १९७० या काळात फुटबॉल विश्वचषक विजेत्यांना जूल्स रिमेट ट्रॉफी दिली जात होती मात्र १९७४ पासून या ट्रॉफीचे नाव व नियम दोन्ही बदलण्यात आले. विजेत्या संघाला फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या ऐवजी त्याची प्रतिकृती देण्यात येते. ही प्रतिकृती कांस्य म्हणजेच तांब्याने बनवलेली असून त्यावर गोल्ड प्लेटिंग केले जाते. फिफाची मूळ ट्रॉफी ही अत्यंत महाग व खास असल्याने हा नियम पाळला जातो.
फिफा वर्ल्डकप ट्रॉफी कुठे असते?
फिफाचे मुख्यालय हे स्वित्झर्लंडची राजधानी ज्युरिख येथे आहे. काही खास प्रसंग वगळता फिफाची मूळ ट्रॉफी ही मुख्यालयातच कडक सुरक्षेच्या बंदोबस्तात ठेवली जाते. ट्रॉफी टूर, विश्वचषक अंतिम सामना अशा प्रसंगी फिफा वर्ल्डकप ट्रॉफी बाहेर काढली जाते. मात्र या अत्यंत खास ट्रॉफीला हात लावण्याची परवानगीही काही निवडक व्यक्तींनाच आहे. राष्ट्र प्रमुख व विश्वचषक विजेत्यांना या ट्रॉफीला हात लावण्याची संधी मिळते.
हे ही वाचा << विश्लेषण: मेसी, रोनाल्डोसाठी सध्याचा विश्वचषक का महत्त्वाचा? हे दोघे फायनलमध्ये भिडतील का?
दरम्यान, फिफा विश्वचषकात ३२ पैकी ग्रुप स्टेजमधील साखळी सामन्यात, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील सर्वोतम २ संघ राऊंड ऑफ १६च्या फेरीत प्रवेश करतील. राऊंड ऑफ १६ मध्ये आठ सामने होणार असून, यात १६ पैकी ८ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून इथे विजय प्राप्त करून चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. सेमीफायनलनंतर अंतिम सामना १८ डिसेंबरला खेळला जाईल.