-ज्ञानेश भुरे
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत बहुतेक सामन्यांचा वेळ १०० मिनिटांपेक्षा अधिक राहिल्याचे दिसून येत आहे. इराण-इंग्लंड सामना २४ मिनिटे लांबला. एरवी जास्तीत जास्त पाच मिनिटे भरपाई वेळ मिळत होता. मग, विश्वचषक स्पर्धेतच हा वेळ का वाढतोय.. दुखापतीच्या वेळाबाबत ‘फिफा’चा नियम काय सांगतो या विषयीचा हा आढावा…
कतार विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत कुठले सामने अधिक सुरू राहिले?
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सामन्यांची लांबी वाढत आहे हे निश्चित. इराण-इंग्लंड सामना दोन्ही सत्रातील भरपाई वेळ धरून जवळपास ११४ मिनिटे चालला. अमेरिका-वेल्स लढत १०४ मिनिटे चालली. नेदरलँडस-सेनेगल सामना १०० मिनिटे सुरू होता. विशेष म्हणजे १९६६ विश्वचषक स्पर्धेपासूनचा इतिहास बघितला, तर या स्पर्धेतील सामने सर्वाधिक काळ चालले आहेत. वरील चार सामने पहिल्या टप्प्यात लांबले, तर दुसऱ्या टप्प्यात अर्जेंटिना-सौदी अरेबिया हा सामना असाच ९७ मिनिटांपर्यंत ताणला गेला.
सामन्यांचा भरपाई वेळ का वाढत आहे?
फुटबॉलमधील ज्येष्ठ पंच पियर्लुगी कोलिना यांनी हे काही लगेच झालेले नाही. रशियातील (२०१८) स्पर्धेपासून भरपाई वेळेचा आढावा घेतला जात आहे, असे कोलिना म्हणाले. कोलिना हे फिफाच्या पंच समितीचे अध्यक्ष आहेत. हा वेळ वाढण्यामागे सामन्यातील गोल संख्येचे कारण पुढे करण्यात आले आहे. एका सामन्यात तीन गोल केले, तर त्या प्रत्येक गोल नंतर खेळाडूंचा जल्लोष बघता खेळ पुन्हा सुरू होण्यास १ ते दीड मिनिट लागत आहे. त्यामुळे सामन्यात तीन गोल झाले, तर नियोजित वेळेतील सहा मिनिटांचा खेळ कमी होतो. त्यानंतर एखाद्या सामन्यात तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेल्यास, तो वेळही नियोजित सामन्यातून कमी होतो. यासाठी वाया गेलेल्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी चौथ्या पंचांवर ही जबाबदारी सोपविली जाते आणि तो दुखापती, तसेच अन्य कारणामुळे वाया गेलेल्या वेळेची नोंद घेऊन भरपाई वेळ निश्चित करतो. यामुळे या वेळी भरपाई वेळ मोठा मिळत आहे.
वाढीव भरपाई वेळेने काय फरक पडला?
वाढत्या भरपाई वेळेमुळे सामन्यांतील रंगत वाढत आहे. त्याचबरोबर विजयासाठी किंवा एखाद्या सामन्यात बरोबरीसाठी संघांना नियोजित वेळेनंतरही गोल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. या स्पर्धेत भरपाई वेळेत अनेक गोल झाले आहेत. यावरूनच भरपाई वेळेचा फायदा निश्चित होईल. याचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा इराणच्या सामन्याचे देता येईल. इराण-इंग्लंड सामन्यात इराणच्या मेहदी तारेमीने १०२व्या मिनिटाला गोल केला. त्यापूर्वी नेदरलँडसच्या डेव्ही क्लासेनने ९८व्या मिनिटाला गोल केला होता. एकूणच भरपाई वेळ वाढल्यामुळे फुटबॉलचा आनंद देखील वाढतोय असे एक मतप्रवाह पुढे येत आहे.
कतारमध्येच भरपाई वेळ वाढण्यासाठी काही वेगळे कारण आहे का?
कतारमधील स्पर्धा जाहीर झाल्यापासूनच सामन्यांच्या आयोजनावरून चर्चा रंगत आहे. येथील सर्वसाधारण तापमान हे ४५ अंशांपर्यंत असते. फुटबॉल खेळातील वेग बघता खेळाडूंची आधीच खूप दमछाक होत असते, आता त्यात येथील तुलनेने अधिक उष्ण हवामानाचा खेळाडूंच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे कतारमधील स्पर्धेत सामन्या दरम्यान जलपानासाठी वेळ काढला जात आहे. त्यामुळेदेखील सामन्यांची लांबी वाढत असल्याचे फुटबॉल विश्लेषक म्हणतात.