-ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युरोपियन फुटबॉल वारसा जपत असतानाही क्रोएशिया फुटबॉल विश्वातील एक छोटा देश. पण, या देशाची फुटबॉल विश्वातील कामगिरी मोठी. यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत या संघाने बलाढ्य ब्राझीलला पराभूत केले. क्रोएशियाच्या या फुटबॉलमधील अतुल्य कामगिरीवर आणि फुटबॉलपटूंच्या सुवर्णपिढीवर प्रकाशझोत….

ब्राझीलविरुद्ध क्रोएशियाने सामना बरोबरीत कसा नेला?

सामना संपण्यासाठी केवळ १० मिनिटे होती. नेयमारच्या प्रेक्षणीय गोलने ब्राझीलने जवळपास विजय निश्चित केला होता. सामन्यातील ९० मिनिटांचा वेळ संपत चालला होता. क्रोएशियाच्या असंख्य चाहत्यांना मैदानावर उपस्थित पाठिराख्यांना पराभव दिसत होता. मैदानावर लढणाऱ्या खेळाडूंनी जिद्द सोडली नव्हती. अखेरच्या काही मिनिटांत क्रोएशियाच्या खेळाडूंनी ब्राझीलच्या बचाव फळीवर हल्ला करायला सुरुवात केली.  ब्राझीलच्या खेळाडूंनाही एक वेळ विचार करायला भाग पाडले. पण, त्यापूर्वीच क्रोएशियाच्या खेळाडूंनी आपले काम चोख बजावले होते. जबरदस्त गोल करत त्यांनी आपल्या आव्हानात जान आणली. सामना बरोबरीत सुटला आणि  पेनल्टी शूट-आऊटमध्ये गेला.

क्रोएशियाच्या विजयात गोलरक्षक लिवाकोविचची कामगिरी किती निर्णायक ठरते?

विश्वचषक स्पर्धा आणि पेनल्टी शूट-आऊट हे समीकरण क्रोएशियासाठीच तयार केलेले असावे. कारण, त्यांनी बाद फेरीतल्या चारही लढती पेनल्टी शूट-आऊटमध्येच जिंकल्या आहे. ब्राझीलविरुद्धचा विजयही असाच पेनल्टी शूट-आऊटमध्ये मिळविला. या वेळी क्रोएशियासाठी पुन्हा एकदा लिवाकोविच देवदूत म्हणून अवतरला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये गोलरक्षकासाठी कमालीची एकाग्रता आणि चपळता खूप महत्त्वाची असते. लिवाकोविचकडे जणू ती ठासून भरलेली आहे. मुख्य म्हणजे लिवाकोविचची देहबोलीदेखील तेवढीच लवचीक आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू कुठल्या  दिशेने किक घेणार हे तो आधीच जाणतो आणि त्याच दिशेने झेपावत किक अडवतो. त्यामुळे क्रोएशियाच्या वाटचालीत गोलरक्षक लिवाकोविचचा वाटा मोठा आहे हे स्पष्ट होते.  

क्रोएशियाचा फुटबॉल इतिहास कसा आहे?

क्रोएशिया १९९४मध्ये इस्टोनियाविरुद्ध पहिला अधिकृत सामना खेळले. या सुरुवातीच्या काळात एक सामान्य संघ म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. क्रोएशियाने प्रथम १९९६ मध्ये युरोच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर १९९८ विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. डेव्हॉर सुकेर आणि झ्वोनिमीरप बोबनसारख्या खेळाडूंनी क्रोएशियाच्या फुटबॉलचा इतिहास लिहायला सुरुवात केली. त्यानंतर क्रोएशियासाठी २००८ हे वर्ष नव्याने पालवी फुटल्यासारखे होते. त्यांनी नव्या पिढीसह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवेश केला होता. लुका मॉड्रिच, म्लाडेन पेट्रिच आणि इव्हान रॅकिटिच हे नवे चेहरे चर्चेत आले. पण, ते त्यांच्या अपयशाने. तुर्कस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या तिघांनाही शूट-आऊटमध्ये लक्ष्य साधता आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले. २०१६ मधील युरो स्पर्धेतील यशाने पुन्हा एकदा क्रोएशियाने उचल घेतली. गटात अव्वल स्थान पटकावून त्यांनी स्पेनला बाहेर काढले. पण, बाद फेरीत त्यांना पोर्तुगालकडून पराभवाचा सामना करावा लागला. 

नक्की वाचा >> विश्लेषण: फ्रान्सने इंग्लंडचे नियोजन कसे मोडून काढले?

क्रोएशियाच्या फुटबॉलचा सुवर्णकाळ कोणता?

क्रोएशियाला २०१७ मध्ये एक किमयागार भेटला. झाल्टो डॅलिच त्याचे नाव. प्रशिक्षक म्हणून डॅलिच यांची स्वतंत्र ओळख होती. कुठलीही चाचणी न घेता त्यांची निवड करण्यात आल्यामुळे प्रचंड टिका झाली. त्या वेळी २००८ मध्ये संघात प्रवेश मिळालेले मॉड्रिच, रॅकिटिच, मॅंडझुकिच आणि डॅनिजेल सुबासिच हे खेळाडू युरोपातील अनुभवाने प्रगल्भ झाले होते. झपाट्याने वेग घेणाऱ्या युगात त्यांनी प्रवेश केला होता. मार्सेलो ब्रोझोविच, माटेओ कोव्हासिच, इव्हान पेरिसिच हे नवे चेहरे समोर आले. २०१८ विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाने बाद फेरीत डेन्मार्क, रशिया आणि इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला. पराभवातही त्यांनी विजेतेपदाचा अनुभव घेतला. मायदेशात झाग्रेब येथे त्यांचे एखाद्या विजेत्या प्रमाणेच स्वागत करण्यात आले. याचा शिल्पकार ठरला होता मध्यरक्षक लुका मॉड्रिच.

लुका मॉड्रिच क्रोएशियाचा तारणहार कसा ठरतो?

साधासुधा मध्यरक्षक ते तारांकित फुटबॉलपटू असा मॉड्रिचचा प्रवास तेवढा सोपा नव्हता. निर्वासितांच्या छावणीत वाढलेल्या मॉड्रिचला फुटबॉलने जगण्याचे साधन दिले. तरुण वयात आल्यावर डायनॅमो झाग्रेब, टॉटनहॅम हॉटस्पर, रेयाल माद्रिद अशा क्लबचे प्रतिनिधित्व करताना युरोपियन फुटबॉलचा चांगला अनुभव घेतला. रेयाल माद्रिदकडून खेळताना एक भरवशाचा मध्यरक्षक म्हणून तो नावारूपाला आला. अनेक चॅंम्पियन्स लीग विजेतेपदाचा अनुभव त्याच्या गाठिशी होता. याच अनुभवाने त्याला क्रोएशियात जणू देवत्व दिले. चेंडूला स्पर्श, तो पायात खेळविणे, अचूकत पास आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी नेमके काय करायला हवे याची अचूक जाण असणारा मॉड्रिच निःसंशयपणे क्रोएशियाचा सर्वात महान खेळाडू ठरतो. क्रोएशियाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात त्याचा वाटा मोठा होता. त्याच स्पर्धेत तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. 

नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास

कतार विश्वचषक स्पर्धेत क्रोएशिया रशियाची पुनरावृत्ती साधणार का?

फुटबॉलमध्ये एका बाजूला क्रोएशिया जरुर प्रगती करत होता. फुटबॉल जगत त्याची तातडीने दखल घेण्यास तयार नव्हते. फ्रान्स, स्पेन, ब्राझील आणि अर्जेंटिना संघांची झापड दूर करण्यास ते तयार नव्हते. त्यामुळेच रशियातील यश हा त्यांच्या नशिबाचा भाग होता असे बोलले जाऊ लागले. प्रशिक्षक डॅलिच यानंतरही शांत होते. त्यांनी खेळाडूंना एकत्र राखण्यात यश मिळविले. फिफा क्रमवारीत पहिल्या पंधरात स्थान मिळविले. सुबासिच, मॅंडझुकिच असे जुने प्रतिभावान खेळाडू अस्तास गेले, तसे जोस्को ग्वार्डिऑल, निकोला व्लासिच आणि डॉमिनिक लिवाकोविच अशा नव्या प्रतिभेने जन्म घेतला. अनुभव आणि युवा पिढीतील सळसळतेपणा याची सांगड डॅलिच यांनी घातली. क्रोएशियाने कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आणि चार वर्षांपूर्वीचे आमचे यश हे नशिबाचा भाग नव्हते हे दाखवून दिले. आता त्यांना अर्जेंटिना या  आणखी एका दक्षिण अमेरिकन संघाशी दोन हात करायचे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup what is behind rise of croatia as a football powerhouse print exp scsg