‘फिफा’ विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसी तब्बल आठव्यांदा प्रतिष्ठेच्या बॅलन डी ओर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. गतवर्षी मेसीला या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले नव्हते. मात्र, त्यानंतर त्याने अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजयात निर्णायक भूमिका बजावताना यंदा बॅलन डी ओरसाठी केवळ नामांकन मिळवले नाही, तर थेट हा पुरस्कार आपल्या नावे केला. त्याच वेळी मँचेस्टर सिटी आणि नॉर्वेचा आघाडीपटू अर्लिंग हालँडनेही विक्रमी कामगिरी केली होती. त्यामुळे या पुरस्कारासाठी हालँडला डावलण्यात आल्याची काही फुटबॉलप्रेमी आणि जाणकारांची भावना आहे.
बॅलन डी ओर पुरस्काराचे महत्त्व काय? कोणाला नामांकन दिले जाते?
फ्रेंच फुटबॉल मासिकातर्फे गतहंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूला हा मानाचा पुरस्कार दिला जातो. ‘फिफा’कडून देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम फुटबॉलच्या पुरस्कारापेक्षाही बॅलन डी ओरला अधिक महत्त्व दिले जाते. पूर्वी हा पुरस्कार गेल्या वर्षभरात (जानेवारी ते डिसेंबर) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जात होता. मात्र, गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार हंगामातील कामगिरीच्या आधारे दिला जातो. गेला फुटबॉल हंगाम १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत चालला. या कालावधीत दर्जेदार कामगिरी केलेल्या ३० फुटबॉलपटूंचाच या पुरस्कारासाठी विचार केला गेला.
पुरस्काराचा विजेता कसा ठरतो?
बॅलन डी ओर पुरस्कारासाठीची मतदान प्रक्रिया बरेचदा वादग्रस्त ठरली आहे. ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीतील अव्वल १०० देशांतील निवडक १०० पत्रकारांना (प्रत्येक देशाचा एक) या पुरस्कारासाठी मतदानाचा अधिकार दिला जातो. गतवर्षी सर्वोत्तम कामगिरी केलेल्या ३० फुटबॉलपटूंना या पुरस्कारासाठी नामांकन दिले जाते. प्रत्येक पत्रकार क्रमानुसार सर्वोत्तम पाच खेळाडू निवडतो. पहिल्या पसंतीच्या खेळाडूला सहा, दुसऱ्याला चार, तिसऱ्याला तीन, चौथ्याला दोन आणि पाचव्याला एक असे गुण दिले जातात. अखेरीस सर्वाधिक गुण मिळालेला खेळाडू बॅलन डी ओरचा मानकरी ठरतो.
मेसीची गतहंगामातील कामगिरी किती खास होती?
मेसीने पॅरिस सेंट-जर्मेन क्लबसाठी खेळताना गतहंगामात ४१ सामन्यांत २१ गोल केले होते. मात्र, त्याने बॅलन डी ओर पुरस्कार पटकावण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याची विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी. गतवर्षी कतार येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मेसीने अर्जेंटिनाच्या १० गोलमध्ये योगदान दिले होते. त्याने सात गोल आणि तीन गोलसाहाय्यांची (असिस्ट) नोंद केली होती. तसेच फ्रान्सविरुद्ध अंतिम लढतीत त्याने दोन गोल केले आणि पेनल्टी शूटआऊटमध्येही चेंडू गोलजाळ्यात मारला होता. त्याच्या कामगिरीमुळे अर्जेंटिनाने तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीमुळे मेसी अनेक फुटबॉलप्रेमी, जाणकार आणि आजी-माजी खेळाडूंच्या नजरेत सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरला आहे.
हेही वाचा… विश्लेषण: वक्तशीर पश्चिम रेल्वे इतकी विस्कळीत का होतेय? नक्की कोणती तांत्रिक कामे खोळंबली?
मेसी यापूर्वी बॅलन डी ओरचा मानकरी कधी ठरला होता?
गेली जवळपास दोन दशके फुटबॉलविश्व आणि बॅलन डी ओर पुरस्कारावर मेसी व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी वर्चस्व गाजवले. मेसीने विक्रमी आठ वेळा, तर रोनाल्डोने पाच वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. यापूर्वी मेसी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९, २०२१मध्ये बॅलन डी ओरचा मानकरी ठरला होता.
हालँडला डावलण्यात आले का?
मँचेस्टर सिटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारा आघाडीपटू अर्लिंग हालँडला बॅलन डी ओर पुरस्काराच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मँचेस्टर सिटीसाठी पदार्पणाच्या हंगामात सर्व स्पर्धांत मिळून हालँडने ५३ सामन्यांत ५२ गोल केले. त्याने प्रीमियर लीगमध्ये एका हंगामात सर्वाधिक गोलचा (३६) विक्रमही नोंदवला. तसेच सिटीने प्रीमियर लीग, एफए चषक आणि चॅम्पियन्स लीग या तीन मोठ्या स्पर्धांचे जेतेपद पटकावले. यात हालँडची भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळे अनेकांच्या मते तो बॅलन डी ओर पुरस्काराचा खरा मानकरी होता. २३ वर्षीय हालँड आगामी हंगामांतही या पुरस्कारासाठी शर्यतीत असणार हे निश्चित. त्याला फ्रान्स आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीपटू किलियन एम्बापेकडून आव्हान मिळत राहणे अपेक्षित आहे. विश्वचषकाच्या अंतिम लढतीत हॅटट्रिक नोंदवणारा एम्बापे यंदा बॅलन डी ओरच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी राहिला.