एफआयआयटी-जेईई कोचिंग सेंटरने देशातल्या विविध भागांतील आपली तब्बल आठ केंद्रे अचानक बंद केली आहेत. त्यामुळे बोर्ड आणि प्रवेश परीक्षांपूर्वी ही केंद्रे बंद झाल्याने हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, दिल्ली, मेरठ, गाझियाबाद, लखनौ, वाराणसी, इंदोर, भोपाळ, पाटणा, पुणे आणि अलीकडे नोएडा यांसारख्या शहरांमधील फोरम फॉर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन (एफआयआयटी-जेईई) केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. एफआयआयटी-जेईई कोचिंग सेंटर्स अचानक का बंद झालीत? हजारो विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? जाणून घेऊ.
प्रकरण काय?
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जाणारे विशेषतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी (आयआयटी-जेईई) विद्यार्थ्यांना तयार करणारे हे कोचिंग सेंटर इच्छुक अभियंत्यांसाठी एक विश्वासार्ह नाव आहे. परंतु, अलीकडील आर्थिक आणि प्रशासकीय आव्हानांचा संस्थेवर गंभीर परिणाम झालेला दिसतो, ज्यामुळे ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी ही केंद्रे अचानक बंद झाल्याने पालकदेखील आपल्या मुलांसाठी चिंतेत आहेत.
हेही वाचा : ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला वेळेपूर्वीच करताहेत सिझेरियन प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
“माझ्या मुलीचे करिअर धोक्यात घातलं”
अनपेक्षितपणे केंद्रे बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या परीक्षांच्या तयारीत व्यत्यय आला आहे. ‘न्यूज ९’च्या वृत्तानुसार, पुण्यातील दोन एफआयआयटी-जेईई केंद्रे अलीकडेच बंद पडली; ज्यामुळे ३०० हून अधिक विद्यार्थी प्रभावित झाले. त्याचप्रमाणे राजनगर जिल्ह्यातील बंदमुळे ८०० हून अधिक विद्यार्थी अडचणीत आले आहेत. ज्या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठी रक्कम गुंतवली ते आता कष्टाने कमावलेले पैसे गमावण्याच्या भीतीने चिंतेत आहेत. “माझ्या मुलीने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ‘एफआयआयटी-जेईई’च्या नोएडा केंद्रात नोंदणी केली आहे. मी जुलै २०२४ मध्ये दोन वर्षांची चार लाख रुपये इतकी फी अगोदरच जमा केली होती. आता त्यांनी केंद्र बंद केले आहे; ज्यामुळे माझ्या मुलीच्या इंजिनीयर होण्याच्या स्वप्नावर परिणाम झाला आहे. केंद्राने एक तर आमचे पैसे परत करावेत किंवा उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करावा,” असे एका पालकाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले.
पालकांच्या एका गटाने एफआयआयटी-जेईई केंद्राबाहेर आंदोलन केले आणि नोएडातील सेक्टर ५८ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे भोपाळमध्ये एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि १०० हून अधिक पालकांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाने कोचिंग सेंटरचा परवाना रद्द केला आहे. नोएडा येथील पालक राजीव कुमार चौधरी यांनी ‘न्यूज १८’ला सांगितले, “आम्ही पाच वर्षांच्या कार्यक्रमासाठी १०० टक्के फी भरली आहे, अजून दोन वर्षे बाकी आहेत. सोमवारी आम्हाला ‘एफआयआयटी-जेईई’कडून आमच्या मुलांना आकाश या संस्थेत पाठविण्याचा सल्ला देण्यात आला. आमच्या मुलाला पुढील कोचिंगसाठी कुठे पाठवायचे हे आम्ही ठरवू; एफआयआयटी-जेईई नाही.”
परंतु, आर्थिक चिंतेच्या पलीकडे पालकांना त्यांच्या मुलांच्या भवितव्याची खूप काळजी आहे. विजय कृष्ण सहाय यांच्या मुलीची पटना येथील एफआयआयटी-जेईई केंद्रात नोंदणी झाली होती. त्यांनी सांगितले की, कोणतीही पूर्वसूचना न देता, केंद्र अचानक बंद करण्यात आल्याने माझ्या मुलीच्या अभ्यासात पूर्णपणे व्यत्यय आला आणि तिचे करिअर धोक्यात आले आहे. दीपिका चौहान यांनी त्यांची मुलगी श्रुतीचे शिक्षण अचानक थांबल्याबद्दल त्यांची व्यथा सांगितली. ‘एफआयआयटी-जेईई’च्या चार वर्षांच्या प्रोग्राममध्ये नोंदणी केलेली. श्रुती तिचा इयत्ता १० वीचा अभ्यासक्रमही पूर्ण करू शकली नाही.
चौहान यांनी केंद्राला २.८३ लाख रुपये दिले. त्यांनी ‘द पायोनियर’ला सांगितले की, त्यांची मुलगी आता शैक्षणिक आणि भावनिक अशा गंभीर तणावाचा सामना करत आहे. ‘एफआयआयटी-जेईई’च्या व्यवस्थापनाने अद्याप बंद करण्याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही किंवा फी परताव्यासह चालू असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांचा हेतू कसा आहे हेदेखील अद्याप स्पष्ट केलेले नाही.
‘एफआयआयटी-जेईई’ केंद्रे का बंद पडत आहेत?
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, एफआयआयटी-जेईई केंद्रे अचानक बंद होण्यामागे मुख्य कारण म्हणजे अनेक महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. “मी तेथे चार वर्षांहून अधिक काळ शिकवीत आहे; परंतु मी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाटणा कोचिंग सेंटर सोडले. कारण- मला जुलै २०२४ पासून पगार मिळाला नव्हता,” असे एका शिक्षकाने सांगितले. मेरठ केंद्रातील व्यवस्थापन संघातील एका कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की, प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे केंद्राचे कामकाज बंद करावे लागले आहे.
“आमच्या शिक्षकांना इतर कोचिंग सेंटर्सकडून चांगल्या ऑफर मिळत असल्याने केंद्र सोडून एक आठवडा झाला आहे. आम्ही एफआयआयटी-जेईई दिल्लीच्या मुख्य कार्यालयाला परिस्थितीची माहिती दिली आहे आणि जर त्यांनी आम्हाला सुमारे ५०० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिले, तर आम्ही वर्ग पुन्हा सुरू करू,” असे ते म्हणाले. कायद्यानुसार, कंपनी दोन महिन्यांपर्यंत पगाराची देयके पुढे ढकलू शकते; परंतु केवळ लक्षणीय नुकसानीत असेल तेव्हाच. त्यापलीकडे पगार देणे बंधनकारक आहे. जरी मालमत्ता विकायची गरज असली तरी, असे नोएडा-आधारित रोजगार एजन्सीचे कॉर्पोरेट वकील शशिशेखर त्रिपाठी यांनी ‘रिपब्लिक बिझनेस’शी बोलताना सांगितले.
‘एफआयआयटी-जेईई’ संस्था या स्थितीत कशी पोहोचली?
‘एफआयआयटी-जेईई’वरील संकट प्रशासकीय त्रुटी, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि अयोग्य कार्य संस्कृतीमुळे उद्भवले. ‘एनडीटीव्ही’नुसार, संस्थेला परवाना आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नागरी आणि प्रशासकीय कारवाईचा सामना करावा लागला. संस्थेवर कोचिंग ऑपरेशन्समधून निधी वळवल्याचा आरोप आहे, हे संस्थेच्या आर्थिक संकटासाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि प्राध्यापक सदस्य दोघांचेही नुकसान झाले आहे. पुढे संस्थेला फिजिक्सवाला आणि अनॅकॅडमी यांसारख्या या क्षेत्रामधील स्पर्धकांमुळे वाढलेल्या स्पर्धेचाही सामना करावा लागला आहे.
हेही वाचा : एलॉन मस्कचं विकिपीडियाविरोधात मोठं पाऊल; नाझी सॅल्यूटवरून नव्या वादाची सुरुवात, प्रकरण काय?
‘एफआयआयटी-जेईई’चे संस्थापक डी. के. गोयल हे आयआयटी दिल्लीचे मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदवीधर आहेत. त्यांना अलीकडेच कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे. डिसेंबर २०२४ मधील एका व्हिडीओमध्ये गोयल विविध केंद्रप्रमुखांशी व्हर्च्युअल मीटिंगमध्ये शिवीगाळ करताना दिसले; ज्यामुळे कंपनीमध्ये कामाचे वातावरण योग्य नसल्याचे आरोप केले गेले. सुमारे तीन दशकांपूर्वी स्थापन झालेल्या, ‘एफआयआयटी-जेईई’ने अभियांत्रिकी आणि नीट प्रवेश परीक्षांसाठीचे विशेष प्रशिक्षण, तसेच इयत्ता आठवी, नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांसाठीचा मूलभूत कार्यक्रम यांद्वारे नावलौकिक मिळविला. संस्था ४१ शहरांमध्ये ७२ केंद्रे चालवते आणि या संस्थेत ३०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd