Nirmala Sitharaman’s Madhubani Saree: आज २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी तयार केलेली मधुबनी कलेने समृद्ध असलेली साडी परिधान केली. दुलारी देवी २०२१ च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी मधुबनीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली होती. अर्थसंकल्प सादरीकरणासाठी अर्थमंत्री सीतारमण यांच्या साडीच्या निवडीकडे सातत्याने लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. २०२३ साली त्यांच्या सातव्या केंद्रीय अर्थसंकल्पीय सादरीकरणासाठी त्यांनी सोनेरी डिझाइनसह मॅजेन्टा बॉर्डर असलेली पांढरी रेशमी साडी निवडली होती. या वर्षाच्या सुरुवातीला अंतरिम अर्थसंकल्पात त्या निळ्या हातमागाच्या साडीत दिसल्या. २०१९ साली त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय सादरीकरणात सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलगिरी साडी परिधान केली होती. त्या वर्षी ब्रीफकेसऐवजी पारंपारिक ‘बही खाता’चा पहिला वापर करण्यात आला होता.
अर्थसंकल्पीय कागदपत्रे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या लाल रेशमी कापडाने बंदिस्त करण्यात आली होती. २०२० साली सीतारमण यांनी पिवळी-सोनेरी रेशमी साडी निवडली होती. २०२१ च्या सादरीकरणात त्यांनी लाल आणि ऑफ-व्हाइट पोचमपल्ली रेशमी साडी परिधान केली होती. ज्यावर इकतचे डिजाईन आणि हिरवी बॉर्डर होती. तेलंगणातील भूदान पोचमपल्ली येथे तयार केलेल्या पोचमपल्ली इकतमुळे या शहराला भारताचे ‘रेशमी शहर’ म्हणून ओळखले जाते.
२०२२ साली निर्मला सीतारमण यांनी ओडिशाची बोमकाई साडी निवडली होती. गेल्या वर्षीच्या सादरीकरणासाठी त्यांनी लाल टेम्पल साडी परिधान केली होती, ज्यावर काळ्या बॉर्डरवर सोनेरी काम केले होते. सीतारमण दिवंगत मोरारजी देसाई यांच्या सलग सहा सादरीकरणांना मागे टाकत सलग सातवे बजेट सादर करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या या अर्थसंकल्पासाठी महत्त्वाची ठरलेली मधुबनी कला नेमकी काय आहे याविषयी घेतलेला हा आढावा.
मधुबनी: एक लोककला
मधुबनी बिहारमधील एक लोककला आहे. या कलेचा जन्म बिहारमध्ये दरभंगा जिल्ह्यातील मधुबनी या खेड्यात झाला. झोपड्यांच्या भिंतींवर, जमीन व देवघर सुशोभित करण्यासाठी ग्रामीण आदिवासी स्त्रिया रंगीत चित्रे काढीत, तीच चित्र मधुबनी चित्रकला म्हणून प्रसिद्ध आहे. या चित्रांमध्ये रामायण, महाभारत, अन्य पुराणकथांमधील वेगवेगळे प्रसंग तसेच देवदेवता आणि शुभसूचक चिन्हांचा समावेश असे. ही कला वंशपरंपरेने आजही टिकून आहे. ही लोककला झेपड्यांमधील भिंतींवरून हळूहळू कापडावर व नंतर कागदावर उतरली. असे असले तरी या कलेने आपले मूळ रूप गमावलेले नाही. या कलेत असलेला स्थानिक मातीतील, निसर्गातील साधेपणा, रंगरंगोटी मन मोहून घेतो. या चित्रांमधील वेलबुट्टीमध्ये पानाफुलांचे शैलीकरण आणि परंपरेतून आलेली आकृतिबंधाची उपजत जाणीव तसेच टोकदार नाक, अरुंद कपाळ, मत्स्याकृती डोळे, धडापासून वेगळे वाटणारे सैलसर व लांब हातपाय ही या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. ग्रीसमधील प्राचीन क्रीट संस्कृतीतील चित्रांतील व्यक्तींशी हे व्यक्तिचित्रण आश्चर्यकारक साम्य दर्शवते असे मराठी विश्वकोशात म्हटले आहे.
रामायणाची परंपरा
प्रतिभा वाघ यांनी अखंड चित्र साधना या आपल्या चतुरंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, “मधुबनी चित्रं द्विमित असतात. आकाराची बाह्य़रेषा दुहेरी असते. या दोन रेषा म्हणजे सत्य आणि शिव या दोघांनी मिळून सृष्टीची रचना होते, असं मधुबनी चित्रकार मानतात. नैसर्गिक पद्धतीचे रंग, भिंत, कागद, कापड हा पृष्ठभाग आणि पौराणिक, सामाजिक, नैसर्गिक विषय. आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे आलेली, स्त्रियांनी जपलेली ही कलापरंपरा असून सर्वाधिक चित्रं रामायण या विषयावर आणि आवडता विषय ‘सीता स्वयंवर’ असतो. ‘मधुबनी’ ही कला रामायण काळापासून आहे असं मानलं जातं. मिथिला हे जनकाचं राज्य, सीता ही त्यांची दुलारी.”
चित्रांमध्ये नैसर्गिक रंगांची उधळण/ The Global Fame of Madhubani Art
या चित्रांसाठी वापरण्यात येणारे रंग हे स्थानिक वनस्पती व नैसर्गिक साधनांपासून तयार केलेले असतात. त्यांत नैसर्गिक चमक व टवटवीतपणा दिसतो. कुसुंबा या फुलापासून झगमगता शेंदरी (कुसुंबी) रंग तर केळीच्या पानांचा रस, दूध व पातळ चुना यांच्या मिश्रणातून फिका सोनेरी हळदीचा गडद पिवळा तर कोळशाच्या धुराच्या काजळीचा गडद काळा तर पळसाच्या फुलांपासून पिवळा आणि वेलींच्या पानांपासून हिरवा असे नैसर्गिक रंग चित्रांमध्ये चैतन्य आणतात. चित्र रंगवताना बाभळीच्या झाडाच्या डिंकात शेळीचे दूध मिसळून ते मिश्रण बंधकद्रव्य म्हणून वापरतात. बांबूची काडी टोकाला घासून व कुंचल्यासारखी करून सूक्ष्म तपशिलांचे व बाह्यरेषांचे रंगांकन करण्यासाठी वापरतात. काडीच्या टोकाला छोटीशी चिंधी बांधून ती रंगांचे मोठे हात देण्यासाठी वापरली जाते. दूर अंतरावरून चित्र पाहिले असता या सर्व चमकदार रंगांची संगती बेमालूम साधलेली दिसते (संदर्भ: मराठी विश्वकोश).
मधुबनी गावात आज अनेक स्त्रिया मोठ्या प्रमाणावर चित्रे तयार करतात. ऑल इंडिया हँडिक्राफ्ट्स बोर्ड या संस्थेने या चित्रांच्या खरेदी-विक्रीची सोय केली आहे. ही चित्रशैली संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली याचे श्रेय झॉर्झ ल्यूनो या फ्रेंच प्रवाशाला जाते. त्याने बिहारमध्ये राहून मधुबनी चित्रशैलीवर माहितीपट तयार केला, जो पाश्चिमात्य देशांत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात आला. आज ही चित्रे कॅनडा, पोलंडसह अनेक पाश्चिमात्य देशांत निर्यात केली जातात.
कोण आहेत दुलारीदेवी? Who is Dulari Devi?
बिहारमधील मधुबनीसाठी दुलारी देवींना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा असा सातवा पुरस्कार आहे. बिहारमधील दुलारी देवींचा ‘पद्मश्री’ पुरस्कारापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. बिहारमधील मधुबनी जिल्ह्य़ामधील राटी या छोटय़ा गावात एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईवडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचं लग्न लावून दिलं होत. सासरी त्यांच्या नशिबी वेदनाच आल्या. काही वर्षे त्यांनी कशीबशी काढली. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. परंतु, सहा महिन्यांची असतानाच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. नंतर त्या माहेरी परत आल्या त्या कायमच्याच.
माहेरी परत आल्यावर त्या आपल्या आईसोबत घरकाम करू लागल्या. त्यांनी पद्मश्री महासुंदरीदेवी आणि त्यांच्या जाऊबाई चित्रकार कर्पूरीदेवी यांच्या घरी काम करण्यास सुरुवात केली होती. केर-लादी करताना, भांडी घासताना अधूनमधून दुलारी देवी त्या दोघींच्या चित्रांचं निरीक्षण करत असतं. दुलारी देवी सांगतात, ‘‘मी चित्र करायला शिकले तेव्हापासून चित्रनिर्मितीला मी देवपूजा मानते. एक दिवस जरी ही पूजा माझ्या हातून घडली नाही तरी मी अस्वस्थ होते.’’ कर्पुरीदेवींनी त्यांना मुलीप्रमाणे मानलं आणि खूप प्रेम दिलं. दुलारी देवी त्यांना ‘दायजी’ म्हणत. शासनातर्फे मधुबनी चित्रकलेचा एक प्रशिक्षण कार्यक्रम कर्पुरीदेवींकडे राबवला जाणार होता. त्या कार्यक्रमात दुलारीदेवी सामील झाल्या. बॉर्डर, रेषा, स्केच या गोष्टी दुलारी देवी शिकल्या. दायजींनी त्यांना स्वत:चं नाव आणि गावाचं नाव लिहिण्यासही शिकवलं. दुलारी देवी सांगतात की, “कर्पूरीदेवी स्पृश्य-अस्पृश्य भेद मानत नसत. त्यांनी त्यांच्या घरी मला राहाण्यास सांगितलं, आईसारखी माया दिली.” याचेच फलित म्हणून दुलारी देवी उत्तम चित्र काढू लागल्या. १९९९ साली त्यांच्या चित्राला ललित कलेचा पुरस्कार मिळाला. २०१२ मध्ये राज्य पुरस्कार मिळाला. शिक्षाकला माध्यम संस्थेद्वारे बंगळूरुमधील विविध शिक्षण संस्था, सरकारी, गैरसरकारी इमारतींच्या भिंतींवर मधुबनी चित्रं काढण्याचं काम सलग पाच वर्ष त्यांनी केलं. भारतात अनेक ठिकाणी मधुबनी चित्रांच्या कार्यशाळा घेतल्या. बिहारची राजधानी पटना येथील कलासंग्रहालयात त्यांचं ‘कमलेश्वरी’ हे कमलानदी पूजेचं चित्र आहे. ‘तारा बुक’तर्फे ‘फॉलोइंग माय पेंट ब्रश’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. यात दुलारी देवीची आत्मकथा चित्ररूपात आहे. मार्टिन ली कॉज यांच्या ‘अ मिथिला’ या फ्रेंच भाषेतील पुस्तकात दुलारी देवींच्या पेंटिंगचं सुंदर वर्णन आलं आहे. राटी गावातील मधुबनी चित्रांचं वैशिष्टय़ म्हणजे फक्त एका रंगातील, रेषांमधील चित्र. या प्रकाराला ‘कझनी’ असं म्हणतात. तर रंग भरलेल्या चित्राला ‘भरनी’ असं म्हणतात. कझनी आणि भरनी या दोन्ही तंत्रांत दुलारी देवी कुशल आहेतच, याशिवाय ‘धरती भरना’ (पार्श्वभूमी पूर्णपणे रंगवणं), चित्राच्या सर्व बाजूंनी विस्तृत किनार, उत्स्फूर्तता, सहजता, हे सर्व त्या उत्तम प्रकारे साधतात (संदर्भ: अखंड चित्र साधना: प्रतिभा वाघ, लोकसत्ता).
मधुबनी चित्रकला केवळ एक लोककला नसून, ती संपूर्ण जगात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरली आहे. दुलारी देवींसारख्या कलाकारांनी या कलेला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मधुबनी कलेने समृद्ध असलेली साडी परिधान करून या कलेचा गौरव केला आहे. यामुळे केवळ बिहारमधील या प्राचीन परंपरेला नवसंजीवनी मिळत नाही, तर भारतीय हस्तकलेला जागतिक व्यासपीठावर महत्त्व मिळते. मधुबनी चित्रशैली आणि तिच्या कलाकारांचा हा गौरव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.