Historic Pharaoh’s Tomb Discovered After 100 Years: पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी लक्सरजवळ (Luxor) फॅरो थटमोस दुसऱ्याचे हरवलेले थडगे शोधून काढले आहे. हे थडगे शतकानुशतके जमा झालेल्या पुराच्या गाळाखाली गाडले गेले होते. या थडग्यावर कोरलेल्या शिलालेखामुळे हे थडगे अल्पकाळ राज्य केलेल्या अठराव्या राजवंशातील शासकाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. किंग्ज व्हॅलीमध्ये सापडलेले हे थडगे १९२२ साली तुतानखामुनच्या थडग्याच्या शोधानंतर पहिल्यांदाच सापडले आहे. म्हणजे तब्बल १०० वर्षांनी फॅरोचे आणखी एक थडगे समोर आले आहे. यामुळे इतिहासावर नेमका कोणता प्रकाश पडणार आहे, या विषयाचा घेतलेला हा वेध.

या शोधामुळे इजिप्तच्या आजवर न उलगडलेल्या साम्राज्याच्या कालखंडाबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटीश आणि इजिप्शियन पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या एका चमूने लक्सरजवळ फॅरो थटमोस दुसऱ्याचे हरवलेले थडगे शोधले असून गेल्या शंभर वर्षांत सापडलेले हे राजघराण्यातील पहिले थडगे आहे. हा महत्त्वपूर्ण शोध १९२२ साली हॉवर्ड कार्टर यांनी तुतानखामुनचे थडगे शोधल्यानंतरचा आजवरचा सर्वात मोठा शोध मानला जात आहे. न्यू किंगडम रिसर्च फाउंडेशनचे डॉ. पियर्स लिथरलँड यांच्या नेतृत्वाखाली आणि इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाच्या सहकार्याने ही संयुक्त मोहिम राबवण्यात आली. संशोधकांनी किंग्ज व्हॅलीच्या पश्चिम भागात हे थडगे शोधले. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी थडग्याची ओळख यातील अलाबास्टरच्या मृण्मय पात्रांवर कोरलेल्या शिलालेखांमधून निश्चित केली. या पात्रांवर फॅरो थटमोस दुसरा आणि त्याची पत्नी राणी हत्शेपसुत यांचे नाव आढळले आहे. हत्शेपसुत (Hatshepsut) ही इजिप्तमधील सर्वात प्रसिद्ध स्त्री फॅरोंपैकी एक होती.

थडग्याचे महत्त्व

थटमोस दुसरा (Thutmose II) हा अठराव्या राजवंशातील चौथा शासक होता. त्याच्या थडग्याचा शोध लागणे महत्त्वाचे होते. कारण, हे त्या कालखंडातील शेवटच्या नामशेष झालेल्या राजघराण्यातील दफनस्थळ आहे. इसवी सनपूर्व १४९३ ते १४७९ या अल्पकाळाच्या कारकिर्दीतही थटमोस दुसऱ्याने इजिप्तच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः तो राणी हत्शेपसुतचा पती होता. या राणीने स्वतः फॅरो म्हणून राज्य केले आहे.

क्लेअर इसाबेला गिल्मर यांच्या लेखात याविषयी सविस्तर माहिती मिळते. त्यांचा यासंबंधी द कन्व्हर्सेशनमध्ये लेख प्रसिद्ध झाला आहे. क्लेअर इसाबेला गिल्मर या ब्रिस्टल विद्यापीठात विद्यार्थी संशोधक आहेत. संशोधकांच्या चमूला थडग्याचा शोध घेत असताना मोठे जिने आणि भव्य उतरणारी वाट सापडली. त्यामुळे हे राजघराण्यातील थडगे असल्याचे स्पष्ट झाले. आत प्रवेश केल्यानंतर पुरातत्त्वशास्त्रज्ञांना छतावर निळ्या पार्श्वभूमीवर पिवळ्या तारांचे नक्षीकाम आढळले. ही खास डिझाइन केवळ इजिप्शियन राजांच्या थडग्यांसाठी वापरण्यात येत असे. शिवाय, अंत्यसंस्कार कक्षामध्ये अमडुआत (Amduat) नावाच्या प्राचीन धार्मिक ग्रंथातील दृश्ये कोरलेली होती. हा ग्रंथ फक्त फॅरोंच्या थडग्यांसाठी राखीव असतो. त्यामुळे हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

डॉ. पियर्स लिथरलँड या शोधाबाबत सांगतात, “हा शोध प्राचीन इजिप्तमधील एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतो. अठराव्या राजवंशाच्या सुरुवातीच्या राजांच्या थडग्यांची नेमकी जागा म्हणजेच तुतानखामुनच्या पूर्वजाचे हे थडगे कधीही सापडले नव्हते. यापूर्वी असे मानले जात होते की, हे थडगे किंग्ज व्हॅलीच्या दुसऱ्या टोकाला असावे. सुरुवातीला आम्हाला वाटले की, हे एखाद्या राजपत्नीचे थडगे असावे, परंतु विस्तृत जिने आणि भव्य प्रवेशद्वार पाहून हे काहीतरी अधिक महत्त्वाचे असल्याचे लक्षात आले. विशेषतः जेव्हा आम्हाला अंत्यसंस्कार कक्षामध्ये अमडुआत ग्रंथातील दृश्ये आढळली. तेव्हा आम्ही समजून गेलो की, हे निश्चितपणे एका फॅरोचेच थडगे आहे.”

उत्खननातील आव्हाने

उत्खनन प्रक्रिया अनेक अडचणींनी भरलेली होती. थटमोस दुसऱ्याच्या अंत्यसंस्कारानंतर सुमारे सहा वर्षांनी आलेल्या पुरामुळे थडग्याला मोठे नुकसान झाले होते. पाण्याच्या गळतीमुळे थडगे गाळ आणि चुनखडीच्या तुकड्यांनी भरले होते. त्यामुळे आत प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले. संशोधकांना अवघ्या ४० सेंटीमीटर रुंद असलेल्या अरुंद वाटेतून सरपटत जावे लागले. तेव्हाच ते अंत्यसंस्कार कक्षापर्यंत पोहोचू शकले. कक्ष साफ केल्यानंतर त्यांना असे वाटले की, तिथे पुरलेल्या अवशेषांचा शोध लागेल, पण थडगे पूर्णपणे रिकामे होते. मात्र, हे लुटारूंनी लुटले नव्हते, तर जाणीवपूर्वक सर्व वस्तू हलवण्यात आल्या होत्या.

संशोधकांच्या मते २१ व्या राजवंशाच्या अधिकाऱ्यांनी थटमोस दुसऱ्याचे अवशेष आणि अंत्यसंस्कारसाठी ठेवलेली मौल्यवान वस्त्रे थेब्सच्या डोंगरातील एका गुप्त ठिकाणी हलवली असावीत. याचे कारण म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि संभाव्य थडगे लुटणाऱ्यांचा धोका होते. इजिप्तचे पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्री शरीफ फाथी यांनी या शोधाचे विशेष कौतुक केले आणि याला इजिप्शियन पुरातत्त्वशास्त्रासाठी एक मोठा शोध म्हणून घोषित केले. त्यांनी म्हटले की, “१९२२ मध्ये किंग तुतानखामुनच्या अंत्यसंस्कार कक्षाच्या ऐतिहासिक शोधानंतर सापडलेले हे पहिले राजघराण्यातील थडगे आहे. हा शोध मानवतेच्या सांस्कृतिक इतिहासाच्या समजुतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

थटमोसचा वारसा

थटमोस दुसऱ्याची परंपरा त्याची पत्नी हत्शेपसुतशी घट्ट जोडलेली आहे. त्याच्या मृत्यूनंतर हत्शेपसुतने सत्तेवर कब्जा केला आणि इजिप्तच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली शासकांपैकी एक ठरली. त्यांच्या मुलाने थटमोस तिसऱ्याने नंतर इजिप्तच्या इतिहासातील एक महान लष्करी योद्धा म्हणून ख्याती मिळवली. थटमोस दुसऱ्याचा राज्यकाल तुलनेने कमी काळासाठी होता, परंतु त्याचा प्रभाव त्याच्या वारसदारांमधून कायम राहिला.

त्याच्या कारकिर्दीत लष्करी मोहिमा मुख्यतः नुबियामध्ये झाल्या. परंतु, त्याने मोठ्या प्रमाणात स्मारक किंवा वास्तुशास्त्रीय प्रकल्प उभारले नाहीत. संशोधकांचे मत आहे की, त्याला दीर्घकालीन आजार होता. ते त्याच्या अकाली मृत्यूचे एक संभाव्य कारण असू शकते. न्यू किंगडम रिसर्च फाउंडेशन सध्या त्या दुसऱ्या थडग्याचा शोध घेत आहे. या दुसऱ्या थडग्यात थटमोस दुसऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी ठेवलेल्या वस्तू हलवण्यात आल्या असाव्यात. मोहसिन कामेल या उत्खनन मोहिमेचे सहाय्यक संचालक यांनी ब्रिटिश माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “थटमोस दुसऱ्याच्या दुसऱ्या आणि शक्यतो अद्याप अखंड असलेल्या थडग्याचा शोध लागण्याची शक्यता खूपच थक्क करणारी आहे.”

सी ४ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या थडग्याचा शोध इजिप्तच्या प्राचीन इतिहासाच्या कोड्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. जरी हे लक्सरमध्ये तुतानखामुनच्या थडग्यानंतर सापडलेले पहिले राजघराण्यातील थडगे असले, तरी याआधी इतर राजवंशीय थडगीही वेगळ्या ठिकाणी सापडली आहेत. १९३० च्या दशकात पिएर माँटे यांनी तॅनिस येथे अशाच राजघराण्यातील थडग्यांचे उत्खनन केले होते. मात्र, सी ४ विशेष महत्त्वाचे आहे. कारण यामुळे अठराव्या राजवंशातील हरवलेल्या राजघराण्यातील थडग्यांची यादी पूर्ण झाली आहे.

इतर गमावलेल्या थडग्यांचा शोध

थटमोस दुसऱ्याच्या थडग्याचा पुन्हा सापडलेला शोध इतर हरवलेल्या राजघराण्यातील थडग्यांचा शोध लागण्याची आशा निर्माण करतो. अजूनही सापडायची असलेली थडगी म्हणजे नेफरतीती, रामेसेस तेरावा, क्लेओपात्रा सातवी, अलेक्झांडर द ग्रेट आणि तुतानखामुनची पत्नी अंक्हेसनामुन यांची आहेत. या पैकी काही थडगी कधीही सापडणार नाहीत, परंतु न्यू किंगडम रिसर्च फाउंडेशनच्या यशस्वी शोधामुळे भविष्यात नवीन शोध लागण्याची शक्यता अद्याप कायम आहे.

Story img Loader