अन्वय सावंत
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा नवा हंगाम म्हटला की चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो. यंदाचा हंगामही त्याला अपवाद ठरलेला नाही. ‘आयपीएल’च्या १६व्या हंगामाची धडाक्यात सुरुवात झाली आहे. सर्वच संघांचा एकेक सामना झाला असून क्रिकेटरसिकांचे प्रचंड मनोरंजन झाले आहे. परंतु यंदाच्या हंगामाला काही नामांकित खेळाडूंच्या दुखापतींचे गालबोट लागले आहे. जवळपास सर्वच संघांना काही प्रमुख जायबंदी खेळाडूंची उणीव जाणवते आहे. आतापर्यंत कोणत्या संघाला आपल्या कोणत्या प्रमुख खेळाडूविना खेळावे लागले आहे, याचा आढावा.
गुजरात टायटन्स
जायबंदी खेळाडू : केन विल्यम्सन
गतविजेत्या गुजरातच्या संघाला यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. गेल्या हंगामात गुजरातला आघाडीच्या फळीत अनुभवी परदेशी फलंदाजाची कमतरता जाणवली होती. त्यामुळे त्यांनी खेळाडू लिलावात न्यूझीलंडचा भरवशाचा फलंदाज केन विल्यम्सनला खरेदी केले होते. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सलामीच्या लढतीत विल्यम्सनला अंतिम ११ जणांमध्ये स्थानही मिळाले. मात्र, क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर षटकार वाचवण्याच्या प्रयत्नात विल्यम्सनच्या पायाला दुखापत झाली. त्याने उंच सूर मारला आणि खाली येताना त्याच्या शरीराचा पूर्ण भार उजव्या गुडघ्यावर आला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला सामन्यात पुढे खेळता आले नाही. तसेच ही दुखापत फार गंभीर असल्याने त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्स
जायबंदी खेळाडू : जसप्रीत बुमरा, झाय रिचर्डसन</strong>
पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला यंदाच्या हंगामात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराविनाच खेळावे लागणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमरा गेल्या सप्टेंबरपासून एकही सामना खेळलेला नाही. न्यूझीलंड येथे बुमराच्या पाठीवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बुमरा भारतात परतला असला, तरी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईला यंदा त्याच्याविनाच खेळण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. त्याच्या जागी मुंबईने तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरला करारबद्ध केले आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनही पायाच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात खेळणार नाही. रिचर्डसनची जागा घेणाऱ्या खेळाडूची मुंबईने अद्याप निवड केलेली नाही.
कोलकाता नाइट रायडर्स
जायबंदी खेळाडू : श्रेयस अय्यर
बुमराप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आणि भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. श्रेयस ‘आयपीएल’च्या पूर्वार्धाला मुकणार हे निश्चितच आहे. तसेच अखेरच्या टप्प्यातील सामन्यांसाठी त्याच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे. श्रेयसला गेल्या काही काळापासून पाठदुखीने सतावले आहे. त्याने शस्त्रक्रियेस नकार दर्शवला असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. श्रेयसला या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील दोन सामने आणि संपूर्ण एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले होते. आता त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणा कोलकाता संघाचे नेतृत्व करत आहे.
दिल्ली कॅपिटल्स
जायबंदी खेळाडू : ऋषभ पंत</strong>
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले आहे. पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या; परंतु त्याला दुखापतींतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी बराच काळ लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे तो यंदाच्या संपूर्ण ‘आयपीएल’ हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी दिल्ली संघाने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच बंगालचा युवा यष्टिरक्षक अभिषेक पोरेलला संघात स्थान दिले आहे. परंतु लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत मुंबईकर सर्फराज खानने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली होती. मात्र, त्याला सफाईदार यष्टिरक्षण करता आले नाही. तसेच फलंदाजीतही पंतच्या डावखुरेपणाची कमी दिल्लीच्या संघाला जाणवली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
जायबंदी खेळाडू : रजत पाटीदार, जोश हेझलवूड, विल जॅक्स
फलंदाज रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे बंगळूरु संघासाठी गेल्या हंगामात चमकदार कामगिरी करणारे खेळाडू यंदाच्या हंगामातील पूर्वार्धाला मुकणे अपेक्षित आहे. पाटीदार आणि हेझलवूड या दोघांनाही पायाच्या दुखापतींनी सतावले आहे. मात्र, हे दोघे काही काळानंतर पुनरागमन करतील अशी बंगळूरु संघाला आशा आहे. परंतु इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार असून त्याच्या जागी न्यूझीलंडचा आक्रमक अष्टपैलू मायकल ब्रेसवेलची बंगळूरुच्या संघात निवड करण्यात आली आहे.
पंजाब किंग्ज
जायबंदी खेळाडू : जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन
इंग्लंड आणि पंजाब किंग्जचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाला मुकणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ३३ वर्षीय बेअरस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बेअरस्टोने गेल्या आठवड्यात पुन्हा फलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली. परंतु ‘आयपीएल’मध्ये खेळण्यासाठी त्याला इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून (ईसीबी) ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. बेअरस्टोची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा नवोदित अष्टपैलू मॅथ्यू शॉर्टला पंजाब किंग्जने करारबद्ध केले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनही पायाच्या दुखापतीतून नुकताच सावरला आहे. मात्र, त्याला ‘ईसीबी’कडून ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु तो कोलकाताविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकला.
राजस्थान रॉयल्स
जायबंदी खेळाडू : प्रसिध कृष्णा
राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा पाठीच्या दुखापतीमुळे यंदा ‘आयपीएल’मध्ये खेळू शकणार नाही. प्रसिधने ऑगस्ट २०२२ नंतर एकही सामना खेळलेला नाही. सध्या तो आपल्या दुखापतीतून सावरत आहे, अशी माहिती राजस्थान रॉयल्स संघाने दिली आहे. प्रसिधची जागा घेण्यासाठी राजस्थान संघाने ‘आयपीएल’मधील अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्माला करारबद्ध केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज
जायबंदी खेळाडू : काएल जेमिसन, मुकेश चौधरी
महाराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने चेन्नई सुपर किंग्जसाठी गेल्या ‘आयपीएल’मध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने पदार्पणाच्या हंगामात १३ सामन्यांत १६ गडी बाद केले होते. त्यामुळे तो यंदा कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मुकेशच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तसेच न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज काएल जेमिसनही पाठीच्या दुखापतीमुळेच स्पर्धेत खेळू शकणार नाही. या दोघांच्या जागी चेन्नई संघाने आकाश सिंह आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसान्डा मगाला यांची निवड केली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स
जायबंदी खेळाडू : मोहसिन खान
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानने गेल्या ‘आयपीएल’मध्ये पदापर्णात प्रभाव पाडला होता. त्याने ९ सामन्यांत १४ बळी मिळवल्याने त्याचा भारतीय संघासाठीही विचार केला जात होता. यंदा पुन्हा दमदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याची त्याला संधी होती. परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे मोहसिनला यंदाच्या हंगामातील बहुतांश सामन्यांना मुकावे लागणार आहे. लखनऊसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.