‘बर्ड फ्लू’चे (H5N2) संक्रमण झाल्याने मेक्सिकोमधील एका ५९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी (५ जून) दिली आहे. याआधी कधीही H5N2 या विषाणूची लागण झाल्याने मानवी मृत्यू झाला असल्याची नोंद झालेली नव्हती. त्यामुळे या मृत्यूनंतर तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. मेक्सिकोमधील या वृद्धाचा मृत्यू २४ एप्रिल रोजी झाला आहे. मात्र, हा वृद्ध मृत्यूपूर्वी कधीही कोंबडी, कुक्कुटपालन व्यवसाय अथवा इतर प्राण्यांच्या संपर्कात आलेला नव्हता. त्यामुळे बर्ड फ्लूच्या विषाणूच्या प्रसाराविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना इतकी चिंताजनक का आहे? तज्ज्ञ काय सांगतात?
हेही वाचा : ‘या’ देशातील संपूर्ण बेटच जाणार समुद्राखाली; ३०० कुटुंबांचे करणार स्थलांतर, कारण काय?
‘एव्हियन इन्फ्लूएंझा’ म्हणजे काय?
एव्हियन इन्फ्लूएंझा (Avian Influenza) या संक्रमणाला सर्वसामान्य भाषेत ‘बर्ड फ्लू’ असे म्हटले जाते. हे प्रामुख्याने पक्ष्यांना होणारे विषाणूंचे संक्रमण आहे. या विषाणूचे काही प्रकारही आहेत. सामान्यत: बर्ड फ्लूचा विषाणू H5N1 या नावाने ओळखला जातो. याआधी बर्ड फ्लूच्या H5N1 या विषाणूचे मानवांमध्ये झालेल्या संक्रमणामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र, मेक्सिकोमध्ये वृद्धाचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूच्या H5N2 विषाणू प्रकारामुळे झाला आहे. हा विषाणू मानवात आढळण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. थोडक्यात, बर्ड फ्लूच्या विषाणूचे काही प्रकार हे मानवालाही संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे अगदी करोना विषाणूच्या संक्रमणामुळे जशा श्वासोच्छ्वासाच्या समस्या निर्माण होतात, अगदी तशाच बर्ड फ्लूच्या संक्रमणामुळेही होतात आणि त्यामुळे जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. एव्हियन इन्फ्लूएंझाच्या संक्रमणामुळे निर्माण होणारी लक्षणे ही एखाद्या सामान्य फ्लूसारखीच असतात. त्यामध्ये ताप येणे, खोकला येणे, घशात खवखवणे, अंगदुखी जाणवणे, श्वासोच्छ्वास घ्यायला प्रचंड त्रास होणे इत्यादींचा समावेश असतो.
मेक्सिकोमधील व्यक्तीचा मृत्यू चिंताजनक का?
मेक्सिकोमधील वृद्धाचा H5N2 विषाणूच्या संक्रमणामुळे झालेला मृत्यू हा चिंताजनक मानला जात आहे. कारण, ही व्यक्ती कधीही संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याची शक्यता नव्हती. संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आल्यानंतर या विषाणूची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. मात्र, असे काहीही घडलेले नसताना मेक्सिकोमधील वृद्धाच्या शरीरात हा विषाणू सापडल्यामुळे या विषाणूच्या प्रसाराची क्षमता सिद्ध होताना दिसत आहे. विषाणूने संक्रमित कोंबडीच्या थेट संपर्कात न येताही मानवाला संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूची असल्याचे यावरून सिद्ध होते आहे, ही चिंताजनक बाब आहे.
थोडक्यात, तुम्ही कोंबड्यांच्या संपर्कात आला नाहीत तर तुम्ही सुरक्षित आहात, असे ठरणार नाही. तुम्ही संक्रमित अथवा असंक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आलात अथवा नाही आलात, तरीही बर्ड फ्लूच्या विषाणूची लागण होण्याचा धोका या प्रकरणावरून अधोरेखित होताना दिसतो आहे. एव्हियन इन्फ्लूएंझा हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांना लक्ष्य करतो. मात्र, या विषाणूचे काही प्रकार जसे की, H5N1 हे मानवामध्येही संक्रमित होऊ शकतात. या संक्रमणामुळे श्वसनमार्गासंबंधीच्या समस्या आणि काही प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो.
एव्हियन इन्फ्लूएंझाला ‘झुनॉटिक डिसीजेस’ म्हणून ओळखले जाते. प्राण्यांपासून माणसांना आणि माणसांपासून प्राण्यांना होणाऱ्या आजारास जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये तीव्र दाहक- झुनॉटिक आजार म्हणून उल्लेखलेले आहे. सीसीएचएफ, इबोला व्हायरस, सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू हे सगळे आजार यामध्ये मोडतात. कुक्कुटपालन उद्योगाचे जागतिक स्वरूप आणि त्यांचे होणारे आंतरराष्ट्रीय दळवळण पाहता हा विषाणू अल्प कालावधीमध्ये संपूर्ण जगभरात पसरू शकतो आणि करोनासारखाच हाहाकार माजवू शकतो. त्यामुळे प्रसंगी सार्वजनिक आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचीही वेळ येऊ शकते. अर्थात, एव्हियन इन्फ्लूएंझाचे मानवी संक्रमण होण्याचे प्रकार दुर्मीळ असले तरीही आरोग्याच्या दृष्टीने त्या संदर्भात खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. याआधी अशा प्रकारे हा विषाणू मानवी शरीरामध्ये संक्रमित होण्याचे प्रकरण आढळले नव्हते, त्यामुळेच या विषाणूबाबतची चिंता तज्ज्ञांमध्ये वाढली आहे.
याआधी बर्ड फ्लूची लागण झाल्याची उदाहरणे
एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू मानवी शरीरात संक्रमित होण्याचे हे प्रकरण नवे नाही. बर्ड फ्लूच्या H5N1 या विषाणूच्या प्रकाराच्या संक्रमणामुळे सर्वात पहिल्या मानवी मृत्यूची नोंद १९९७ साली करण्यात आली. मात्र, प्राण्यांच्या थेट संपर्कात न येताही या विषाणूचे संक्रमण होण्याची मेक्सिकोमधील घटना पहिलीच आहे, त्यामुळेच ती खबरदारी घेण्याचे आणि चिंता व्यक्त करण्याचे कारण ठरते.
जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले?
जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकरणावर काही खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणण्यास सांगितले आहे. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारची दक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आरोग्य संघटनेने भर दिला आहे. आजारी असलेल्या किंवा मृत पक्ष्यांशी संपर्क पूर्णत: टाळणे, पोल्ट्री उत्पादने पूर्णपणे शिजवणे आणि मगच त्यांचे सेवन करणे; अर्धे-कच्चे शिजवून सेवन करणे टाळणे, विषाणूची लागण झाल्यानंतर होणारे मृत्यू टाळण्यासाठी तातडीने खबरदारीचे उपाय लागू करणे इत्यादी उपाययोजना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्या आहेत.