हृषिकेश देशपांडे
पोटनिवडणुकीत राजकीय पक्षांना जनतेचा कल काही प्रमाणात जाणून घेता येतो. त्यानुसार भविष्यात पावले टाकता येतात. आताही उत्तर प्रदेशात घोसी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने आपली जागा राखली आहे. गेल्या वेळी समाजवादी पक्षाकडून विजयी झालेल्या दारासिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. या मतदारसंघात ८८ हजार मुस्लिम मतदार आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या दृष्टीने ही कसोटी होती. काँग्रेसने येथे उमेदवार दिला नव्हता. तर बहुजन समाज पक्षानेही कोणाला पाठिंबा दिला नव्हता. मात्र त्यांचे मतदान समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला झाल्याचे निकालानंतर दिसत आहे. समाजवादी पक्षाचे सुधाकर सिंह येथे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांना हा दिलासा मानला पाहिजे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी येथे प्रचार केला होता. मात्र त्यांना यश मिळाले नाही. देशात इतरत्र सर्वच ठिकाणी पोटनिवडणुकांत सत्ताधारी पक्षाला यश मिळाले आहे. विशेषत पश्चिम बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत तृणमूल काँग्रेसने भाजपकडून जागा खेचली आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपला इशारा…
उत्तराखंडमध्ये मंत्री चरणराम दास यांच्या निधनामुळे बागेश्वर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. २००७ पासून सलग चार वेळा ते विजयी झाले होते. त्यांच्या पत्नी पार्वती दास यांना भाजपने उमेदवारी दिली होती. सहानुभूती मिळेल यासाठी भाजपने ही खेळी केली. मात्र काँग्रेसच्या वसंत कुमार यांनी त्यांना येथे शेवटपर्यंत झुंजवले. भाजपने कसाबसा विजय मिळवला. मुख्यमंत्री पुष्कर धामी तसेच भाजप सरकारसाठी हा इशारा मानला जातो. वसंतकुमार हे गेल्या म्हणजेच २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार होते. यावेळी ते काँग्रेसकडून रिंगणात होते. उत्तर प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला होता, उत्तराखंडमध्ये मात्र समाजवादी पक्षाने उमेदवार दिला होता.
आणखी वाचा-जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताच्या दृष्टिकोनातून पाच महत्त्वाच्या गोष्टी
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव
पश्चिम बंगालच्या जलपायगुडी मतदारसंघातील जागा गमवावी लागली. विष्णू पांडा रे यांच्या निधनाने या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाची पत्नी तापसी रॉय यांना उमेदवारी दिली होती. तृणमूल काँग्रेसने प्राध्यापक निर्मलचंद्र रॉय यांना रिंगणात उतरवले. येथे इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवार दिला होता. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. त्या उमेदवाराला फारशी मते मिळाली नाही. मात्र राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेसविरोधातील मतांचे विभाजन येथे झाले. त्यातून सत्ताधाऱ्यांना लाभ झाला. येथे तृणमूल तसेच माकप एकत्र येथे अशक्य आहे.
झारखंडमध्ये सत्ताधीश विजयी
झारखंडमधील धुमरी मतदारसंघात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाने जागा राखली आहे. या पक्षाचे जगन्नाथ महातो यांच्या निधनाने पोटनिवडणूक झाली. महातो यांच्या पत्नी बेबी देवी यांनी ऑल इंडिया झारखंड स्टुडंट युनियन या भाजपच्या मित्र पक्षाचा पराभव केला. येथे ओवेसी यांच्या एमआयएमने येथे लक्षणीय मते मिळवली हे विशेष. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपने मोहीम उघडली आहे. बाबुलाल मरांडी यांच्याकडे प्रदेश भाजपची सूत्रे आल्यानंतर येथे निवडणूक झाली. भाजप राज्यात पुन्हा सत्तेसाठी प्रयत्नशील आहे, अशा वेळी हा निकाल भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
आणखी वाचा- ‘आसियान’ भारताच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग का आहे? आसियान परिषदेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
केरळमध्ये काँग्रेसचे यश…
केरळमधील पुटापल्ली मतदारसंघातील जागा काँग्रेसने सहज राखली. राज्यात इंडिया आघाडीतीलच घटक पक्षांमध्ये झुंज झाली. काँग्रेसने ज्येष्ठ नेते उम्मन चंडी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चंडी उम्मन यांनी मोठ्या फरकाने माकप उमेदवाराचा पराभव केला. या मतदारसंघात चंडी यांचा पाच दशके प्रभाव आहे. काँग्रेसने येथे विक्रमी मताधिक्य घेतले. काँग्रेस-माकपला पर्याय निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. गेल्या वेळेपेक्षाही त्यांची मते घटली. त्यामुळे भाजपसाठी केरळ हा चिंतेचा विषय आहे.
त्रिपुरात भाजपशी सरशी
त्रिपुरातील बॉक्सानगर या ६६ टक्के अल्पसंख्याक मतदार असलेल्या जागेवर भाजपने विक्रमी विजय मिळवत ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून खेचून घेतली. भाजपच्या तफज्जल हुसेन यांनी माकपच्या मिझल हुसेन यांचा पराभव केला. येथे तिपरा मोथा या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाने उमेदवार दिला नव्हता. दुसरी धनपूरची जागाही भाजपने मोठ्या मताधिक्याने राखली. हे निकाल पाहता राज्यात काँग्रेस तसेच माकप आघाडी सातत्याने अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापूर्वीच भाजपने त्रिपुरात सत्ता राखली होती. तर आता माकपला बालेकिल्ल्यात हादरा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालपाठोपाठ त्रिपुरातही माकप निष्प्रभ होत आहे.