दमा अर्थात अस्थमा हा आजार फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या श्वसननलिकेच्या दाहामुळे उद्भवतो. त्यामुळे श्वसननलिका अत्यंत संवेदनशील होते. मात्र, या आजारावरील उपचारात शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. बेनरालिझुमॅब या औषधीच्या वापराद्वारे दम्याच्या उपचारात एक मोठी प्रगती साधली गेली आहे, ज्याला संशोधक ‘गेमचेंजर’ म्हणत आहेत. बेनरालिझुमाब, दम्याचा अटॅक आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)साठी ५० वर्षांतील पहिली नवीन उपचारपद्धती आहे; ज्याला सुरुवातीला अमेरिका आणि युरोपीय युनियन नियामकांनी २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. ही उपचारपद्धती विशेषतः इओसिनोफिलिक अस्थमा (फुप्फुसांशी संबंधित स्थितीचे एक गंभीर स्वरूप) उपचार करण्यासाठी डिझाईन केले होते. मात्र, आता अलीकडील संशोधन सूचित करते की, याचा वापर अधिक व्यापकपणे केला जाऊ शकतो. किंग्ज कॉलेज -लंडनच्या संशोधकांनी या औषधाचे वर्णन दम्याच्या आजाराच्या उपचारामधील क्रांती, असे केले आहे. काय आहे ही उपचारपद्धती? ही कसे कार्य करते? याचा काय फायदा होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
बेनरालिझुमाब कसे कार्य करते?
किंग्ज कॉलेज -लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अलीकडील अभ्यासात, दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) आजाराने ग्रस्त असलेल्या ब्रिटनमधील १५८ उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. बेनरालिझुमाब फुप्फुसाच्या जळजळ आणि नुकसानीशी संबंधित असलेल्या इओसिनोफिलिक म्हणजेच एका प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींना लक्ष्य करून कार्य करते, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. या पेशी दम्याचा अटॅक आणि सीओपीडीच्या एक-तृतियांश तीव्रतेसाठी जबाबदार असतात. प्रीडनिसोलोनसारखे स्टिरॉइड्सदेखील आहेत, ज्याच्या वापराने फुप्फुसाची जळजळ कमी होऊ शकते. परंतु, याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. मात्र, बेनरालिझुमाब औषध अचूक पद्धतीने आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय काम करते.
हेही वाचा : अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर असल्याचा हिंदू सेनेच्या प्रमुखांचा दावा, कोण आहेत विष्णू गुप्ता?
प्रीडनिसोलोनसारख्या स्टिरॉइड्सच्या विपरीत, जे फुप्फुसाची जळजळदेखील कमी करते; परंतु गंभीर दुष्परिणामांना कारणीभूत ठरू शकते. बेनरालिझुमाब अधिक अचूक दृष्टिकोन देते. अस्थमा किंवा सीओपीडी अटॅकदरम्यान इंजेक्शन दिल्यावर बेनरालिझुमाब हे प्रेडनिसोलोनपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. अभ्यासात, २८ दिवसांच्या आत श्वसनाची लक्षणे सुधारली असल्याचे आणि ९० दिवसांनंतर बेनरालिझुमॅबने उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. अतिरिक्त उपचार आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज कमी करण्यासाठी हे औषध संभाव्यत: आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाऊ शकते. याचा वापर एक तर रुग्णालयात किंवा अगदी घरीदेखील केला जाऊ शकतो. संशोधकांनी सांगितले की, या यशामुळे स्टिरॉइडचा वारंवार वापर आणि मृत्युदर कमी होऊ शकतो.
दमा असलेल्या लोकांसाठी गेम चेंजर?
किंग्ज कॉलेज लंडनमधील प्रोफेसर मोना बाफाडेल यांनी या चाचणीचे नेतृत्व केले. त्यांनी या यशाचे वर्णन दमा आणि सीओपीडीग्रस्त लोकांसाठी गेमचेंजर म्हणून केले. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार बेनरालिझुमाब वापरल्यानंतर या अभ्यासात सहभागी झालेल्या रुग्णांना सुधारित लक्षणे आणि जीवनाचा दर्जा सुधारल्याचे चाचणीत दिसून आले. अस्थमा + लंग यूके या संस्थेतील डॉ. सामंथा वॉकर यांनी ‘स्काय न्यूज’ला सांगितले, “फुप्फुसाशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. परंतु, ही गंभीर बाब आहे की, ५० वर्षांतील ही पहिली नवीन उपचारपद्धती आहे आणि फुप्फुसांच्या आरोग्य संशोधनात किती कमी निधी आहे याचे हे द्योतक आहे.” दरम्यान, चाचणीत सहभागी झालेल्या ऑक्सफर्डशायरच्या ५५ वर्षीय ॲलिसन स्पूनर यांनी त्यांच्या अनुभवाविषयी सांगितले. लहानपणापासूनच दम्याचा त्रास असल्याने, अलीकडच्या वर्षांत त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. त्यांनी ‘बीबीसी’ला सांगितले, “त्यांची तब्येत अधिकच खराब होत असल्याचे लक्षात आले, जेव्हा तुम्ही श्वास घेत असाल तेव्हा श्वासोच्छ्वासाची तीव्र कमतरता खूपच भयावह असते.” या उपचारानंतर ॲलिसन यांना अगदी वेगळे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आणि आता त्या केवळ खबरदारी म्हणून त्यांचे इनहेलर वापरत असल्याचेही त्या म्हणाल्या. “दुर्दैवाने कोणत्याही औषधाने दम्यापासून पूर्णपणे सुटका होत नाही; परंतु यामुळे खूप बदल झाला. खरं तर हा एक चमत्कारच आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.
बेनरालिझुमाब प्रत्येक जण वापरू शकणार?
सध्या बेनरालिझुमाब सामान्य वापरासाठी तयार नाही. त्याचे फायदे आणि सुरक्षिततेची पुष्टी करण्यासाठी २०२५ मध्ये मोठी चाचणी सुरू करण्यात येणार आहे; ज्याचा कार्यकाल दोन वर्षे असेल. हे औषध आधीच लिहून दिलेल्या रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू ठेवावे. बेनरालिझुमाबसारखी मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपी महाग असल्याने आगामी अभ्यासातून औषधाच्या किफायतशीरतेचेही मूल्यांकन करण्यात येईल. ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉ. संजय रामकृष्णन यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, या औषधाशी संबंधित मोठ्या प्रमाणात विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ते म्हणाले की, हा आजार मृत्यूचे प्रमुख जागतिक कारण असूनही त्यासाठी आपल्याकडे योग्य असे उपचार उपलब्ध नाहीत. स्टिरॉइड उपचारांमुळे अनेकदा वजन वाढणे, मधुमेह व कमकुवत हाडे होणे यांसारखे दुष्परिणाम होतात. मात्र, बेनरालिझुमाबमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.
ऑक्सफर्डशायरचे जेफ्री पॉइंटिंग चाचणीत सहभागी झाले होते. त्यांनी यूके ब्रॉडकास्टरला सांगितले, “मला स्टिरॉईड गोळ्यांसारखे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. स्टिरॉइड्स घेतल्याच्या पहिल्या रात्री मला कधीही नीट झोप लागली नाही. पण, या अभ्यासाच्या पहिल्या दिवशी मी त्या पहिल्या रात्री झोपू शकलो आणि पुढे मी माझे आयुष्य कोणत्याही समस्यांशिवाय पुढे चालू ठेवू शकलो.” असा अंदाज आहे की, अस्थमा असलेले चार लोक आणि सीओपीडी असलेले ८५ लोक दररोज मरतात.
हेही वाचा : नॉनव्हेज आहार, मानसिक छळ आणि एअर इंडियाच्या वैमानिक तरुणीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?
भारतातील आव्हाने काय?
भारतात औषधाची उच्च किंमत हे सर्वांत मोठे आव्हान आहे. ३० मिलिग्रॅमच्या डोससाठी सुमारे १.४८ लाख रुपये खर्च करावे लागतात. ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) वैज्ञानिक समितीचे सदस्य डॉ. संदीप साळवी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, औषधाची परिणामकारकता आणि उपयुक्तता स्थापित करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आवश्यकता असेल. परंतु, यासाठी करावा लागणारा मोठा खर्च भारतात फार कमी लोकांना परवडणारा आहे.