केरळमध्ये ‘मल्टि-एक्सरसाइझ कॉम्बिनेशन सेव्हन’ (एमईसी) या व्यायाम प्रकारावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. ‘पीएफआय’सारख्या मूलतत्त्ववादी प्रतिबंधित संघटना राज्यभर व्यायामाची सत्रे भरवून त्याआडून प्रचार करत असल्याचा आरोप केला जात आहे.
‘एमईसी सेव्हन’संबंधी आरोप
प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफाय) आणि जमात-ए-इस्लामी यासारख्या संघटना एक हजारांपेक्षा जास्त ठिकाणी ‘एमईसी सेव्हन’चे आयोजन करत असल्याचा आरोप केला जात आहे. वरकरणी पाहता ‘एमईसी सेव्हन’ हा आरोग्यवर्धक व्यायाम उपक्रम आहे. मात्र, त्याआडून इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना आपापला प्रचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हा उपक्रम वादात सापडला आहे.
हे ही वाचा… ‘हा’ देश भारतीयांना देणार व्हिसाशिवाय प्रवेश; विनाव्हिसा प्रवेशाचा फायदा काय? कोणते देश ही सुविधा देतात?
राजकीय पक्षांच्या भूमिका
डावे पक्ष, भाजप आणि काही सुन्नी संघटनांनी ‘एमईसी सेव्हन’ला विरोध केला आहे. सर्वात आधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी पी मोहनन यांनी या उपक्रमावर टीका केली. त्यानंतर कंठापुरमचे अबु बकर मुसलियार यांच्या नेतृत्वाखालील सुन्नी इस्लाम गटाने मोहनन यांच्या आरोपाला पाठिंबा दिला. त्याच वेळी काँग्रेसचे खासदार व्ही. के. श्रीकांतन यांनी मात्र या कार्यक्रमाला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘एमईसी सेव्हन’चा प्रसार देशभर केला पाहिजे असे ते म्हणाले. आरोग्याच्या उपक्रमामध्ये जात-धर्म, वर्ग, समुदाय यांना थारा नाही. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे आणि हा प्रकार सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी लाभदायक आहे असे ते म्हणाले.
डाव्या पक्षांच्या भूमिकेत बदल
माकपचे कोझिकोडचे जिल्हा सचिव पी. मोहनन यांनी सर्वात आधी ‘एमईसी सेव्हन’च्या हेतूंबद्दल शंका उपस्थित केली. पीएफआयच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जमात-ए-इस्लामी ही संघटना विविध भागांमध्ये ‘एमईसी सेव्हन’चे केंद्र चालवते, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो असा आरोप त्यांनी मागील महिन्यात केला होता. तसेच चौकशीची मागणीही केली होती. मात्र, आता त्यांनी आपली भूमिका मवाळ केली आहे. आपला ‘एमईसी सेव्हन’अंतर्गत व्यायाम प्रकारांना विरोध नाही तर त्या आडून सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, जमात-ए-इस्लामी, संघ परिवारासारख्या धर्मांध शक्ती आपापला प्रचार करत आहेत यावर आपला आक्षेप असल्याचे मोहनन यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा… प्रियांका गांधींच्या संसदेतील बॅगेवरून नवा वाद; नेमकं प्रकरण काय?
भाजपचे आरोप
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी असा आरोप केला की, पीएफआय, जमात-ए-इस्लामी आणि नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंटसारख्या संघटना या उपक्रमामागे असल्याचे मानण्यासाठी सबळ कारण आहे. हा उपक्रम रहस्यमय आहे. त्यामुळे सरकारने सतर्क राहायला हवे अशी मागणी त्यांनी केली.
‘एमईसी सेव्हन’ म्हणजे काय?
‘एमईसी सेव्हन’ म्हणजे मल्टि-एक्सरसाइझ कॉम्बिनेशन (बहु-व्यायाम संयोजन) सेव्हन. केरळमधील कोंडोट्टीजवळील थुरक्कलचे रहिवासी असलेल्या पेरिंगाडक्कड स्वालाउद्दीन यांनी तो विकसित केला आहे. याचा पहिला प्रयोग जुलै २०१२मध्ये करण्यात आला होता. बावा आराक्कल हे या उपक्रमाचे दूत आहेत. यामध्ये योग, एअरोबिक्स, फिजियोथेरपी, दीर्घ श्वसन, ॲक्युपंक्चर, ध्यानधारणा आणि मसाज या सात स्वास्थ्यवर्धक प्रकारांचे संयोजन केले आहे. हा संपूर्ण व्यायाम अवघ्या २१ मिनिटांमध्ये पूर्ण केला जातो. यामध्ये शरीराच्या जवळपास १७५० हालचाली होतात. समूहाने केल्यास अधिक आनंद मिळतो. तसेच कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्यायाम प्रकार करू शकते असे सांगितले जाते. धावपळीचे जीवन असणाऱ्यांसाठी हा व्यायाम प्रकार विकसित करण्यात आला आहे. विशेषतः उत्तर केरळमध्ये त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
हे ही वाचा… विश्लेषण : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात का घेतले जाते? काय सांगतो ‘नागपूर करार’?
टीकेला उत्तर
आपल्या व्यायाम उपक्रम सर्वसमावेशक आहे असे बावा आराक्कल यांचे म्हणणे आहे. व्यायाम उपक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांमध्ये सर्व जाती-धर्माच्या, राजकीय विचारसरणींच्या लोकांचा समावेश आहे असे त्यांनी नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या कार्यक्रमाच्या टीकाकारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याचा अनुभव घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही नोंदणीची, जाहिरात करण्याची किंवा नियमांची गरज नाही असेही आराक्कल यांनी सांगितले.
सक्ती होत असल्याचे आरोप
या उपक्रमामध्ये महिलांना सक्तीने सहभागी करून घेतले जात आहे. प्रसंगी त्यांना घराबाहेर खेचून नेले जाते अशा प्रकारचे आरोपही झाले आहेत. मात्र, ‘एमईसी सेव्हन’च्या संयोजक आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या महिला शाखा असलेल्या वनिता लीगच्या नेत्या ब्राझिलिया शमसुद्दीन यांनी मात्र ते फेटाळले आहेत. या उपक्रमामागे कोणताही छुपा अजेंडा नाही. सर्व धर्म आणि राजकीय विचारसरणींचे स्त्री-पुरुष यामध्ये सहभागी होतात, आरोग्य सुधारणे हा त्यांचा एकमेव उद्देश असते असे शमसुद्दीन यांचे म्हणणे आहे.
nima.patil@expressindia.com