करोना महामारीनंतर आता जपानमध्ये एका दुर्मीळ आजाराने थैमान घातले आहे. हा आजार इतका घातक आहे की, याची लागण ज्या व्यक्तीला झाली त्याचा मृत्यू निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS) या नावाने ओळखल्या जाणार्‍या या आजाराने एखाद्याला ग्रासले तर ४८ तासांत त्या व्यक्तीचा मृत्यू होत आहे. हा आजार मांस खाणार्‍या जिवाणूमुळे (Flesh Eating Bacteria) पसरत आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या आकडेवारीनुसार, देशात या वर्षी जवळपास याची हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी गेल्या वर्षीच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहेत. हा आजार नक्की काय आहे? याची लक्षणे काय? आणि जगभरात हा जीवाणू थैमान घालू शकतो का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणजे काय?

स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस (GAS) जिवाणूमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार आहे. हे जीवाणू शरीरात विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे शरीरात तीव्र वेदना जाणवतात. हे जीवाणू रक्तप्रवाहात आणि अवयवांमध्ये सहज प्रवेश करू शकतात, ज्यामुळे अल्प कालावधीत एकापेक्षा जास्त अवयव निकामी होतात. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, स्नायू दुखणे आणि उलट्या यांसारखी लक्षणे जाणवतात. जसजसा शरीरात या जिवाणूंचा प्रभाव वाढतो तसतसे घातक लक्षणे दिसू लागतात. कमी रक्तदाब, सूज, नेक्रोसिस (हाडांमधील ऊती (टिश्यू) नष्ट होणे), अवयव निकामी होणे, यांसारखी लक्षणे जीवघेणी ठरू शकतात. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, “उपचार करूनही हा आजार प्राणघातक असू शकतो. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असणाऱ्या १० लोकांपैकी तीन लोकांचा संसर्गामुळे मृत्यू होतो.”

हेही वाचा : Kanchanjunga Express Accident: भारतात एवढे रेल्वे अपघात होण्याची कारणं काय?

जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा धुमाकूळ

२ जूनपर्यंत जपानच्या आरोग्य मंत्रालयाने या आजाराची एकूण ९७७ प्रकरणे नोंदवली, ज्यांचा मृत्यू दर ३० टक्क्यांपर्यंत आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान ७७ लोकांचा मांस खाणार्‍या जिवाणूंच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. मागील वर्षी या आजाराने बाधित झालेल्या ९४१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, सध्या जपानमध्ये या आजाराची परिस्थिती पाहता मागल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची संख्या दिसून येणार असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. १९९९ मध्ये या आजाराचे निदान झाले होते, तेव्हापासून यावर्षीची आकडेवारी सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी या आजारामुळे ९७ मृत्यूची नोंद करण्यात आली होती, जी गेल्या सहा वर्षांतील मृत्यूची दुसरी सर्वाधिक संख्या आहे.

टोकियो वुमेन्स मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक केन किकुची यांनी या जिवाणूंच्या वाढत्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली. “बहुतेक रुग्णांचे मृत्यू सुरुवातीची लक्षणे दिसल्याच्या ४८ तासांच्या आत होतात. कोविड-१९ नंतर लोकांच्या कमकुवत झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते”, असे त्यांनी सांगितले. आरोग्यविषयकतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, हे जीवाणू शरीरात विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ लागते. त्यानंतर हे जीवाणू शरीरातील ऊतींचे नुकसान करतात, ज्यामुळे शरीरावर सूज येते आणि तीव्र वेदना होतात.

हे जीवाणू जगात थैमान घालणार का?

सध्या या जिवाणूंचा उद्रेक जपानमध्ये झाला असला तरी आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हे जीवाणू जगभरात पसरण्याची शक्यता आहे. हा आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणे, नियमित हात धुणे आणि त्वचेला कोणतीही दुखापत झाल्यास त्वरित उपचार घेणे महत्त्वाचे आहे. अचानक तीव्र वेदना, ताप आणि जखमेच्या ठिकाणी लालसरपणा यांसारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.

जपानमध्ये आरोग्य अधिकारी सक्रियपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. जनजागृती मोहिमेद्वारे लोकांना या आजाराची लक्षणे आणि तीव्रतेबद्दल माहिती देण्यात येत आहे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या जिवाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये सतर्क आहेत. तसेच स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे.

या जिवाणूचा उद्रेक इतर देशांमध्ये झाला का?

डिसेंबर २०२२ मध्ये पाच युरोपिय देशांमध्ये स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमची अनेकांना लागण झाली होती. या पाच देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड, नेदर्लंड आणि स्वीडनचा समावेश होता. या आजाराचा १० वर्षांखालील मुलांमध्ये सर्वात जास्त प्रभाव दिसून आला होता. मार्चमध्ये जपानी अधिकाऱ्यांनी या आजाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणांची संख्या जुलै २०२३ पासून वाढली आहे, विशेषत: ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये या जिवाणूचा संसर्ग होत आहे.

हेही वाचा : Chenab Bridge: जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वात उंच पुलावर रेल्वेची यशस्वी चाचणी; या चाचणीचे महत्त्व काय?

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने असे नमूद केले आहे की, खुली जखम असलेल्या वृद्ध लोकांना हा आजार होण्याचा धोका जास्त आहे. उदाहरणार्थ, अलीकडे शस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध नागरिकांना. परंतु, या वर्षी प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सीडीसीने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, “हा आजार झालेल्या जवळपास निम्म्या लोकांच्या शरीरात जीवाणू कसे आले, याची अद्याप तज्ज्ञांना माहिती नाही.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flesh eating bacteria outbreak in japan rac