१० वर्षांपूर्वी म्हणजेच ८ मार्च २०१४ रोजी मलेशियन एअरलाइन्सचे एक विमान प्रवासी आणि क्रूसह बेपत्ता झाले होते. MH370 या विमानाचे रहस्य आजही तसेच आहे. इतिहासातील ही रहस्यमयी दुर्घटना असल्याचे मानले जाते. आता मलेशिया सरकारने मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट MH370 चा शोध पुन्हा सुरू केला आहे. ही घटना चिरस्थायी रहस्यांपैकी एक आहे. परिवहन मंत्री अँथनी लोके यांनी नुकतीच घोषणा केली की, अमेरिका येथील सागरी रोबोटिक्स फर्म ओशन इन्फिनिटीबरोबरच्या एका नवीन कराराला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या करारांतर्गत विमानाचा कोणताही महत्त्वाचा अवशेष सापडल्यास कंपनीला ७० दशलक्ष डॉलर्स मिळतील. हा करार २०२५ च्या सुरुवातीला निश्चित केला जाणार आहे आणि याचा शोध कालावधी जानेवारी ते एप्रिल, असा आहे. हे प्रकरण नक्की काय? विमान नक्की कुठे बेपत्ता झाले? त्याविषयी जाणून घेऊ.
प्रकरण काय?
मलेशिया सरकारने MH370 साठी नवीन शोधमोहीम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. २३९ प्रवाशांना क्वालालंपूर येथून बीजिंगला घेऊन जाणारे विमान अचानक रडारवरून बेपत्ता झाले होते. या विमानातील प्रवाशांचे काय झाले, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. परिवहन मंत्री अँथनी लोके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “आमची जबाबदारी, दायित्व व बांधिलकी लोकांच्या नातेवाइकांसाठी आहे. आम्हाला आशा आहे की, ही वेळ सकारात्मक असेल.” या घोषणेने MH370 मध्ये बसलेल्यांच्या कुटुंबीयांना एक आशेचा किरण दिसत आहे. इंतान मैझुरा ओथामन यांचे पती केबिन क्रू मेंबर होते. त्यांनी पेपर्सला सांगितले, “या घोषणेने आशा, कृतज्ञता व दु:ख अशा संमिश्र भावना उफाळून आल्या आहेत. जवळजवळ ११ वर्षांनंतर अनिश्चितता आणि उत्तरे न मिळण्याची वेदना आमच्यासाठी मोठी आहे.” जियांग हुई यांची आई फ्लाइटवर होती. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले; परंतु मलेशिया सरकारने अधिक समावेशक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता का? त्यावर उपाय काय?
मलेशियाने पुन्हा शोध का सुरू केला?
‘Ocean Infinity’ने २०१८ मधील त्यांच्या मागील प्रयत्नानंतर सुधारित तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणाद्वारे योग्य डेटा वापरून दक्षिण हिंद महासागरात नव्याने ओळखल्या गेलेल्या १५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचा शोध घेण्याची योजना आखली आहे. सीईओ ऑलिव्हर प्लंकेट यांनी पाण्याखालील रोबोटिक तंत्रज्ञानाचा उल्लेख करीत, या मिशनवर विश्वास व्यक्त केला आहे. २०१८ मध्ये Ocean Infinity ने अशाच प्रकारच्या ‘नो फाइंड, नो फी’ करारांतर्गत सहा महिने शोध घेतला; पण तो यशस्वी झाला नाही. या वेळी फर्मच्या नवीन मिशनला प्रगत तंत्रज्ञान आणि मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी पुनरावलोकन केलेल्या विश्वासार्ह डेटाने बळ दिले आहे.
“सर्व डेटा सादर केला गेला आहे. आमचा संघ गेला आहे आणि त्यांना वाटले की, ते अनेक गोष्टी उलगडू शकतात,” असे लोके म्हणाले. “या क्षणी कोणालाही याबाबत निश्चितपणे माहीत नाही आणि याला १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे,” असे लोके यांनी कबूल केले. कंपनीच्या पहिल्या प्रयत्नातून या विमानाचा ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली तीन वर्षे शोध चालला होता. सरकार २०२५ पर्यंत या कराराला अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या रहस्यमयी घटनेचे गूढ उलगडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
MH370 विमानाचे नक्की काय झाले?
८ मार्च २०१४ रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना २२७ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स असलेले बोईंग ७७७ हे फ्लाइट MH370 बेपत्ता झाले होते. दक्षिण चीन समुद्रावरून उड्डाण केल्यानंतर ३८ मिनिटांत त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. लष्करी रडारने नंतर विमानाचा मागोवा घेतला. कारण- ते त्याच्या नियोजित मार्गापासून भरकटले होते. त्यापूर्वी ते मलय द्वीपकल्प आणि अंदमान समुद्र ओलांडून पेनांग बेटाच्या वायव्येस २०० नॉटिकल मैलावर आढळून आले होते. विमानाने व्हिएतनामी हवाई हद्दीत प्रवेश करताच कॅप्टन झाहरी अहमद शाह यांनी “शुभ रात्री, मलेशियन तीन सात शून्य” असा संदेश दिला आणि थोड्याच वेळात त्याचे ट्रान्सपाँडर बंद झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे विमान सहजपणे ट्रॅक करणे शक्य नव्हते. विमानातील २३९ प्रवाशांपैकी बहुतांश चिनी नागरिक होते.
२०२१ मध्ये हे विमान कुठे कोसळले याचा शोध घेतल्याचा दावा रिचर्ड गोडफ्रे या ब्रिटिश वैमानिक अभियंत्याने केला होता. त्यांनी वर्षभर या प्रकरणाचा अभ्यास केला होता. त्यांनी, विमान पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थपासून दोन हजार किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी ४० नॉटिकल मैलांच्या परिघाचादेखील अंदाज व्यक्त केला होता. विमानाचा ढिगारा समुद्रात खोलवर असू शकतो, असेही त्यांनी सांगितले होते. काही वर्षांपूर्वी एका स्मृती समारंभात, मलेशियाच्या परिवहन मंत्र्यांनी MH370 चा शोध न थांबविण्याची शपथ घेतली होती. त्यांनी, विमानाच्या संभाव्य ठिकाणाबद्दल नवीन आणि विश्वासार्ह माहिती मिळाल्यास भविष्यातील त्याबाबतच्या शोधांसंबंधी योग्य तो विचार केला जाईल, असे सांगितले होते.