इंद्रायणी नार्वेकर
मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा ही पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपट्ट्यांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा, तसेच समुद्रातून येणारा कचरा यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोल, फुलांचे हार, कपडे, चपला, अगदी गाद्या, उशा, लाकडी सामान असे वाट्टेल ते असते. नालेसफाई केली तरी दुसऱ्या दिवसापासून दिसणारा हा तरंगता कचरा म्हणजे महापालिकेच्या नियोजनाची आणि मुंबईकरांच्या शिस्तीची लक्तरेच!
श्रीमंत महानगरपालिकेला ही समस्या इतक्या वर्षात का सोडवता आली नाही? तरंगता कचरा म्हणजे काय?
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी मुंबई व उपनगरांत ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला २००० किमी लांबीची गटारे आहेत. यातून पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यांमध्ये वर्षभर समुद्रातून कचरा वाहून येत असतो. तसेच आजूबाजूच्या वस्त्यांमधूनही कचरा नाल्यांमध्ये टाकला जात असतो. यात प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान, कपडे, चिंध्या, खाऊची पाकिटे, थर्माकोल, राडारोडा असा वाटेल तो कचरा टाकला जातो. त्यामुळे काही कचरा नाल्याच्या तळाशी जातो तर वजनाने हलका कचरा तरंगत राहतो. नालेसफाई केली तरी हा तरंगणारा कचरा दुसऱ्या दिवसापासून दिसतच असतो.
तरंगत्या कचऱ्यामुळे समस्या काय?
नाल्यामध्ये कचरा तरंगत असल्यामुळे एक तर मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी ती लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच नाले कचऱ्याने तुडुंब भरल्यानंतर परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच पावसाच्या पाण्याचा निचराही वेगाने होऊ शकत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून नालेसफाई केली तरी तरंगत्या कचऱ्यामुळे पालिकेवर पुन्हा टीका होत असते. त्याचे राजकीय भांडवल होतेच, पण नालेसफाईचा तितका उपयोगही होत नाही. तसेच हा कचरा समुद्राला जाऊन मिळत असल्यामुळे समुद्रही प्रदूषित होतो. भरतीच्या लाटांबरोबर हा कचरा किनाऱ्यावर येतो किंवा पुन्हा नाल्यात येतो. तसेच पावसाचे पाणी उपसण्यासाठी पालिकेने बांधलेल्या पंपिंग स्टेशनमध्येही हा कचरा अडकून ते बंद पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
विश्लेषण: गगनचुंबी इमारतींमुळे न्यूयॉर्क बुडण्याची भीती?
आतापर्यंत पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या?
नाल्यांमध्ये दोन मार्गांनी हा कचरा येत असतो. एक तर भरतीच्या लाटांबरोबर हा कचरा नाल्यांत वाहून येत असतो. झोपड्यांमधून टाकलेल्या कचऱ्यामुळेही नाल्यातल्या कचऱ्यात भर पडत असते. त्यामुळे काही नाल्यांवर ॲक्रॅलिकची आच्छादने, जाळ्या लावण्यात आल्या होत्या. समुद्रातून येणारा आणि समुद्रात जाणारा कचरा अडवण्यासाठी मोठ्या नाल्यांमध्ये कचरा अडवणारे अडथळे म्हणजेच ट्रॅश ब्रूम लावले होते. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरसेवकांचीही मदत घेण्यात आली होती. नाल्यात कचरा टाकू नये असे आवाहनही वारंवार केले जाते. काही वर्षांपूर्वी पालिकेने नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा दिला होता. मात्र मनुष्यबळाअभावी त्याची कठोर अंमलबजावणी होऊ शकली नाही.
नाले आच्छादित का करू शकत नाही?
पालिकेने आतापर्यंत केलेले सर्व उपाय फसले आहेत. नाल्यांवर आच्छादने केली तरी आच्छादनांच्या आत प्रचंड डासांची पैदास होत असे. तसेच आच्छादने तोडण्याचे प्रकारही घडले. आच्छादनांमुळे नालेसफाई करता येत नव्हती. मोठ्या रुंदीच्या नाल्यांना आच्छादने लावता येत नव्हती. जनजागृती करून झोपडपट्ट्यांमधून कचरा फेकण्याचे प्रमाण कमी झाले नाही. जाळ्या लावल्या तरी कापून त्यातून कचरा टाकण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळे उपाय आतापर्यंत फसले आहेत. पंपिंग स्टेशन बंद पडू नये म्हणून कचरा गाळणाऱ्या अवाढव्य अशी चाळणी (ग्रॅब) बसवण्यात आली आहे. त्यातून ६० मीमी जाडीचा कचरा अगदी चिंधीसुद्धा गाळून वेगळी केली जाते. मात्र मूळ समस्या सुटलेली नाही.
दूध उत्पादनात भारत जगात पुढे पण, महाराष्ट्र मागे असे का?
उपाय का सापडू शकत नाही?
नाल्यातील कचरा हा विषय पालिकेच्या दोन विभागांशी संबंधित आहे. नालेसफाई हा विषय पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडे येतो. तर कचरा गोळा करणे ही घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे या दोन विभागांमधील समन्वय असणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी यंत्रणा उभारण्यात, जनजागृती करण्यात पालिकेची यंत्रणा अपुरी पडते आहे. तसेच नाल्याच्या काठावरील झोपड्या हटवणेदेखील विविध कारणांमुळे, पुनर्वसनामुळे रखडले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वयाने हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, या दृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे.