चायनीज नूडल्स, कोबी मंच्युरियन हे पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे आहेत. लहानपणी आपल्यासाठी ‘बुढ्ढी के बाल’ असणारी कॉटन कँडी तर आपण वर्षोनवर्ष खात आलो आहोत. आताही गुलाबी रंगाची ही कॉटन कँडी आपल्याला दिसली तर आपसूकच आपले मन वळते. परंतु याच कॉटन कँडीचा गुलाबी रंग आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळेच कर्नाटक सरकारने कोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडीमध्ये वापरण्यात येणार्या कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले आहे.
“कृत्रिम रंग असलेल्या या पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे,” असे ते म्हणाले. राज्य सरकारद्वारे या पदार्थांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत १७१ कोबी मंच्युरियनच्या नमुन्यांपैकी १०७ नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आढळून आला आहे. तर कॉटन कँडीच्या २५ नमुन्यांपैकी १५ नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आढळला आहे. “या निष्कर्षांच्या आधारे, कोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडीमध्ये रोडामाइन बीसह कृत्रिम रंगांच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे,” असे मंत्री म्हणाले.
रोडामाइन बी काय आहे?
आरोग्य मंत्र्यानी सांगितले की, कर्नाटक सरकार रोडामाइन बी या कलरिंग एजंटच्या वापरावर बंदी घालत आहे. रोडामाइन बी देशाच्या अन्न सुरक्षा नियमांतर्गत परवानगी असलेल्या फूड कलरिंग एजंटपैकी नाही. हा एक रासायनिक रंग आहे; जो कपडे, कागद, चामडे, छपाई आणि प्लास्टिक रंगविण्यासाठी वापरला जातो. पदार्थांना लाल आणि गुलाबी रंग देण्यासाठी याचा वापर केला जातो.
हे रसायन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याचे सेवन केल्यास या रसायनाचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. रसायनाच्या संपर्कात आल्याने डोळ्यांना नुकसान होऊ शकते आणि श्वसनमार्गामध्ये जळजळ जाणवू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनुसार, रोडामाइन बी ला मानवांसाठी कार्सिनोजेनिक (कर्करोग होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक) म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, परंतु उंदरांवर केलेल्या अभ्यासात या रसायनामुळे कर्करोगाचे परिणाम आढळून आले आहेत.
भारतातील खाद्यपदार्थांमध्ये ‘रोडामाइन बी’चा वापर
एका अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “रोडामाइन बी सहसा लहान शहरांमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या विक्रेत्यांकडे वापरले जाते. अन्नपदार्थांमध्ये वापरण्यात येणार्या रंगांबद्दलची समज नसल्यामुळे याचा वापर दिसून येतो. लहान विक्रेत्यांना याची जाणीव नसते की, हा रंग हानीकारक असू शकतो. कारण- याचे परिणाम लगेच जाणवत नाहीत. हे दुकानदार एखाद्या दुकानात जाऊन लाल रंग खरेदी करतात, परंतु त्यांना काय दिले जाते, हे कदाचित माहीत नसते.”
ते पुढे म्हणाले की, कोबी मंच्युरियन, बटाटा वेजेस, बटर चिकन, डाळिंबाचा ज्यूस, लहान प्रमाणात उत्पादित आइस्क्रीम किंवा कॉटन कँडीज यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये याचा जास्तप्रमाणात वापर होतो. “हे सहसा दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसत नाही. मोठ्या शहरांमध्ये बटर चिकन आणि तंदुरी चिकनमध्ये लाल रंग देण्यासाठी सामान्यतः खाद्य रंगांचाच वापर केला जातो,” असे अधिकारी म्हणाले.
‘फूड सेफ्टी ॲक्ट’नुसार कोणत्या खाद्य रंगांना परवानगी आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसआय)च्या अन्न सुरक्षा नियमात, अन्नपदार्थांमध्ये फार कमी नैसर्गिक आणि कृत्रिम रंग वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्या प्रकारच्या खाद्यपदार्थात कोणते रंग वापरायचे यावरही बंधने आहेत. “रोडामाइन बी हा एक सामान्य लाल रंग आहे; अगदी होळीच्या रंगातही याचा वापर केला जातो. परंतु, हे कार्सिनोजेन असल्याचे मानले जाते आणि अन्न पदार्थांमध्येमध्ये याचा वापर करण्यास परवानगी नाही. खाद्यपदार्थांमध्ये केवळ दहा रंग वापरण्याची परवानगी आहे,” असे फूड सेफ्टी हेल्पलाइनचे संस्थापक सौरभ अरोरा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.
त्यांच्या मते, परवानगी असलेल्या नैसर्गिक खाद्य रंगांमध्ये कॅरोटीन आणि कॅरोटीनॉइड्स (पिवळा, नारंगी), क्लोरोफिल (हिरवा), रिबोफ्लेविन (पिवळा), कॅरमल, ॲनाट्टो (अमेरिकन झाडाच्या बियापासून तयार केलेला नारंगी-लाल रंग), केशर आणि सर्मिन (पिवळा, हळदीपासून तयार केलेला रंग) यांचा समावेश आहे. सिंथेटिक रंगांमध्ये पोन्सेऊ ४ आर, कारमॉइझीन आणि एरिथ्रोसीनपासून तयार होणारा लाल रंग, टारट्राझिन आणि सनसेट यलो एफसीएफपासून तयार होणारा पिवळा रंग, इंडिगो कारमाइन आणि ब्रिलियंट ब्लू एफसीएफपासून तयार होणारा निळा रंग आणि फास्ट ग्रीन एफसीएफपासून तयार होणार्या हिरव्या रंगाचा समावेश आहे.
हेही वाचा : जवाहरलाल नेहरू संविधान सभेत नागरिकत्वाच्या मुद्यावर काय म्हणाले होते?
परंतु सर्व खाद्यपदार्थांमध्ये खाद्य रंगांना परवानगी नाही. हे रंग केवळ आइस्क्रीम, बिस्किटे, केक, मिठाई, फळांचे सिरप आणि क्रश, कस्टर्ड पावडर, जेली क्रिस्टल्स आणि कार्बोनेटेड किंवा नॉनकार्बोनेटेड पेये यांसारख्या खाद्यपदार्थांमध्येच वापरले जाऊ शकतात, असे अरोरा म्हणाले.