दत्ता जाधव

देशभरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उष्णतेची लाट आणि प्रमुख गहू उत्पादक राज्यांत मार्चमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याने देशाच्या अन्नसुरक्षेवर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी..

Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना

गव्हाचे नुकसान कुठे, किती झाले?

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात गहू पिकाचे सुमारे साडेपाच लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी दिली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंडमध्ये नुकसान झालेल्या क्षेत्राचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही. सरकारकडून पाहणी सुरू आहे. ऐन काढणीला आलेले पीक भिजले. वादळी वाऱ्यामुळे पीक आडवे पडून पिकाची प्रत खालावली. नुकसानग्रस्त भागांतील उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

अवकाळीचा राज्यनिहाय परिणाम काय?

मध्य प्रदेशात गव्हाची शेती सुमारे ९५ लाख हेक्टरवर असून त्यापैकी सुमारे एक लाख हेक्टरवर पिकाला अवकाळीचा फटका बसला आहे. राज्यस्थानात सुमारे २९.६५ लाख हेक्टरवरील गव्हापैकी सुमारे ३.८८ लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशात ३५,००० हेक्टरवरील गहू पिकाला अवकाळीचा फटका बसला. सर्वाधिक नुकसान आग्रा ते वाराणसी या जिल्ह्यात झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मदत विभागाचे आयुक्त प्रभू एन सिंह म्हणाले, राज्यातील १.२५ लाख गहू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गहू पिकाच्या नुकसानीचे स्वरूप काय?

अवकाळीमुळे गहू काळा पडणे, गव्हाच्या दाण्याचा आकार कमी राहणे, वजनात घट होणे आदी प्रकार समोर येऊ लागले आहेत. पंजाबमध्ये प्रति एकर गहू उत्पादन सरासरी २० क्विंटल आहे. यंदा त्यात घट होऊन प्रति एकर उत्पादन जेमतेम दहा-अकरा क्विंटलवर येऊ शकते. मध्य प्रदेशात पाऊस झालेल्या ठिकाणी बुरशी वाढू लागली आहे. जी पिके कापणीला आली होती, ती भिजल्यामुळे कापणी करता येत नाही. जी पिके अद्याप हिरवी होती, त्यांचा कापणी करण्याचा कालावधी वाढणार आहेच. शिवाय उभी पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी झाल्यामुळे गव्हाचा दर्जाही खालावणार आहे.

देशासाठी गहू का महत्त्वाचा?

देशात यंदा सुमारे ३४ लाख हेक्टरवर गहू लागवड झाली होती. केंद्र सरकारने यंदा देशात विक्रमी ११२,२ दशलक्ष टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. तांदळानंतर गहू देशातील प्रमुख शेतीमाल आहे. देशातील मोठय़ा लोकसंख्येचे ते अन्न आहे. युक्रेन-रशिया युद्ध, खनिज तेलाचे वाढते दर, जगभरातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर देशात उच्चांकी गहू उत्पादन होणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने तसे जाहीर केले असताना, गहू उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंतची घट देशाची अन्नसुरक्षा अडचणीत आणणारी आहे.

हमीभावाने गव्हाची अपेक्षित खरेदी होणार?

मध्य प्रदेशात हमीभावाने खरेदी सुरू होऊनही स्थानिक व्यापारी गव्हाचा दर्जा खालाविल्याचे कारण सांगून हमीभावापेक्षाही कमी भावाने गहू खरेदी करत आहे. सरकारने व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने गहू खरेदी करू नये, असे आदेश दिले आहेत. पण, हरदा जिल्ह्यातील खिरकिया कृषी उत्पन्न बाजार समितीने गव्हात बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगून शेतकऱ्यांकडून कमी दराने गहू खरेदी करण्यास हरकत नसल्याच्या पत्रावर सही घेण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती अन्य राज्यांत निर्माण होण्याची शक्यता आहे.

जागतिक गहू उत्पादनात भारत कुठे?

२०२२-२३ या आर्थिक वर्षांत जगात सुमारे ७८१.३१ दशलक्ष टन गहू उत्पादन झाले, त्यात भारताचा वाटा १०७.७४ दशलक्ष टन होता. वल्र्ड इकॉनॉमिक फोरमच्या माहितीनुसार एकूण जागतिक उत्पादनात चीनचा वाटा १७ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील भारताचा वाटा १२.५ टक्के आहे. त्या खालोखाल रशिया ८.४ टक्के, अमेरिका ८.४ टक्के, फ्रान्स ५.४ टक्के, कॅनडा ४ टक्के, जर्मनी ३.५ टक्के, पाकिस्तानचा ३.४ टक्के, ऑस्ट्रेलियाचा ३.२ टक्के आणि युक्रेन ३.१ टक्के असा वाटा आहे. मोठय़ा लोकसंख्येमुळे चीन व भारतात निर्यातीसाठी गहू शिल्लक राहात नाही. गहू निर्यातदार देशांचा क्रम रशिया, युक्रेन, फ्रान्स, अमेरिका, रुमानिया, बल्गेरिया, लॅटव्हिया, जर्मनी, टय़ुनिशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मग भारत असा लागतो. इंडोनेशिया, इजिप्त, चीन, बांगलादेश, तुर्की, व्हिएतनाम, इटली, ब्राझील हे गव्हाचे आयातदार देश आहेत.

Story img Loader