पाच राज्यांमधील निवडणूक निकालानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची गणिते मांडली जात आहेत. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपने मोठा विजय मिळवला. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे आव्हान कितपत राहील, हा मुद्दा पुढे आला. इंडिया आघाडीची १९ डिसेंबरला दिल्लीत बैठक होत आहे. यात जागावाटपावर सहमती झाल्यास भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देता येईल. लोकसभा निवडणुकीत एकूण ५४३ पैकी किमान ४०० जागांवर भाजपविरोधात एकास-एक उमेदवार देण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत. अर्थात विरोधकांनी लवचीकता दाखवली तरच हे शक्य होईल. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्याने, जागावाटपात थोडी नरमाई ते घेतील अशी चिन्हे आहेत. मुळात जवळपास दोनशे जागांच्या आसपास भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढत होईल. तेथे तिसऱ्या पक्षाचे फारसे महत्त्व नाही. गेल्या वेळी यातील निम्म्या जागा भाजपने ५० टक्क्यांहून अधिक मतांनी जिंकल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप-काँग्रेस थेट लढत

मध्य प्रदेश २९, गुजरात २६, राजस्थान २५, कर्नाटक २८, छत्तीसगड ११, आसाम ११, हरयाणा १०, उत्तराखंड ५, हिमाचल प्रदेश ४, अरुणाचल प्रदेश २, गोवा २, मणिपूर २ आणि चंडीगड १ अशा लोकसभेच्या १५६ जागांवर या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये लढत आहे. त्यातील आसाममध्ये दोन्ही पक्षांची आघाडी आहे. तरीही मोठे पक्ष हे भाजप व काँग्रेस असून, दोन जागांचा अपवाद वगळता यांच्यातच लढत आहे. या १५६ पैकी गेल्या वेळी भाजपने सात जागा वगळता सर्व ठिकाणी विजय मिळवला होता. थोडक्यात जेथे काँग्रेसशी थेट सामना आहे. तेथे भाजपला मोठे यश मिळाले. यंदा यातील कर्नाटकमध्ये सत्ता आल्याने काँग्रेसला काही जागांची अपेक्षा आहे. मात्र तेथे भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी आघाडी केली आहे. त्यामुळे लिंगायत तसेच वोक्किलिगा मतांचे ध्रुवीकरण होऊन काँग्रेसला शह देता येईल अशी भाजपला आशा आहे. मणिपूरमधील स्थितीमुळे तेथे काँग्रेसला संख्याबळात वाढ करण्याची अपेक्षा दिसते.

भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ८० जागांचा समावेश आहे. येथे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी भाजपचा सामना होईल. अर्थात इंडिया आघाडीतील काँग्रेसला अखिलेश जागा सोडणार का, आणि सोडल्या तर किती जागा हा मुद्दा आहे. येथे लोकदलाचे जयंत चौधरी या आघाडीत आहेत. बहुजन समाज पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. राज्यात त्यांची एक मतपेढी आहे. त्यामुळे भाजपविरोधात येथे विरोधकांचे ऐक्य धुसर आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमधील ४२ जागांवर भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस अशी लढत होईल.

हेही वाचा… विश्लेषण: चीन वि. फिलिपिन्स सागरी संघर्ष; दक्षिण चीन समुद्रात चीनची अरेरावी कशासाठी?

गेल्या वेळी ममतांच्या पक्षाला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ दोन जागा मिळाल्या होत्या. आता डावे पक्ष इंडिया आघाडीत असले तरी, बंगालमध्ये ममतांबरोबर जागावाटप करणार का, हा मुद्दा आहे. तेलंगणामधील १७ जागांवर भाजप-काँग्रेस तसेच के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष असा तिरंगी सामना आहे. याखेरीज ओडिशातील २१ जागांवरही राज्यातील सत्ताधारी बिजु जनता दल-भाजप व काँग्रेस अशी लढत होईल. एकूणच या १६० जागांवर भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा सामना होईल. त्यातील १५ ते २० जागांवर काँग्रेसचे आव्हान आहे.

दोन आघाड्यांमध्ये सामना

देशपातळीवरील भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना काही राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांवर भाजप-शिंदे गट तसेच अजित पवार गट व इतर छोट्या पक्षांचा समावेश असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध काँग्रेस-शरद पवार गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत जाण्याबाबत स्वारस्य दाखवले तरी, निर्णय अद्याप झाला नाही. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमधील ४० जागांवर भाजपचे मित्र विरोधात नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल तसेच लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेस यांची महाआघाडी असा सरळ सामना आहे. शेजारच्या झारखंडमधील १४ जागांवर हेच चित्र आहे. तामिळनाडूतील ३९ तसेच पुदुच्चेरीत १ अशा चाळीस जागांवर भाजप आघाडी विरुद्ध द्रमुकच्या नेतृत्वातील आघाडी तसेच अण्णा द्रमुक यांच्यात लढत आहे. येथे भाजप आघाडी कमकुवत आहे. याखेरीज जम्मू व काश्मीरमधील पाच जागा, तसेच त्रिपुरात दोन जागी भाजप विरुद्ध माकप नेतृत्वात इंडिया आघाडी या १४९ जागांवर प्रामुख्याने देशपातळीवर दोन आघाड्यांमध्ये थेट सामना होईल.

भाजप-काँग्रेसचा नगण्य प्रभाव

आंध्र प्रदेशातील २५ जागांवर भाजप तसेच काँग्रेसचा प्रभाव नाही. येथे जगनमोहन यांचा वायएसआर काँग्रेस तसेच चंद्रबाबूंचा तेलुगु देसम असा थेट सामना होईल.

काँग्रेससाठी आव्हानात्मक जागावाटप

पंजाबमधील १३ तसेच दिल्लीतील ७ जागांवर आम आदमी पक्ष तसेच काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे अजून ठरत नाही. केरळमधील २० जागांवरही सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी विरोधात काँग्रेसची संयुक्त लोकशाही आघाडी अशी लढत होईल. येथे भाजपला स्थान नाही. थोडक्यात ४० जागांवर विरोधी आघाडीत ऐक्य आव्हानात्मक आहे.

छोट्या राज्यांत स्थानिक पक्ष

मेघालय तसेच दादरा आणि नगर-हवेली आणि दमण व दीव येथील प्रत्येकी २, मिझोरम व नागालँड तसेच सिक्कीम, लडाख, लक्षद्वीप अशा उर्वरित १० ते १२ जागांवर स्थानिक पक्ष विरुद्ध इतर असा सामना होईल. ईशान्य राज्यातील छोटे पक्ष भाजपच्या आघाडीत आहेत.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the lok sabha elections fight against bjp vs india alliance on 400 seats what will be the nature of the fight in each state print exp dvr