राखी चव्हाण
गेल्या काही वर्षांपासून जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढले आणि त्यांचा धुमसत राहण्याचा कालावधीही वाढला. त्यामुळे जैवविविधता, परिसंस्था, मानवी जीवन, उपजीविकेची साधने आणि राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांवरही विपरीत परिणाम होतो आहे, याबाबतची धोक्याची घंटा जगाने ऐकली आहे, याची खूण म्हणजे वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा भाग म्हणून २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत बैठक होत आहे.
वणव्याबाबत उपग्रह-विदा काय सांगते?
जागतिक पातळीवर २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट वृक्षाच्छादन जळत आहे. अलीकडेच प्रकाशित झालेल्या उपग्रह विदेतून (डेटातून) ही माहिती उघड झाली आहे. या आगींचा सर्वाधिक परिणाम रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन आणि जपानमधील डोंगर-उतार व्यापणाऱ्या जंगलांवर झाला आहे. तसेच, जैवविविधतेचा खजिना असणारी ॲमेझॉनसारखी उष्णकटिबंधीय जंगले, आग्नेय आशिया व भारतातील पर्जन्यवनांनाही वणव्यांच्या वाढत्या संकटास सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा >>> जेरुसलेममध्ये ८०० वर्षांपासून आहे भारतीय धर्मशाळा; बाबा फरीद लॉज आणि भारताचा संबंध काय?
जगातील सर्वात मोठा वणवा कुठे?
‘पृथ्वीचे फुप्फुस’ अशी ख्याती असलेल्या ॲमेझॉनच्या सदाहरित जंगलात २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात महाभयंकर वणवा पेटला. जगभरातील वनस्पतींपासून निर्माण होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी २० टक्के या जंगलातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, या वणव्यात हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मीळ वनस्पती जळून खाक झाल्या. सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले. त्यापाठोपाठ पेरू, बोलिव्हिया आणि पेराग्वे या देशांतही या वणव्याचा धूर पसरला.
वणवा किती प्रकारचा?
वणव्याचे वर्गीकरण उद्भवानुसार केले जाते. जमिनीच्या आतील, जमिनीच्या पृष्ठभागावरील आणि झाडांच्या सर्वात वरच्या भागातले वणवे. सेंद्रिय गोष्टी जाळणाऱ्या आगीला जमिनीच्या आत लागणारा वणवा म्हटले जाते. जमिनीवरील सुकलेली पाने, फांद्या आणि इतर गोष्टींमुळे लागणाऱ्या आगीला ‘जमिनीच्या पृष्ठभागावरील वणवा’ म्हणतात. तो वेगाने पसरतो. एका झाडाच्या शेंड्यापासून दुसऱ्या झाडाच्या शेंड्यापर्यंत पसरणारी आग तिसऱ्या प्रकारात मोडते. अनेक वणवे मानवनिर्मित असू शकतात.
भारतात वणव्याने जंगल-हानी किती?
भारतात फेब्रुवारीच्या मध्यात आगीचा हंगाम सुरू होतो आणि सुमारे १४ आठवडे टिकतो. मात्र, देशभरात २९ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १४ हजार ६८९ वणव्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. २००२ ते २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत वणव्यामुळे भारताने ३.९३ लाख हेक्टर आर्द्र प्राथमिक जंगल गमावले. ‘भारतीय वनसर्वेक्षण अहवाला’नुसार नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान भारतात दोन लाख २३ हजार ३३३ वणवे लागले होते, तर नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत वणव्यांची संख्या जरा कमी, म्हणजे दोन लाख १२ हजार २४९ होती.
हेही वाचा >>> भारताच्या आठ माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?
महाराष्ट्रात अलीकडचे वणवे किती?
महाराष्ट्रात २०१८ साली वणव्याच्या आठ हजार ३९७ घटना नोंदवल्या गेल्या. ज्यात ४४ हजार २१९.७३ हेक्टर जंगल जळाले. २०१९ साली सात हजार २८३ वणव्याच्या घटनांमध्ये ३६ हजार ००६.७२७ हेक्टर जंगल जळाले. २०२० साली ६ हजार ३१४ वणव्याच्या घटनांमध्ये १५,१७५.९५ हेक्टर जंगल जळाले. २०२१ मध्ये १० हजार ९९१ वणव्याच्या घटना घडल्या. ज्यात ४० हजार २१८.१३ हेक्टर जंगल जळाले. २०२२ मध्ये ७ हजार ५०१ घटनांमध्ये २३ हजार ९९०.६७ हेक्टर जंगल जळाले. २०२३ मध्ये वणव्याच्या ४ हजार ४८२ घटनांमध्ये ११ हजार ०४८.८८ हेक्टर जंगल जळाले.
नवे ‘वणवा नियंत्रण मॉडेल’ काय?
मध्य प्रदेशने रुळवलेले आणि छत्तीसगडमध्येही लागू असलेले वणवा नियंत्रण मॉडेल आता देशभरात लागू केले जाणार आहे. या मॉडेलमध्ये वनकर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीमधील ‘ॲप’द्वारे आगीची माहिती मिळते. छत्तीसगडने मागील वर्षी या मॉडेलचा वापर केल्यावर वणव्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. या मॉडेलमध्ये उपग्रहातून मिळालेल्या प्रतिमांचे विश्लेषण करून सर्वाधिक आग केव्हा आणि कुठे लागते याचा अभ्यास करण्यात येतो. या निष्कर्षांच्या आधारे २०१६ मध्ये बनवलेले ‘फॉरेस्ट फायर कंपेंडियम’ अधिक प्रभावी बनवले गेले. याअंतर्गत, क्षेत्रीय कर्मचारी आणि लोकांपर्यंत आगीची माहिती त्वरित पोहोचवण्यासाठी ‘सिंपली फायर सिस्टीम’ विकसित करण्यात आली. यामध्ये उपग्रह प्रतिमा ‘ॲप’वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात आगीचे ठिकाण आणि व्याप्ती याची अचूक माहिती असते.
rakhi.chavhan@expressindia.com