राखी चव्हाण
देशभरात जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेत तांत्रिक त्रुटी आढळल्याने अनेक राज्यांत नव्याने गणना करण्यात येत आहे. पावसाळय़ात ती शक्य नसल्याने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आता नोव्हेंबरमध्ये ती सुरू करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रात या व्याघ्रगणनेसाठी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. पावसामुळे गवत वाढले आहे आणि गणना करताना वन्यप्राणी दिसणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकाचा गणनेच्या तयारीदरम्यान वाघाने बळी घेतला. त्या पार्श्वभूमीवर आधी सुरक्षेची हमी द्या, नंतरच गणनेत सहभागी होऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
व्याघ्रगणनेची पद्धत कशी बदलत गेली?
जंगलात फिरून वन्यजीवांची नोंद करणे, पाणवठय़ावर बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यजीवांची नोंद घेणे आणि पदचिन्हाच्या आधारे व्याघ्रगणनेची नोंद करणे या पद्धती जवळजवळ दीड दशकांपूर्वीपर्यंत अमलात होत्या. ब्रिटिशांनी घालून दिलेल्या या पद्धतीचा वापर स्वातंत्र्यानंतरही भारतीय वनाधिकारी करत होते. बदलत्या काळानुसार या पद्धती अशास्त्रीय ठरल्या. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणानेच त्या बाद ठरवल्या. गेल्या दीड दशकांपासून मात्र, डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने शास्त्रीय पद्धत अमलात आणली. यात ट्रॅन्सॅट लाइन मॉनिटिरग, कॅमेरा ट्रॅप, चिन्हांचे सर्वेक्षण आदींचा समावेश आहे. चिन्ह सर्वेक्षणात वन्यजीवांच्या भ्रमणमार्गातील खुणांची नोंद करून ‘एम-स्ट्रीप’ या अॅपच्या माध्यमातून माहितीचे संकलन करण्यात येते. ट्रॅन्सॅट लाइन मॉनिटिरगचा वापर तृणभक्ष्यी प्राण्यांची घनता मोजण्यासाठी तर कॅमेरा ट्रॅपचा वापर छायाचित्रात टिपल्या गेलेल्या वाघांच्या शरीरावरील पट्टय़ावरून त्यांची ओळख ठरवण्यासाठी केला जातो.
व्याघ्रगणना नव्याने करण्याचा निर्णय का?
व्याघ्रगणनेपूर्वी भारतातील सर्वच राज्यांतील वनाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना गणना पद्धतीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात व्याघ्रगणनेस सुरुवात झाली तेव्हा तांत्रिक पद्धतीने गणना करूनही अनेक ठिकाणी त्यात त्रुटी आढळल्या. परिणामी माहिती जुळवताना अडचणी उद्भवल्या. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या, त्या त्या ठिकाणी नव्याने व्याघ्रगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय जानेवारी महिन्यात व्याघ्रगणनेची तयारी करताना चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. त्याचाही परिणाम व्याघ्रगणनेवर झाला. पावसाळय़ात ती शक्य नसल्याने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने नोव्हेंबरमध्ये गणना करण्याचे निर्देश दिले.
व्याघ्रगणनेसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात कोणत्या त्रुटी?
प्रशिक्षणात ‘फ्रंटलाइन स्टाफ’ची सुरक्षा आणि त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. या व्याघ्रगणनेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते, पण त्या प्रशिक्षणात त्यांच्या सुरक्षेविषयी जागरूक केले जाते का, हा प्रश्न आहे. गणना करताना हिंस्र प्राणी समोर आल्यास स्वत:ची सुरक्षा कशी करायची, सुरक्षेसाठी गणनेदरम्यान लागणारी साधने पुरवली जातात का, प्रत्यक्ष घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी जातात का, हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. व्याघ्रगणनेदरम्यान या सुरक्षा नियमांची जाणीव करून देणे हे प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र, प्रशिक्षणाचा भर हा दिलेल्या ‘वर्कशीट’मध्ये माहिती कशी भरायची, गणना कशी करायची अशा बाबींवरच अधिक असतो. त्यापेक्षा या क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांना घुंगराची काठी, मानेला सुरक्षाकवच, हातात टॉर्च अशी सुरक्षा उपकरणे असणारी किट देणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते.
क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांचा व्याघ्रगणनेत सहभागी होण्यास नकार का?
जानेवारी महिन्यात आयोजित व्याघ्रगणनेदरम्यात ‘ट्रॅन्सॅट लाइन’वर काम करताना चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील महिला वनरक्षक स्वाती ढुमणे वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ताडोबाच नाही तर देशभरातील वन कर्मचारी भयभीत झाले आहेत. त्यावर मात करत नव्याने होणाऱ्या प्रगणनेत हे क्षेत्रीय वन कर्मचारी सहभागी होण्यास तयार आहेत. मात्र, व्याघ्रगणनेदरम्यान हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यापासून होणाऱ्या सुरक्षेची हमी त्यांनी वरिष्ठांना मागितली आहे. या वर्षी पाऊस प्रचंड झाल्यामुळे गवत घनदाट आणि उंच वाढले आहे. त्यात वावरणारे वन्यप्राणी पटकन दिसून येत नाहीत. अशा परिस्थितीत ताडोबातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेची हमी देऊन ही व्याघ्रगणना पुढे ढकलण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
व्याघ्रगणना कुणाच्या सहकार्यातून?
चार वर्षांतून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्रगणना ही राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबवण्यात येते. प्रत्येक राज्याचे वन खाते त्याची अंमलबजावणी करी. २०१८ च्या ताज्या गणनेनुसार भारतात अंदाजे दोन हजार ९६७ वाघ आहेत. त्यापैकी दोन हजार ४६१ वाघांची छायाचित्रे वैयक्तिक पातळीवर टिपली गेली आहेत. ही आकडेवारी वाघांच्या एकूण संख्येच्या ८३ टक्के असल्याने सर्वेक्षणाच्या व्यापकतेवर ती प्रकाश टाकते.
rakhi.chavhan@expressindia.com