ISI Ex Chief Faiz Hameed पाकिस्तानच्या लष्कराने इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शलची कारवाई सुरू केली. लष्कराने सांगितले की, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख असलेल्या हमीद यांच्यावर सशस्त्र दलातून निवृत्तीच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि जमीनविकासाच्या मुद्द्यामध्ये त्यांच्या सहभागाबद्दलही अनेक आरोप आहेत.
“पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, फील्ड जनरल कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना ताब्यात घेण्यात आले आहे,” असे लष्कराने सांगितले. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच आयएसआय प्रमुखाला कोर्ट मार्शल प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मित्रपक्षांवरील कारवाईचा हा एक भाग असल्याचे अनेकांचे सांगणे आहे. फैज हमीद नक्की कोण आहेत? त्यांच्यावर काय आरोप आहेत? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : मंगळावर जीवसृष्टी? शास्त्रज्ञांना ग्रहावर सापडला पाण्याचा मोठा साठा; याचा नेमका अर्थ काय?
कोण आहेत फैज हमीद?
लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) फैज हमीद यांनी २०१९ ते २०२१ पर्यंत पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे नेतृत्व केले. ते देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील एक प्रमुख व्यक्ती होते. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची जागा त्यांनी घेतली होती. ते योगायोगाने सध्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख आहेत. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यकाळात हमीद यांना पदोन्नती मिळत गेली. ते इम्रान खान यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. त्यांची आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी ते २०१७ मध्ये चर्चेत आले होते. कारण- त्यांनी पाकिस्तानची राजकीय संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’ यांनी सुरू केलेले फैजाबाद धरणे आंदोलन वाटाघाटीद्वारे सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होते.
२०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हमीद यांचे काबूलच्या सेरेना हॉटेलमध्ये तालिबानबरोबर चहा पितानाचे अनेक फोटो समोर आले, तेव्हा त्यांचा चेहरा आंतरराष्ट्रीय वृत्तांमध्ये झळकला. त्यावेळी अनेकांनी असे मत नोंदवले होते की, पाकिस्तान तालिबानला समर्थन देतेय, असे या फोटोंतून दिसते आहे. आयएसआय प्रमुख म्हणून आपल्या कार्यकाळात अनेक राजकारण्यांनी हमीदवर आरोप केले. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सार्वजनिकपणे असा दावा केला की, २०१७ मध्ये त्यांना सत्तेवरून काढून टाकण्यामागे जनरल हमीद, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गट आणि आणखी एका लष्करी जनरलचा हात होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांच्या निवृत्तीच्या चार महिने आधी जनरल मुनीर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हमीद यांना राजीनामा द्यावा लागला. ते बाहेर पडत असताना इम्रान खान यांनी त्यांचे पद टिकून राहावे यासाठी प्रयत्न केले; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यावेळी इम्रान खान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात तणाव होता. सध्याच्या प्रकरणाव्यतिरिक्त पाकिस्तानचे माजी मंत्री फैसल वावडा यांनी मे २०२३ मध्ये हमीद यांच्यावर अल-कादिर ट्रस्ट प्रकरणाचा मास्टरमाईंड आणि सर्वांत मोठा लाभार्थी असल्याचा आरोप केला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीने बहरिया टाऊन लिमिटेडकडून अब्जावधी पाकिस्तानी रुपये आणि जमीन बेकायदापणे मिळवली असल्याचे आरोप आहेत. हे तेच प्रकरण आहे.
हमीद यांना अटक कशामुळे झाली?
हमीद यांच्यावर गृहनिर्माण घोटाळ्याचे आरोप आहेत. त्याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आणि आता त्यांच्यावर कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू आहे. टॉप सिटी हाऊसिंग डेव्हलपमेंटचे मालक मोईज अहमद खान यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. त्यांच्या याचिकेत सांगण्यात आले की, हमीद यांच्या सांगण्यावरून आयएसआयने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर छापे टाकले. छाप्यांदरम्यान मौल्यवान वस्तू, सोने, हिरे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. खान यांच्याकडून हमीद यांनी चार कोटी रुपयांची खंडणी घेतली.
याच याचिकेवरील सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि असे म्हटले होते की, हमीद यांच्यावरील हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. हे आरोप जर खरे असल्याचे सिद्ध झाले, तर ते दोषी असतील. कारण- त्यामुळे देशाचे फेडरल सरकार, सशस्त्र सेना, आयएसआय आणि पाकिस्तान रेंजर्ससह पाकिस्तानच्या इतर संस्थांची प्रतिष्ठा कमी होईल.
हमीद यांनी अधिकाराचा गैरवापर केल्यासंबंधित आरोपांची चौकशी करण्यासाठी लष्कराने एक समिती स्थापन केली होती. सोमवारी (१२ ऑगस्ट) पाकिस्तानी लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे आणि हमीद यांना लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले आहे. “पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, लेफ्टनंट जनरल फैज हमीद (सेवानिवृत्त) यांच्याविरोधात केलेल्या टॉप सिटी प्रकरणातील तक्रारींची शुद्धता तपासण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने सविस्तर न्यायालयीन चौकशी हाती घेतली होती. परिणामी, पाकिस्तान आर्मी कायद्याच्या तरतुदींनुसार लेफ्टनंट जनरल फैज हमीद (सेवानिवृत्त) यांच्यावर शिस्तभंगाची योग्य ती कारवाई सुरू करण्यात आली आहे,” असे ‘आयएसपीआर’ने सांगितले.
हमीद यांच्या अटकेचा फायदा काय?
हमीद यांची पाकिस्तानात झालेली अटक आश्चर्यकारक आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत व आता वॉशिंग्टनमधील हडसन इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी हुसेन हक्कानी यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले, “माजी गुप्तचर संस्थाप्रमुखाची अटक आणि संभाव्य खटला पाकिस्तानसाठी असामान्य बाब आहे.” वॉशिंग्टन डीसीमधील विल्सन सेंटरचे सहकारी मायकेल कुगेलमन यांनीही ‘द फायनान्शियल टाइम्स’ला सांगितले, “आजकाल असा संदेश पाकिस्तानी लोकांना पाठविणे हे धोरणात्मक आहे. कारण- सध्या परिस्थिती अशी आहे की, लोकांमध्ये लष्करविरोधी भावना जास्त आहे.”
हेही वाचा : 1971: बांगलादेश मुक्तीसंग्रामातील पाकिस्तानच्या आत्मसमर्पण पुतळ्याची तोडफोड? काय आहे या पुतळ्याचे महत्त्व?
इतर अनेकांसाठी, हमीद यांची अटक हा माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी एक इशारा आहे. माजी माहिती मंत्री व राजकीय विश्लेषक मुर्तझा सोलांगी यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले, “हे अर्थातच इम्रान खान आणि त्यांच्या राजकीय पक्षाला उद्देशून आहे; ज्यांना जनरल हमीद यांच्या निवृत्तीपूर्वी आणि नंतर खूप फायदा झाला आहे. परंतु, त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली बळकट झालेल्या लष्कराचा हा एक शक्तिशाली संदेश आहे की, सैन्याला कमकुवत करण्याचा आणि विभाजित करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.”