२०१२ च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सुवर्णपदक जिंकून देणारा ऑस्कर पिस्टोरियस तब्बल ११ वर्षांनी तुरुंगाबाहेर येणार आहे. आपल्या राहत्या घरात प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हीचा गोळ्या घालून खून केल्याच्या गुन्ह्याखाली तो सध्या शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, तो आता तुरुंगाबाहेर येणार असल्यामुळे त्याच्यासोबत नेमके काय होणार? तुरुंगाबाहेर येण्यासाठी त्याच्यासमोर कोणकोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत, हे जाणून घेऊ या…
ऑस्कर पिस्टोरियस तुरुंगाबाहेर येणार
ऑस्कर पिस्टोरियस ५ जानेवारी रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर येणार आहे. त्याने आपली प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हीचा २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गोळ्या घालून खून केला होता. कार्बन-फायबरच्या कृत्रिम पायांच्या मदतीने वेगात धावण्याच्या शैलीमुळे त्याला ‘ब्लेड रनर’ म्हणून ओळखले जात होते. त्याला या खुनाप्रकरणी १३ वर्षे आणि ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मार्च २०२३ मध्ये त्याने आपली अर्धी शिक्षा भोगली होती. त्यामुळे पॅरोलवर बाहेर येण्यास तो पात्र ठरला होता. पुढे २४ नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याच्या पॅरोलचा अर्ज मंजूर करण्यात आला होता. या आदेशानुसार तो आता ५ जानेवारी रोजी तुरुंगाबाहेर येणार आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यावर नेमके काय होणार?
ही सुटका ऑस्कर पिस्टोरियससाठी त्याच्या आयुष्यासाठी फार महत्त्वाची ठरू शकते. तो दक्षिण आफ्रिकेच्या रिस्टोरेटिव्ह जस्टीस प्रोग्रामअंतर्गत बाहेर येणार आहे. ऑस्कर पिस्टोरियस तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्यावर अनेक बंधनं असतील. दक्षिण आफ्रिकेच्या सुधारणा सेवा विभागाने (डीसीएस) नोव्हेंबर २०२३ मध्ये सांगितल्यानुसार पिस्टोरियस त्याची उर्वरित शिक्षा कम्यूनिटी करेक्शन्स सेंटरमध्ये पूर्ण करेल. या काळात त्याच्यावर डीसीएसची नजर असेल. त्याची शिक्षा डिसेंबर २०२९ मध्ये पूर्ण होणार असून या काळात त्याच्यावर पॅरोलदरम्यान ठेवण्यात आलेल्या अटी लागू असतील. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. तुरुंगातून आल्यानंतर पिस्टोरियस नोकरी शोधतोय की दुसरीकडे राहायला जातोय, याबाबतची माहिती हा अधिकारी तुरुंगाला देत राहील.
पिस्टोरियपुढे वेगवेगळ्या अटी
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पिस्टोरियसला लिंगाधारित हिंसाचाराबाबत जागृती करणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागेल. राग नियंत्रणात राहावा यासाठी त्याला वेगेवगळ्या थेरेपीज सुरू ठेवाव्या लागणार आहेत. पॅरोल मंजूर करतानाच त्याला या अटी घालण्यात आल्या आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो प्रिटोरिया येथे राहण्याची शक्यता आहे.
पिस्टोरियसची सुटका कोणत्या आधारावर झाली?
पिस्टोरियसची पॅरोलवर सुटका करण्यासाठी संबंधित प्रशासनाने अनेक गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. यामध्ये त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप, तो हाच गुन्हा परत करण्याची शक्यता, तुरुंगातील त्याची वागणूक, त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती, त्याला तुरुंगाबाहेर असलेला संभाव्य धोका अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्याला पॅरलोल मंजूर करण्यात आली आहे.
पिस्टोरियसचा रिस्टोरेटिव्ह जस्टीस प्रोग्राममध्ये सहभाग
पॅरोल मंजूर होण्याआधीही पिस्टोरियसने रिस्टोरेटिव्ह जस्टीस प्रोग्राममध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या मोहिमेअंतर्गत एखाद्या गुन्ह्यातील गुन्हेगार आणि पीडित यांच्यात चर्चा घडवून आणली जाते. चर्चेच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा यात प्रयत्न केला जातो. मात्र अशा प्रकारच्या मोहिमेत सहभाग नोंदवणे हा सर्वस्वी गुन्हेगार आणि पीडित यांचा अधिकार असतो.
पिस्टोरियस आणि रिव्हा स्टीनकॅम्प यांच्या वडिलांत चर्चा
रिस्टोरेटिव्ह जस्टीस प्रोग्राम अंतर्गत स्टीनकॅम्प यांचे कुटुंबीय ज्या ठिकाणी राहतात, त्याच प्रदेशातील एका तुरुंगात पिस्टोरियसला हलवण्यात आले होते. पिस्टोरियसची तुरुंगातून लवकर सुटका व्हावी यासाठी २०२१ मध्ये हा प्रयत्न करण्यात आला होता. याच मोहिमेअंतर्गत पिस्टोरियस आणि रिव्हा स्टीनकॅम्प यांचे वडील बॅरी स्टीनकॅम्प यांच्यात २२ जून २०२२ मध्ये चर्चा झाली होती.
पॅरोलवर सुटका झाल्यामुळे रिव्हा यांच्या कुटुंबीयांची भूमिका काय?
पिस्टोरियासला मिळालेल्या एकूण शिक्षेपैकी काही शिक्षा त्याने भोगलेली आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेमुळे आम्हाला आश्चर्य वाटलेले नाही, अशी प्रतिक्रिया स्टीनकॅम्प कुटुंबीयांच्या वकिलाने दिली. पिस्टोरियसच्या पॅरोलच्या अर्जावर सुनावणी सुरू असताना रिव्हा स्टीनकॅम्प यांच्या आई जून स्टीनकॅम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. पिस्टोरियस बदलला आहे, याची मला खात्री नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच पिस्टोरियसला पॅरोल मंजूर होत असेल तर माझा त्याला आक्षेप नाही, असेही त्यांनी सांगितले होते.
जून स्टीनकॅम्प यांनी मानले आभार
पिस्टोरियसला पॅरोल मिळाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांना या प्रकियेत सामावून घेतल्याबद्दल जून स्टीनकॅम्प यांनी पॅरोल मंडळाचे आभार मानले. तर पिस्टोरियसचे वकील किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी काय घडले होते?
२०१३ सालच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रिटोरिया येथील आपल्या आलिशान घरात ऑस्करने बाथरूममध्ये प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पवर गोळ्या झाडल्या. त्यादिवशी रिव्हा ऑस्करला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या घरात बाथरूममध्ये लपून बसली होती. मात्र आपल्या घरात घुसखोर आल्याचा संशय येऊन ऑस्करने गोळ्या झाडल्या. बाथरुमचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये रिव्हा असल्याचे कळले. २९ वर्षीय रिव्हा स्टीनकॅम्प त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती.
ऑस्कर पिस्टोरियसवरील खटला पाच महिने चालला. या काळात दक्षिण आफ्रिका आणि जगभरात महिलांवरील अत्याचार, वांशिक भेदभाव यावर अनेक चर्चा झाल्या.
ऑस्कर पिस्टोरियस संशयखोर
ऑस्करने संतापाच्या भरात रिव्हावर गोळ्या झाडल्या, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोघांच्याही मेसेजेसवरून त्यांच्या नात्यात सर्वकाही ठिक नव्हते, याचाही प्रत्यय येत होता. ऑस्कर हा संशयखोर आणि ईर्षा असलेला व्यक्ती आहे, असा आरोप रिव्हाने खून होण्याआधी केला होता. तसेच खून होण्याच्या एक आठवडा आधी तिने केलेल्या एका मेसेजमध्ये ऑस्करची तिला भीती वाटत असल्याचे म्हटले होते. ऑस्कर कधी कधी तिच्या अंगावर धावून जात असल्याचेही तिने म्हटले होते.