भारताच्या जडणघडणीला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून वेगळे करता येणे अशक्य आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक आव्हानात्मक, तसेच भारताचे भविष्य घडवणारे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचे आजही काही लोक तोंडभरून कौतुक करतात; तर काही लोक आणीबाणीसारख्या निर्णयाची आठवण करीत इंदिरा गांधींवर टीका करतात. मात्र, आपल्या हयातीत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाचा विचार केला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची सकाळीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घातपातामुळे हरहुन्नरी व प्रचंड कार्यक्षमता असलेल्या महिला नेत्याला भारत मुकला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्यावर सोपवण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे इंदिरा यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरलेला असताना, दुसरीकडे देशाला राजीव गांधी यांच्या रूपात नवे खंबीर नेतृत्व देण्यावर विचार केला जात होता. याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींची हत्या नेमकी कशी झाली? राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान कसे झाले? हे जाणून घेऊ या…

३१ ऑक्टोबरच्या सकाळी इंदिरा गांधींची हत्या

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आपल्या रोजच्या दिनचर्येनुसार त्या ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी उठल्या होत्या. दिवसभर ठरलेली कामे करण्यासाठी त्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तयार झाल्या. सकाळीच पीटर उस्तिनाव्ह हे पत्रकार त्यांची मुलाखत घेणार होते. मात्र, ठरलेली ही मुलाखत सकाळी ९ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. ही मुलाखत घेणारे पथक १, अकबर रोड येथे थांबल्याचे इंदिरा गांधी यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर भोजन दालनातून त्या चालत बाहेर निघाल्या होत्या. या दालनातून बाहेर निघाल्यानंतर दोन्ही बाजूंनी झाडे असलेल्या रस्त्याने त्या चालत होत्या. १, अकबर रोड येथील कार्यालयाच्या दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर सबइन्स्पेक्टर बियांत सिंग हा दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावला. तो अभिवादन करण्यासाठी आपला हात उंचावतो आहे, असे इंदिरा गांधी यांना वाटले होते. मात्र काही समजायच्या आत बियांत सिंग याने इंदिरा गांधी यांच्यावर तीन फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. त्याच्या हातात पिस्तूल होते. नऊ वर्षांपासून तो इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा दलात होता. त्यानंतर काही क्षणांतच कॉन्स्टेबल सतवंत सिंग पुढे आला. त्यानेदेखील आपल्या स्टेनगनमधून इंदिरा गांधी यांच्यावर २५ गोळ्या झाडल्या. इंदिरा गांधी यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा सकाळचे ९ वाजून १६ मिनिटे झाली होती.

या हल्ल्यानंतर काही क्षणांतच इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी एकच गोंधळ उडाला. त्यांना तत्काळ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी यांची स्नुषा सोनिया गांधी यादेखील त्यांच्यासोबत होत्या. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते.

राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

ही घटना घडली तेव्हा इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. याच काळात राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे परदेशात होते. मात्र, इंदिरा गांधी यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच ग्यानी झैलसिंग, तसेच राजीव गांधी तत्काळ दिल्लीला रवाना झाले होते. इंदिरा गांधी यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्यात ते अपयशी ठरले. इंदिरा गांधींची हत्या झाल्याचे समजताच देशभरात हाहाकार माजेल म्हणून त्यांच्या मृत्यूचे वृत्त दुपारी रोखून ठेवण्यात आले होते. तोपर्यंत या घटनेची माहिती होताच इंदिरा गांधी यांचे सहकारी तसेच राजीव गांधी, राष्ट्रपती दिल्लीत पोहोचले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा राजीव गांधी यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

मंत्र्यांकडेही कायदेशीर अधिकार राहिले नव्हते

डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे इंदिरा गांधी यांचे मुख्य सचिव होते. इंदिरा गांधी यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ते दिल्लीत नव्हते. इंदिरा यांचा मृत्यू झाल्यानंतर देशात पंतप्रधानपदावर कोणीही नव्हते. देशातील सत्तेत पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या घडमोडींवर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच देशाला सांभाळण्यासाठी एका प्रभावी नेतृत्वाची गरज होती. पंतप्रधानांचाच मृत्यू झाल्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडेही काही कायदेशीर अधिकार राहिले नव्हते. अशा प्रसंगात देशाचे तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव, तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे महत्त्वाचे नेतेदेखील दिल्लीबाहेर होते. त्यामुळे आता देशाला सांभाळण्यासाठी दिशादर्शन कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.

रुग्णालयात पंतप्रधानपद कोणाला द्यावे, यावर चर्चा

इंदिरा गांधी यांच्या हत्येची बातमी समजताच काँग्रेसचे केंद्रीय नेते एम्स रुग्णालयात जमा होऊ लागले. पंतप्रधानपदी कोणत्याही एखाद्या नेत्याची रीतसर नेमणूक होईपर्यंत हंगामी पंतप्रधानपदाची नेमणूक करावी की लगेच नवा नेता निवडून, त्याची पंतप्रधानपदी नेमणूक करावी, यावर या नेत्यांत चर्चा सुरू झाली होती. याआधी दोन वेळा पंतप्रधानांचा मृत्यू झाल्यानंतर गुलझारीलाल नंदा यांच्याकडे हंगामी पंतप्रधानपद सोपवण्यात आले होते. हंगामी पंतप्रधानपदासाठी नेत्याची ज्येष्ठतेनुसार निवड करायची झाल्यास गुलझारीलाल नंदा हे काँग्रेसमधील सर्वांत ज्येष्ठ नेते होते. मात्र, मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे अनौपचारिकरीत्या सर्वांत ज्येष्ठ मानले जात. दुसरीकडे हंगामी पंतप्रधानपद नको. राजीव गांधी दिल्लीत पोहोचताच त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक करावी. त्यांना पंतप्रधानपदाची शपथ द्यावी, असेही काही नेत्यांचे मत होते.

हंगामी पंतप्रधान नेमण्याला अनेक नेत्यांचा विरोध

इंदिरा गांधी यांचे पार्थिव एम्स रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर होते. एकीकडे डॉक्टर त्यांच्या मृतदेहावर शस्त्रक्रियेचे काम करीत होते. तर, दुसरीकडे देश, तसेच राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी याच आठव्या मजल्यावर गर्दी केली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी, राजस्थानचे मुख्यमंत्री शिवचरण माथूर, हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल, ओडिशाचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनाईक आदी नेत्यांचा समावेश होता. या सर्व नेत्यांशी अलेक्झांडर यांनी वार्तालाप केला होता. या सर्वच नेत्यांनी हंगामी पंतप्रधान नेमण्याला विरोध केला होता. तसेच राजीव गांधी यांना पंतप्रधानपदी नेमावे, अशी भावना या सर्वच नेत्यांनी व्यक्त केली होती.

प्रणव मुखर्जी यांनी निर्णयाला सहमती दर्शवली

दरम्यान, दुसरीकडे तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव हैदराबादहून तत्काळ दिल्लीत आले होते. त्यांनीदेखील राजीव गांधी यांना पंतप्रधान करणे योग्य ठरेल, असे मत मांडले. ३१ ऑक्टोबर रोजी राजीव गांधी साधारण ३.१५ वाजता प्रणव मुखर्जी, अरुण नेहरू यांच्यासमवेत दिल्लीत आले होते. राजीव गांधी ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर अलेक्झांडर यांनी पंतप्रधानपदाबाबत प्रणव मुखर्जी यांच्याशी वार्तालाप केला होता. मुखर्जी यांनीदेखील राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवण्यास सहमती दर्शवली.

शपथविधीसाठी मोठा कायदेशीर पेच

काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील नेते अशा सर्वांनीच राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यास तयारी दर्शवली होती. त्यानंतर अशा कठीण परिस्थितीत राजीव यांचा शपथविधी लवकरात लवकर उरकून टाकावा, अशी भावना काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, त्यासाठी मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला होता.

पी. सी. अलेक्झांडर यांनी केला होता ठाम विरोध

देशाचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे आधीच नाराज आहेत. त्यामुळे ते दिल्लीत दाखल होण्याची वाट न पाहता, उपराष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी यांचा शपथविधी उरकून घ्यावा, असे मत काँग्रेसचे नेते अरुण नेहरू यांनी मांडले होते. उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांशी माझं बोलणं झालं असून, त्याला कोणाचाही विरोध नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, अरुण नेहरू यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपराष्ट्रपतींच्या हस्ते शपथविधी झाला, तर पुढे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता होती. याच कारणामुळे पी. सी. अलेक्झांडर यांनी त्याला ठाम विरोध दर्शवला होता. राष्ट्रपती भारतात येईपर्यंत वाट पाहावी, अशी भूमिका तेव्हा अलेक्झांडर यांनी घेतली होती. झैलसिंग आधीच नाराज आहेत. त्यामुळे ते परंपरेला धरून मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ मंत्र्याला हंगामी पंतप्रधानपदाची शपथ देण्याचा आग्रह धरतील. आपण हा धोका पत्करता कामा नये. झैलसिंग आपल्या पसंतीनुसार प्रणव मुखर्जी यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड करतील. त्यामुळे गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत अरुण नेहरू यांनी मांडले होते.

राष्ट्रपती दिल्लीत येईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय

तांत्रिकदृष्ट्या पाहायचे झाल्यास राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतिपदाची जबाबदारी पार पाडतात. राष्ट्रपती झैलसिंग हे भारताकडे रवाना झाले होते. राजीव गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित होईपर्यंत त्यांचे विमान हे भारताच्या सीमेत आले असावे. त्यामुळे उपराष्ट्रपतींना कायदेशीरदृष्ट्या राष्ट्रपतींचे काम करता येणार नाही, ही अडचण अलेक्झांडर यांनी तेथे जमलेल्या नेत्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे शेवटी राष्ट्रपती येईपर्यंत थांबावे की उपराष्ट्रपतींच्या हस्ते शपथ घ्यावी, हे राजीव गांधी यांना विचारायचे ठरले. अलेक्झांडर यांनी राजीव गांधी यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर राष्ट्रपती दिल्लीत येण्याची वाट पाहू या, अशी भूमिका राजीव गांधी यांनी घेतली.

६ वाजता शपथविधी करण्याचे ठरले

राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्याचे ठरल्यानंतर काँग्रेसच्या संसदीय मंडळाने १, अकबर रोड (इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानातील कार्यालय) येते तातडीची बैठक बोलावली. तेथे राजीव गांधी यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच राजीव गांधी यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रपतींच्या सोईनुसार सायंकाळी ६ वाजता शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले. यावेळी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

शपथविधीस ४० मिनिटे उशीर

त्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनीदेखील राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यास मी तयार असल्याचे सांगितले. राष्ट्रपतींच्या संमतीनंतर ठरल्यानुसार सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलमध्ये शपथविधीचे आयोजन करण्यात आले. मात्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि नियोजित पंतप्रधान राजीव गांधी यांना कार्यक्रमस्थळी येण्यास ४० मिनिटे उशीर झाला. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत शपथविधी समारंभ पार पडला.

दरम्यान, संविधानिकदृष्ट्या राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान झाले होते. राजीव गांधी यांचा शपथविधी पार पडला तेव्हा इंदिरा गांधी यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातच होते. त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. राजीव गांधी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत इंदिरा गांधी यांच्यावरील अंत्यसंस्काराविषयी काही निर्णय घेतले. ३ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांच्यावर शांतीवन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. १९६४ साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. एकीकडे इंदिरा गांधी अनंतात विलीन झाल्या होत्या; तर राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नवी राजकीय वाटचाल सुरू केली होती.

Story img Loader