तांदूळ भारतीयांच्या आहारातील मुख्य घटक आहे आणि लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. तरीही अनेकांच्या शरीरात पोषक घटकांची कमतरता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०२१ अंतर्गत मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व योजनांमध्ये फोर्टिफाइड तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा डिसेंबर २०२८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाविषयी माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “ॲनिमिया आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करणे, हा यामागचा उद्देश आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए), एप्रिल २०२२ मध्ये मार्च २०२४ पर्यंत देशभरात टप्प्याटप्प्याने तांदूळ फोर्टिफिकेशन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. सर्व नियोजित टप्पे आता यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, सार्वत्रिक व्याप्तीच्या लक्ष्यापर्यंत हा उपक्रम पोहोचला असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे नक्की काय? त्याची गरज का आहे? हे तांदूळ मोफत वाटण्यामागील केंद्र सरकारचा उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.

फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?

देशातील सर्वोच्च अन्न नियामक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियानुसार (FSSAI), फोर्टिफिकेशन प्रक्रियेत अन्नातील आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवले जाते आणि त्यामुळे अन्नाची पौष्टिक गुणवत्ता सुधारली जाते. अशा अन्नातील पोषक घटक कुपोषण, अशक्तपणा असणार्‍यांसाठी प्रभावी ठरतात. भारतात महिला आणि मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील प्रत्येक दुसरी महिला अशक्त (ॲनेमिक) आहे आणि प्रत्येक तिसर्‍या मुलाचा शारीरिक विकास खुंटलेला आहे.

हेही वाचा: ब्रिटनमध्ये केला जात होता ‘नागा मानवी कवटी’चा लिलाव; भारताने केला हस्तक्षेप, नेमके प्रकरण काय?

“२०१९ आणि २०२१ दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, ॲनिमिया ही भारतातील एक व्यापक समस्या आहे, ज्याचा परिणाम विविध वयोगटातील मुले, स्त्रिया आणि पुरुष, तसेच उत्पन्नाच्या स्तरांवर होतो. लोह, इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता, जसे की व्हिटॅमिन बी १२ आणि फॉलिक ॲसिड. त्यामुळे लोकांच्या एकूण आरोग्यावर आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो.” कुपोषणाचा सामना करण्यासाठी अन्नामध्ये पोषक तत्वांच्या समावेश करणे, ही सर्वात योग्य पद्धत मानली जाते. तांदूळ हे भारतातील आहाराच्या मुख्य घटकांपैकी एक आहे, जे भारतीय लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक आपल्या आहारात समाविष्ट करतात. भारतात दरडोई तांदळाचा वापर दरमहा ६.८ किलो आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांसह तांदळातील पोषक तत्व वाढवणे गरिबांच्या आहाराला पूरक असा पर्याय आहे.

देशात अशी अनेक तंत्रे आहेत, ज्याद्वारे फोर्टिफाइड तांदूळ तयार होतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

कसा तयार होतो फोर्टिफाइड तांदूळ?

देशात अशी अनेक तंत्रे आहेत, ज्याद्वारे फोर्टिफाइड तांदूळ तयार होतो. कोटिंग, डस्टिंग आणि ‘एक्सट्रूझन’ यांसारख्या तंत्रांचा वापर तांदळामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये समाविष्ट करण्यासाठी केला जातो. ‘एक्सट्रूडर’ मशीन वापरून मिश्रणातून फोर्टिफाइड राइस कर्नल (एफआरके) तयार केले जातात. भारतासाठी हे सर्वोत्तम तंत्रज्ञान मानले जाते. सर्वप्रथम कोरडे तांदूळ दळून त्याचे पीठ तयार केले जाते. या पिठात सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळली जातात आणि या मिश्रणात नंतर पाणी मिसळले जाते. हे मिश्रण नंतर हीटिंग झोनसह ट्विन-स्क्रू एक्सट्रूडरमधून जाते आणि तांदळाच्या आकाराचे दाणे म्हणजेच कर्नल तयार होतात, त्यालाच फोर्टिफाइड राईस कर्नल असे म्हणतात.

कर्नल वाळवले जातात, थंड केले जातात आणि पॅक केले जातात. फोर्टिफाइड राईस कर्नलचे शेल्फ लाइफ किमान १२ महिने असते. दर्जेदार तांदूळ तयार करण्यासाठी कर्नल साधारण तांदळात मिसळले जातात. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १० ग्रॅम फोर्टिफाइड राईस कर्नल एक किलो तांदळात मिसळले जाते. एफएसएसएआय नियमांनुसार, एक किलो फोर्टिफाइड तांदळात खालील गोष्टी असतील: लोह (२८-४२.५ मिलिग्राम), फॉलिक ॲसिड (७५-१२५ मिलिग्राम), व्हिटॅमिन बी-१२ (०.७५-१.२५ मायक्रोग्राम), झिंक (१०-१५ मिलिग्राम), व्हिटॅमिन ए (५००-७५० मायक्रोग्राम), व्हिटॅमिन बी-१ (१-१.५ मिलिग्राम), व्हिटॅमिन बी-२ (१.२५-१.७५ मिलिग्राम), व्हिटॅमिन बी-३ (१२.५-२० मिलिग्राम) आणि व्हिटॅमिन बी-६ (१.५-२.५ मिलिग्राम) प्रति किलो.

फोर्टिफाइड तांदूळ कसा शिजवला जातो?

कोणताही भात ज्या पद्धतीने शिजवून खातात, अगदी त्याचसारखा हा तांदूळ शिजवून खातात. शिजवण्यापूर्वी तांदूळ स्वच्छ धुवावे लागतात. शिजवल्यानंतर तयार होणारा भात त्यातील भौतिक गुणधर्म आणि सूक्ष्म पोषक पातळी राखून ठेवतो. फोर्टिफाइड तांदूळ लोगो ‘+F’ आणि ‘फोर्टिफाइड विथ आयर्न, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी १२’ लिहिलेल्या पिशव्यांमध्ये पॅक केले जातात.

फोर्टिफाइड तांदूळ पुरवठा उपक्रमाची रूपरेषा

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जाहीर केले की, सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) आणि शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत वाटण्यात येणाऱ्या तांदळाचे २०२४ पर्यंत मोफत वाटप केले जाईल. एप्रिल २०२२ मध्ये केंद्राने फोर्टिफाइड तांदूळ उपक्रम राबविण्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना मंजूर केली. केंद्राची योजना मंजूर झाल्यावर पहिला टप्पा आधीच लागू करण्यात आला होता. त्यात एकात्मिक बाल विकास सेवा आणि पीएम पोषण या दोन कार्यक्रमांना समाविष्ट केले गेले. दुसर्‍या टप्प्यात पीडीएस आणि इतर कल्याणकारी योजनांना २७ राज्यांमधील ११२ महत्वाकांक्षी जिल्हे आणि कुपोषणाचा उच्च धोका असलेल्या २९१ जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाइड तांदळाचा पुरवठा मार्च २०२३ पर्यंत वाढवला. तिसर्‍या टप्प्यात देशातील सर्व उर्वरित जिल्हे मार्च २०२४ पर्यंत या उपक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आले.

हेही वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात नसराल्लाहचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन खरंच मारला गेला का? हिजबुलचे पुढे काय होणार?

फोर्टिफाइड तांदळाचा खर्च दरवर्षी सुमारे २,७०० कोटी रुपये आहे. हा खर्च भारताच्या वार्षिक एकूण अन्न अनुदान बिलाच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षापासून ३१ मार्च २०२४ पर्यंत, पीडीएसद्वारे अंदाजे ४०६ लाख मेट्रिक टन फोर्टिफाइड तांदूळ वितरित केले गेले आहेत, असे सरकारने या वर्षी जुलैमध्ये जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, देशात ९२५ फोर्टिफाइड तांदूळ उत्पादक आहेत, त्यांची वार्षिक क्षमता १११ लाख मेट्रिक टन आहे. या उत्पादकांनी उत्पादित केलेले फोर्टिफाइड राइस कर्नल भारतातील २१,००० तांदूळ गिरण्यांना पाठवले जाते. या गिरण्यांमध्ये स्थापित ब्लेंडर्सची दर महिन्याला २२३ लाख मेट्रिक टन फोर्टिफाइड तांदूळ तयार करण्याची क्षमता आहे. अश्विनी वैष्णव यांच्या मते, केंद्राने भारतात मजबूत तांदूळ पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fortified rice centre extend initiative for its distribution in schemes rac