जर्मनीमध्ये सहा महिन्यांसाठी एक प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. कर्मचाऱ्यांना चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी हा या प्रायोगिक चाचणीचा हेतू होता. या चाचणीत कर्मचाऱ्यांचे वेतनही कापण्यात आले नाही किंवा कामाचे तासही वाढविण्यात आले नाही. सहा महिन्यांनंतर ७३ टक्के कंपन्यांनी सकारात्मक अहवाल दिले असून हीच पद्धत कायम ठेवण्याचे सुचविले आहे. जर्मनीमध्ये कर्मचारी कल्याणासाठी घेतलेल्या या प्रायोगिक चाचणीविषयी…
चार दिवस आठवड्याची चाचणी
जगातील अनेक देशांमध्ये सरकारी आस्थापने आणि खासगी कंपन्यांसाठी चार दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि त्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. मात्र असे करताना काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढविण्यात आले. जर्मनीमध्येही गेल्या वर्षी चार दिवसांचा आठवडा ही प्रायोगिक चाचणी राबवण्यात आली. सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आली नाही किंवा त्यांच्या कामाचे तासही वाढविण्यात आले नाहीत. जर्मनी सध्या सुस्त अर्थव्यवस्था, कुशल कामगारांची कमतरता आणि महागाई यांसारख्या समस्यांशी झुंज देत आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी चार दिवसांचा कामाचा आठवडा ही संकल्पना राबविण्याचे कंपन्यांना सुचविले. चार दिवसांचा कामाचा आठवडा कर्मचाऱ्यांना निरोगी, आनंदी आणि अधिक उत्पादनक्षम बनवेल का, हे शोधण्याचे या अभ्यासाचे उद्दिष्ट होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेली ही चाचणी ‘फोर डे वीक ग्लोबलच्या सहकार्या’ने पार पडली आणि त्यात तंत्रज्ञान, वित्त आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रांतील ४५ कंपन्यांचा समावेश होता. या निकालांमुळे युरोपमध्ये कामाचे भविष्य कसे दिसेल याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रयोगातून निष्कर्ष काय?
जर्मनीमध्ये सहा महिन्यांच्या प्रयोगाने कामाच्या ठिकाणाबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान दिले आहे. कर्मचारी संघटना आणि कंपन्यांनाही ही संकल्पना आवडली असून ती कायम ठेवण्याची मागणी केली आहे. ७३ टक्के कंपन्यांनी तर नवीन वेळापत्रक कायमच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांचा आठवडा ही संकल्पना चांगली असून ती मागे घेण्यास या कंपन्या तयार नाहीत. या नवीन पद्धतीवर सकारात्मकपणे पुढे जाण्याची योजना या कंपन्या आखत आहेत. कमी तास काम केल्याने अंतिम मुदत चुकेल किंवा कामगिरी मंदावेल अशी चिंता असूनही, बहुतेक कंपन्यांना उत्पादनावर कोणताही नकारात्मक परिणाम दिसला नाही. खरे म्हणजे चार दिवसांच्या आठवड्यांच्या निर्णयामुळे अनेक संस्थांनी कार्यक्षमतेत सुधारणा झाल्याचे नोंदवले. सुमारे ६० टक्के कंपन्यांनी बैठकांची संख्या आणि कालावधी कमी केला, तर २५ टक्के कंपन्यांनी कामकाज सुलभ करण्यासाठी नवीन डिजिटल साधने स्वीकारली. चाचणीमध्ये एका उत्पादक कंपनीने अडथळे दूर करण्यासाठी ऑटोमेशन आणि वर्कफ्लो ऑप्टिमायझेशनचा वापर केला, ज्यामुळे एकूण कामगिरी मजबूत झाली.
चाचणी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर?
लहान आठवड्यामुळे लक्षणीय आरोग्य फायदेही मिळाले. चाचणीनंतर केलेल्या सर्वेक्षणांमध्ये, ९० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांचे एकूण कल्याण सुधारले आहे आणि ८३ टक्के जणांनी वेळापत्रक कायमचे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. कामगारांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा नोंदवल्या, ज्यामध्ये कमी ताण, जास्त झोप आणि व्यायाम किंवा कौटुंबिक जीवनासाठी जास्त वेळ यांचा समावेश होता. बर्लिनमधील एका तंत्रज्ञान कंपनीतील व्यवस्थापकाने त्याच्या टीमचे वर्णन ‘अधिक प्रेरित’ आणि उत्साही असे केले. या बदलाबद्दल सुरुवातील संकोच करण्यात आला, मात्र त्याचे फायदे दिसू लागल्याने अनेक व्यवस्थपकांनी हा निर्णय चांगला असल्याचा अभिप्राय दिला. काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या बदलांमुळे त्यांना वैयक्तिक ध्येयांशी पुन्हा जोडता आले. आम्हाला एकंदरीत अधिक उत्साही आणि कमी ताण जाणवतो. कार्यालयीन व कौटुंबिक तणाव कमी झाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
लवचीक रचनेमुळे कार्यक्षमतेत सुधारणा…
जर्मनीत राबवण्यात आलेल्या प्रयोगिक चाचणीच्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे लवचीकता. कंपन्या त्यांच्या कार्यरत गरजांनुसार चार दिवसांचे मॉडेल तयार करू शकल्या. काहींनी फिरत्या दिवसांची सुट्टी दिली, तर काहींनी ४.५ दिवसांचा आठवडा केला. काहींनी चाचणी विशिष्ट विभागांपुरती मर्यादित केली.
या अनुकूलनीय दृष्टिकोनाला जर्मन नियोक्ता संघटनेने पाठिंबा दिला, ज्याने नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांमधील सहयोगी वाटाघाटींना प्रोत्साहन दिले. प्रयोग समायोजित करण्याच्या स्वातंत्र्यामुळे कर्मचारी-नियोक्ते यांच्यातील वाद कमी होण्यास मदत झाली. सतत उत्पादनावर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये अवलंब अधिक व्यावहारिक झाले, असे नियोक्ता संघटनेने सांगितले.
सर्व कंपन्या अनुकूल?
चाचणीवरील सर्व प्रतिक्रिया सकारात्मक नव्हत्या. काही कंपन्यांनी आर्थिक दबावामुळे पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आणि काही तज्ज्ञांनी हा प्रयोग सार्वत्रिकपणे लागू करण्याविरुद्ध इशारा दिला. मुन्स्टर विद्यापीठातील कामगार बाजार संशोधक ज्युलिया बॅकमन म्हणाल्या की, हा प्रयोग काही कंपन्यांना अनुकूल असू शकतो, परंतु जर्मनीची व्यापक अर्थव्यवस्था कदाचित देशव्यापी बदलासाठी तयार नसेल. जर्मनीतील सर्व कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा हवा आहे, असे आपण म्हणू शकत नाही. तरीही, चाचणीचे एकूण यश स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील समान निकालांचे प्रतिबिंबित करते. आजपर्यंत, जागतिक स्तरावर २१० हून अधिक कंपन्यांनी चार दिवसांच्या कार्यालयीन आठवडा प्रयोगाची चाचणी केली आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यापासून नोकरीचे समाधान अशा अनेक फायदेशीर बाबीही या चाचणीतून दिसून आल्या आहेत.
sandeep.nalawade@expressindia.com