ओडिशा येथे लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले, पहिल्यांदाच ओडिशात भाजपाचे सरकार स्थापन झाले आणि मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाने निवडणूक प्रचारात अनेक आश्वासने दिली होती. आता सरकार स्थापन होताच भाजपा एकापाठोपाठ एक निर्णय घेताना दिसत आहे. मात्र, यात भगवान जगन्नाथाला समर्पित असणार्‍या पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याला भाजपा सरकारने प्राधान्य दिले. यामागील नेमके कारण काय? हे दरवाजे बंद का होते? त्यांचे महत्त्व काय? याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (१३ जून) पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. “भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने भाजपाने ओडिशात सरकार स्थापन केले. आमच्या पक्षाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, आम्ही आमच्या मंत्रिमंडळात मंजूर केलेला पहिला प्रस्ताव मंदिराचे चारही प्रवेशद्वार उघडण्याचा होता,” असे माझी यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा : कुवेतमधील आग दुर्घटनेचे कारण काय? मोदी सरकार पीडित भारतीय कुटुंबियांची कशी मदत करत आहे?

नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल सरकारने १२ व्या शतकातील या मंदिराचे चारपैकी तीन प्रवेशद्वार बंद ठेवले होते. चार वर्षांनंतर हे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. पुरीचे जगन्नाथ मंदिर, राज्यासह संपूर्ण देशातील सर्वात मान्यताप्राप्त हिंदू देवस्थानांपैकी एक आहे. हे देवस्थान भगवान जगन्नाथांना समर्पित आहे. भगवान जगन्नाथाला विष्णूचा अवतार मानले जाते. पुरीच्या या मंदिरात भगवान जगन्नाथासह त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्याही मूर्ती आहेत. पुरीचे जगन्नाथ मंदिर हिंदू धर्मातील चारधामांपैकी एक आहे, त्यामुळे येथे दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक दर्शनासाठी येतात.

चार दरवाजांचे महत्त्व

जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे त्याच्या सीमाभिंतीच्या मध्यभागी आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चार दिशांकडे हे दरवाजे आहेत. या दरवाज्यांना वेगवेगळ्या प्राण्यांची नावे देण्यात आली आहेत. मुख्य पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराला सिंहद्वार म्हणतात, ज्यात सिंहांची दोन दगडी शिल्पे आहेत. प्रचलित मान्यतेनुसार, जे या दरवाजातून प्रवेश करतात त्यांना मोक्ष (जन्म-पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती) प्राप्त होते.

उत्तरेकडील द्वाराला हस्तीद्वार, दक्षिणेकडील दरवाज्याला अश्वद्वार आणि पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला व्याघ्रद्वार म्हणून ओळखले जाते. प्रचलित मान्यतेनुसार, अश्वद्वारातून प्रवेश केल्याने काम (वासना) कमी होते. अश्वद्वाराला विजयाचे प्रतीकही मानले जाते. व्याघ्रद्वारातून प्रवेश केल्याने धर्माचे पालन करावे ही जाणीव होते. विशेषतः भक्त आणि संतगण या दारातून प्रवेश करतात आणि हस्तीद्वारातून प्रवेश केल्याने संपत्ती प्राप्त होते. हत्ती हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते.

मंदिरातील दरवाजे बंद का होते?

करोना काळात लॉकडाउन सुरू झाल्यानंतर जगन्नाथ मंदिर २५ मार्च २०२० रोजी भाविकांसाठी बंद करण्यात आले. नऊ महिन्यांनंतर म्हणजेच २३ डिसेंबर रोजी मंदिर उघडण्यात आले. परंतु, मंदिरात प्रवेश करण्यासाठी केवळ मुख्य प्रवेशद्वारच उघडण्यात आले होते. पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ‘श्रीमंदिर परिक्रमा’ प्रकल्पामुळे हे दरवाजे बंद ठेवण्यात आले असल्याचे कारण पुढे केले. श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे या वर्षाच्या सुरुवातीला उद्घाटन करण्यात आले. ८०० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मंदिराभोवती ७५ मीटर लांबीचा हेरिटेज कॉरिडॉर विकसित करण्यात आला आहे. भक्तांसाठी सुधारित सुविधा प्रदान करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. परंतु, कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतरही तीन दरवाजे बंदच ठेवण्यात आले, ज्यामुळे मुख्य द्वार असलेल्या सिंहद्वारावर मोठ्या गर्दी होऊ लागली आणि अन्य तीन दरवाजे उघडण्याची मागणी होऊ लागली.

सर्व दरवाजे उघडण्याचे भाजपाचे आश्वासन

२४ वर्षांच्या प्रदीर्घ सत्ताधारी बीजेडीला धक्का देत भाजपाने पहिल्यांदाच ओडिशामध्ये सरकार स्थापन केले. भाजपा काही काळापासून चारही दरवाजे पुन्हा उघडण्याची मागणी करत होता. त्यांनी ओडिशातील प्रचार सभांमध्येही हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. बीजेडी सरकार मंदिरातील देवता आणि त्यांचे भक्त यांच्यातील अडथळा होत असल्याचा आरोप भाजपाने केला आणि दरवाजे बंद ठेवण्याचा संबंध ओडिया अस्मितेशी (ओडिया अभिमान) जोडला.

हेही वाचा : सरकारचा मोठा निर्णय; विशिष्ट सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर घातली बंदी, कारण काय?

तामिळनाडूत जन्मलेले बीजेडीतील माजी आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन यांच्या वाढत्या प्रभावावर भाजपा बीजेडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना हा मुद्दाही पुढे आला. निवडणुका जवळ आल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभांमध्ये वारंवार मंदिर दरवाज्यांचा उल्लेख केला आणि सांगितले की, भाजपा सत्तेत येताच काही तासांत चारही प्रवेशद्वार उघडेल. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातही या मुद्दयाचा समावेश केला होता, त्यामुळेच भाजपाने सरकार स्थापन होताच पुरी जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याला प्राधान्य दिले.