२०२४ या चालू वर्षामध्ये भारत, इराण, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स या देशांतील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून आता काही दिवसांमध्येच अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे निकाल फारच धक्कादायक मानले जात आहेत. तिथे उजव्या आणि अति-उजव्या विचारसरणीच्या पक्षांचे सरकार सत्तेवर येईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात निकाल मात्र उलट लागले. अति-उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली (RN) पक्षाला तिसऱ्या स्थानी ढकलत न्यू पॉप्युलर फ्रंट (NFP) या डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या आघाडीने मुसंडी मारली. मात्र, आता यामुळे फ्रान्समध्ये द्वेषजनक वक्तव्यांमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?

निवडणुकीचा प्रचार आणि द्वेषजनक वक्तव्ये

फ्रान्सच्या या निवडणुकीमध्ये प्रचार करताना अनेक द्वेषजनक वक्तव्ये पहायला मिळाली. तसेच ज्यूविरोध आणि वंशभेदाच्या घटनाही घडलेल्या दिसून आल्या. नॅशनल रॅली हा अति-उजव्या विचारसरणीचा पक्ष स्थलांतरविरोधी मानला जातो. या निवडणुकीतही स्थलांतरितांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. तसेच हा पक्ष मुस्लीम विरोधी राजकारणासाठीही ओळखला जातो. या पक्षाने इस्लाम धर्म आणि संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाविरोधात प्रचारही केला आहे. त्यांनी वारंवार मुस्लीम महिलांच्या हिजाब आणि बुरख्यावरून टीका केली आहे; तसेच इस्लामिक अतिरेकावरही तोंडसुख घेतले आहे. या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्येही या मुद्द्यांवरून आश्वासने दिली होती. त्यांनी ‘फ्रेंच संस्कृतीचे रक्षण’ या मुद्द्याखाली इस्लामिक विचारसरणीला लक्ष्य करणारे कायदे लागू करण्याचे वचन दिले होते. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये इस्लामिक विचारसरणी आधुनिक काळातील मोठा धोका असल्याचेही म्हटले होते. गेल्या काही वर्षांपासून नॅशनल रॅली पक्षाला मिळणारा पाठिंबा उत्तरोत्तर वाढत गेला आहे. या निवडणुकीमध्ये तर हा पक्ष सत्तेमध्ये येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या पक्षाने आपल्या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर द्वेषजनक आणि असहिष्णू वक्तव्यांचा भडिमार केला होता, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. सिव्हिल सोसायटी ग्रुप एसओएस रेसिस्मेचे प्रमुख डॉमिनिक सोपो यांनी म्हटले की, “नॅशनल रॅली पक्षाला फ्रेंच नागरिकांना असा संदेश द्यायचा आहे की, स्थलांतरितांवर आणि त्यांच्या मुलांवर कारवाई केली तर यातून फ्रेंच लोकांचेच भले होईल. मग ही कारवाई प्रतिकात्मक अथवा कायदेशीरही असू शकते.” या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा प्रचार सुरू असताना नॅशनल रॅली पक्षाचे दोन कार्यकर्ते एका कृष्णवर्णीय महिलेला शाब्दिक हल्ला करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे राजकारण अधिकच तापले होते.

दुसऱ्या बाजूला फ्रान्समधील अति-डाव्या विचारसरणीच्या फ्रान्स अनबोव्ड (France Unbowed) या पक्षाने इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. या पक्षाने इस्रायलच्या हमासविरुद्धच्या युद्धावर वारंवार टीका केली आहे. इस्रायल पॅलेस्टिनी नागरिकांबरोबर नरसंहार करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे फ्रान्समध्ये थेट राजकीय फूट पडली आहे. फ्रान्समध्ये ज्यू लोकांची संख्या जवळपास पाच लाख आहे. डाव्या विचासरणीच्या पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे ज्यू लोकांमध्ये नाराजीची भावना दिसून आली, यावरून राजकारणही तापले. उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी या मुद्द्याचा फायदा घेतला आणि हा पक्ष ज्यूविरोधी असल्याचा प्रचार चालवला. अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर फ्रान्स अनबोव्ड पक्षाने या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. या आरोपांना न जुमानता, फ्रान्स अनबोव्ड पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्यूविरोधी द्वेषाला स्थान दिले नाही. मात्र, हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाही. यावरून वारंवार द्वेषजनक वक्तव्ये आणि हिंसा घडताना दिसते. यापुढेही हे मुद्दे सतत चर्चेत येतील, असे चित्र आहे.

हेही वाचा : कोण आहेत शिवानी राजा ज्यांनी ब्रिटनमध्ये भगवदगीतेला स्मरून घेतली खासदारकीची शपथ?

फ्रान्समध्ये द्वेषजनक वक्तव्यांमध्ये वाढ

फ्रान्समध्ये वर्णद्वेषी आणि ज्यूविरोधी कृत्यांमध्ये वाढ झाली असल्याचे निरीक्षण मानवाधिकार समितीने नोंदवले आहे. २०२३ मध्ये वर्णद्वेषाच्या घटनांमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे. २०२२ च्या तुलनेत ज्यूविरोधी कृत्यांमध्ये २८४ टक्के वाढ झाली आहे. ही अधिकृत आकडेवारी असली तरीही कदाचित वास्तवात हे प्रमाण याहून अधिक असू शकते. कारण बरेचसे पीडित आपल्यावरील अत्याचाराच्या तक्रारी करणे टाळताना दिसतात. या निवडणुकीमध्ये नॅशनल रॅली पक्ष सत्तेत येईल, असे वातावरण असतानाही हा पक्ष तिसऱ्या स्थानी ढकलला गेला आहे. त्यामुळे या पक्षाच्या समर्थकांमध्ये नक्कीच नाराजीची भावना आहे. या नाराजीच्या भावनेतूनच मुस्लीमविरोधी भय वाढीस लागू शकते आणि त्यातून द्वेषजनक वक्तव्ये आणि कृतीही वाढीस लागू शकतात. निवडणुकीच्या पराभवाचा वचपा या माध्यमातून काढण्याचा इतिहासही फ्रान्सला नवा नाही. यामुळे देशातील स्थलांतरित आणि अल्पसंख्यांकांची असुरक्षितता वाढीस लागू शकते. समाजमाध्यमांवर याचे प्रतिबिंब सातत्याने उमटताना दिसते. अति-उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ल पेन यांना या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांनी निकालावर समाधान व्यक्त केले असून आपल्याला आजही मोठ्या प्रमाणावर समर्थन असल्याचे म्हटले आहे. फ्रान्स अनबोव्ड पक्ष आणि न्यू पॉप्युलर फ्रंटला वारंवार ज्यूविरोधी असल्याच्या आरोपांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे डाव्यांच्या या सत्ताकाळात अनेक ज्यूंना असुरक्षितही वाटू शकते. कारण अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर डाव्या आघाडीची मते ठाम आहेत. विशेषतः इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरील त्यांची भूमिका वादग्रस्त आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये सतत एक तणाव जाणवत राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. अति-उजवे आणि अति-डावे यांच्यातील ही धुसफूस कायम सुरू राहील आणि त्यातून द्वेषजनक वक्तव्ये होण्याची शक्यता अधिक आहे.