फ्रान्समध्ये एका अल्पवयीन मुलाला वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी थेट गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर फ्रान्समध्ये सर्वत्र हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपासून येथे अनेक ठिकाणी जाळपोळ, लुटमारीचे प्रकार समोर येत आहेत. हा हिंसाचार थांबवण्यासाठी फ्रान्स पोलिसांनी आतापर्यंत हजारो तरुणांना ताब्यात घेतले आहे. सध्या येथे हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, फ्रान्समधील दंगलींचा हा वणवा थेट स्वित्झर्लंडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. स्वित्झर्लंडमध्येही अनेक तरुणांनी वेगवेगळी कार्यालये, तसेच दुकानांना लक्ष्य केले. तरुणांनी दरवाजे, खिडक्यांची तोडफोड केली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये नेमके काय घडत आहे? हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी झालेले ही तरुण आणि अल्पवयीन मुलं कोण आहेत? स्वित्झर्लंड सरकारने यावर काय प्रतिक्रिया दिली आहे? हे जाणून घेऊ या ….
फ्रान्सच्या हिंसाचाराचे लोण स्वित्झर्लंडमध्ये
स्वित्झर्लंडमधील लोजान या शहरात हिंसाचाराची घटना घडली. फ्रान्समधील घटनांचे पडसाद या शहरातही उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार- या हिंसाचारात सहभागी असलेली बहुतांश मुलं ही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे.
फ्रान्समधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर
मिळालेल्या माहितीनुसार- फ्रान्सधील अस्थिरता स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचली असली तरी हा हिंसाचार सध्या तरी लोजान या शहरापर्यंतच मर्यादित आहे. विशेष म्हणजे या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे. लोजान वगळता स्वित्झर्लंडच्या अन्य शहरांत अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना अद्याप घडलेल्या नाहीत. येथे रविवार (२ जुलै) व सोमवार (३ जुलै) या दोन दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. फ्रान्समध्येही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. येथे नव्याने फक्त ४९ लोकांना अटक करण्यात आली आहे. याआधी शनिवारी (१ जुलै) एकूण ७१९ जणांना ताब्यात घेण्यात आले होते, तर शुक्रवारी (३० जून) १३०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मृत्यू झालेल्या मुलाच्या आजीने केले शांततेचे आवाहन
फ्रान्समधील हिंसाचार आणि अस्थिरता यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तेथील नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी ते सोमवारी (३ जुलै) संसदेतील नेत्यांची भेट घेणार होते. तसेच ते फ्रान्समधील शहरांच्या महापौरांशी चर्चा करणार होते. दरम्यान, फ्रान्समध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलिसाने ज्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला गोळ्या घालून ठार केले होते, त्या मुलाच्या आजीने तेथील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. या मुलाच्या आजीने शांततेचे आवाहन केल्यानंतर फ्रान्समधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असे फ्रान्सच्या प्रशासनाने सांगितले आहे.
स्वित्झर्लंडमध्ये हिंसाचाराच्या घटना का घडल्या?
१ जुलै रोजी स्वित्झर्लंडच्या लोजान शहरात साधारण १०० तरुण जमा झाले होते. त्यांनी वेगवेगळ्या दुकानांवर दगडफेक केली. काही ठिकणी पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. हे कृत्य करणारी मुले फ्रान्समधील हिंसाचाराने प्रेरित झाली होती, असा दावा लोजान पोलिसांनी केला आहे. तसेच या मुलांनी अनेक दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. “आम्ही या तरुणांना पाहिले आहे. ते फ्रान्समधील घटनांनी प्रेरित होते, असे आम्हाला वाटते,” अशी प्रतिक्रिया लोजान पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
फ्रान्समधील हिंसाचारास सोशल मीडिया जबाबदार?
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार- सोशल मीडियाच्या मदतीने लोजान या शहरात तरुणांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ही अल्पवयीन मुले एकत्र आली होती. याआधी मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील हिंसाचारास सोशल मीडियाला जबाबदार धरले आहे. स्वित्झर्लंड प्रशासनानेही सोशल मीडियावर मॅक्रॉन यांच्यासारखाच आरोप केला आहे.
लोजानमध्ये दंगल घडवणारे कोण आहेत?
लोजान शहरात हिंसाचार घडवणाऱ्यांमध्ये बहुतांश आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तीन मुली आणि तीन मुलांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेली ही सर्व मुले १५ ते १७ वर्षांदरम्यानची आहेत आणि ती पोर्तुगीज, सोमाली, बोस्नियन, स्विस, जॉर्जियन व सर्बियन आहेत. त्यात २४ वर्षांच्या स्वित्झर्लंडच्या एका माणसालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- अटक करण्यात आलेली, तसेच हिंसाचार घडवणारी ही अल्पवयीन मुले आक्रमक होती. या मुलांनी दुकानांवर पेट्रोल बॉम्बदेखील फेकले. या हिंसाचारात कोणत्याही पोलिसाला इजा झालेली नाही.