Freedom at Midnight streaming on Sony LIV: लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लापिएर लिखित ऐतिहासिक पुस्तक फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट यावर आधारित वेब सिरीजचा प्रीमियर १५ नोव्हेंबर रोजी SonyLIV वर प्रदर्शित करण्यात आला. निखील अडवाणी दिग्दर्शित ही मालिका इतिहासाचा एक अनभिज्ञ पैलू उलगडण्याचा प्रयत्न करते. युट्यूबवर ट्रेलर रिलीज होताच शेकडो प्रेक्षकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. इतकच नाही तर सोशल मीडियावर या सिरीजविषयी मतं व्यक्त करणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी या पुस्तकाला भारताच्या स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा अंतिम वृत्तान्त मानले आणि मालिकेविषयी उत्सुकता व्यक्त केली. १९७५ साली कॉलिन्स आणि लापिएर यांनी हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर ते वादाच्या केंद्रस्थानी आले. काहींनी या पुस्तकाला भारताच्या स्वातंत्र्य व फाळणीचा अत्यंत उत्कंठावर्धक आणि तपशीलवार वृत्तान्त मानले, तर इतरांनी यावर सनसनाटी आणि पक्षपाती असल्याचा आरोप केला. वादविवाद इतका वाढला की, पुस्तकातील काही गोष्टी चुकीच्या असल्याचे आणि नैतिकदृष्ट्या इतिहासाचे चुकीचे प्रतिनिधित्त्व केल्याचा आरोपही झाला. सुरुवातीच्या काळात उमटलेल्या या प्रतिक्रियांमुळे फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट विषयी कुतूहल निर्माण झाले आणि या पुस्तकाने भारताच्या स्वातंत्र्याची खरी कहाणी नेमकी काय आहे, हा विचार करण्यास प्रवृत्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
गांधीजी (फोटो: विकिपीडिया)

पुस्तकात नेमकं काय आहे?

१ ऑक्टोबर १९७५ रोजी प्रकाशित झालेले फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक घटनांवर प्रकाश टाकते. स्वातंत्र्य मिळाले ते वर्ष म्हणजेच १९४७ आणि ब्रिटिश भारताच्या फाळणीनंतरच्या क्षणांवर या पुस्तकात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कॉलिन्स आणि लापिएर यांनी ब्रिटिश साम्राज्यापासून भारत आणि पाकिस्तान या नव्या राष्ट्रांकडे झालेल्या सत्तेच्या नाट्यमय हस्तांतरणाचा सखोल आढावा घेतला आहे. पुस्तकाचा मुख्य गाभा १४-१५ ऑगस्ट १९४७ च्या ऐतिहासिक मध्यरात्रीचा क्षण आहे. त्या क्षणी भारताने आपला वसाहती भूतकाळ मागे सोडला आणि युनियन जॅक खाली उतरवला गेला. हा ऐतिहासिक क्षण जगभरातील एक पंचमांश लोकांनी साजरा केला. परंतु या उत्साहाच्या पलीकडे ४० कोटी लोकांसाठी ते एक काळं वास्तव होतं. फाळणीमुळे उद्भवलेला हिंसाचार, अराजकता आणि मोठ्या प्रमाणावर झालेले विस्थापन यांनी या ऐतिहासिक क्षणावर काजळी धरली. पुस्तकात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना या प्रमुख व्यक्तिमत्त्वांवर भर देण्यात आला आहे, ज्यांच्या निर्णयांनी आणि कृतींनी या खडतर कालखंडाला आकार दिला. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी सत्तेच्या हस्तांतरणात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांच्या निर्णयांमुळे नव्याने निर्माण झालेल्या या देशावर दीर्घकालीन वेदनादायक परिणाम झाले.

अधिक वाचा: Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य? 

मध्यरात्रीच्या स्वातंत्र्याचा वादग्रस्त वारसा

फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्य आणि फाळणीसंदर्भातील प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि घटनांचे चित्रण ज्या पद्धतीने केले गेले आहे त्यासाठी त्यांना टीकेचा सामना करावा लागला. वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे लेखकांनी लॉर्ड माउंटबॅटन यांच्याबद्दल दाखवलेला अतिआदर. त्यांनी हा पूर्वग्रह उघडपणे मान्य केलेला असला, तरीही त्यांच्या माउंटबॅटनवरील श्रद्धेमुळे त्यांच्या कृती व निर्णयांचे चित्रण नक्कीच प्रभावित झाले आहे. जर्नल ऑफ एशियन स्टडीजमधील संशोधक लिओनार्ड ए. गॉर्डन यांनी लिहिले आहे की, “माणसांची स्मृती ही निवडक आणि स्वतःला अनुकूल असते. त्यामुळे माउंटबॅटन यांनी नेहमीच न्याय दिला आणि कधीही चूक केली नाही, असे मानले जाते.” याउलट, मोहम्मद अली जिना यांचे चित्रण एकांगी असल्याची टीका झाली. लेखकांनी वारंवार जिना यांना फाळणीचे एकमेव शिल्पकार म्हणून दोष दिला. फाळणीच्या व्यापक राजकीय संदर्भावर पुरेसा विचार न करता जिना यांना जबाबदार ठरवणे हा मोठा मुद्दा ठरला.

पंडित नेहरू आणि रवींद्रनाथ टागोर

गॉर्डन यांच्या मते, “जर जिना इतके हट्टी, आत्मकेंद्री आणि स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी ठाम नसते, तर या उपखंडाला ही भयंकर शोकांतिका भोगावी लागली नसती.” याशिवाय भारतीय राजे, संस्थानिक आणि नवाब यांच्या विषयी केलेल्या भाष्यामुळेही हे पुस्तक वादग्रस्त ठरले होते. अलवारचे महाराज आनंद मिळवण्यासाठी वाघाच्या भक्ष्यस्थानी मुलांना ठेवत असत असे वर्णन केले आहे. हैदराबादच्या निजामाच्या संपत्तीचा उल्लेख, पतियाळाच्या महाराजांच्या लैंगिक विकृतींबद्दल भाष्य असे अनेक संदर्भ या पुस्तकाला वादग्रस्त ठरवते. लिओनार्ड गॉर्डन म्हणतात, या गोष्टींचा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाशी काय संबंध? काहीच नाही… अशा गोष्टी केवळ पुस्तकं विकण्यासाठी असतात. त्याचप्रमाणे, नथुराम गोडसे यांनी ब्रह्मचर्य स्वीकारण्यापूर्वी त्यांचे राजकीय गुरु विनायक दामोदर सावरकरांबरोबर समलैंगिक संबंध ठेवले, असा दावा पुस्तकात करण्यात आला. या दाव्याने कथानकाला अनपेक्षित आणि अत्यंत वैयक्तिक वळण दिले. या विधानामुळे कटाचा भाग म्हणून दोषी ठरलेल्या आणि महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी जबाबदार ठरवलेल्या गोपाळ गोडसे यांनी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली.

अधिक वाचा: Discovering the Blue-Eyed Child: १७ हजार वर्षांपूर्वीच्या निळ्या डोळ्यांच्या बालकाचे अवशेष कोणती जनुकीय व इतर माहिती सांगतात? 

लेखकांना किरकोळ तपशीलांवर भर देऊन केलेल्या मांडणीबद्दल टीकेला सामोरे जावे लागले. उदाहरणार्थ, १९४७ साली काश्मीर भारतात विलिन करण्याचा शेवटचा प्रयत्न माउंटबॅटन यांनी केला होता. काश्मिरच्या महाराजांनी पोटदुखीचे कारण सांगून माउंटबॅटन यांच्याशी भेट नाकारली. लेखकांनी यावर भाष्य केले आहे, “भारत-पाकिस्तान संबंधांत पिढ्यान् पिढ्या कटुता निर्माण करणारी आणि जागतिक शांततेला धोका निर्माण करणारी समस्या त्या राजनैतिक पोटदुखीपासून उद्भवली.”

दिल्लीत जिना आणि गांधी भेट, नोव्हेंबर १९३९

त्याचप्रमाणे, १९४३ च्या बंगालच्या दुष्काळासाठी संपूर्ण दोष नागरी पुरवठा मंत्री एच. एस. सुहरावर्दी यांच्यावर टाकल्याबद्दलही त्यांच्यावर टीका झाली. एका गटाने असा युक्तिवाद केला की, सुहरावर्दी यांनी दुष्काळाशी लढण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. हा दुष्काळ अनेक गुंतागुंतीच्या घटकांमुळे निर्माण झाला होता, ज्यात लष्करासाठी युद्धकाळातील अन्नधान्याची मागणी, बर्मामधील तांदळाच्या पुरवठ्यात खंड, खराब पीक आणि बंगाल सरकारची किमती नियंत्रित करण्यात आलेली असमर्थता यांचा समावेश होता. कॉलीन्स आणि लापियेर यांनी महात्मा गांधींचे चित्रण मात्र संतुलित केले. त्यांनी गांधीजींच्या विरोधाभासांवर आणि त्यांच्या वक्तव्यांच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकत त्यांचे नेतृत्व कौतुकास्पद असल्याचे मान्य केले. मात्र, गॉर्डन यांचा युक्तिवाद होता की, गांधीजींचे चित्रण मात्र ‘पाश्चिमात्य वाचकांसाठी खूपच गुंतागुंतीचे आणि लैंगिकतेच्या विचारांनी ग्रस्त असे होते.’

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom at midnight india independence partition sony liv series svs