फ्रेंच अधिकाऱ्यांनी शनिवारी (२४ ऑगस्ट) पॅरिसनजीक असलेल्या विमानतळावरून टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक व सीईओ पावेल दुरोव्ह यांना अटक केली. एका स्रोताने रॉयटर्सला दिलेल्या महितीनुसार, टेलीग्रामवर कंटेट मॉडरेटरची कमतरता आणि पोलिसांच्या सहकार्याच्या अभावामुळे प्राथमिक पोलीस तपासाचा भाग म्हणून दुरोव्ह यांना अटक करण्यात आली आहे. मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलीग्रामवर गुन्हेगारी कृत्ये वाढली आहेत, असे पोलीस अधिकार्यांचे सांगणे आहे. ‘एक्स’वरील आपल्या एका पोस्टमध्ये टेलीग्रामच्या अधिकृत खात्याने म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म किंवा त्याचे मालक त्या प्लॅटफॉर्मच्या गैरवापरासाठी जबाबदार आहे, असा दावा करणे पूर्णपणे चुकीचे आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? कोण आहेत पावेल दुरोव्ह? दुबईतील महिलेचा त्यांच्या अटकेशी काय संबंध? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
पावेल दुरोव्ह कोण आहेत?
पावेल दुरोव्ह (वय ३९) यांचा जन्म सोविएत युनियनमध्ये झाला होता. त्यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी ‘VKontakte’ नावाच्या सोशल मीडिया ॲपची स्थपना केली. हे ॲप देशात लोकप्रिय झाले. ‘टाइम’ मॅगझिनच्या प्रोफाइलनुसार, दुरोव्ह यांना रशियन सरकारकडून युजर्स डेटा आणि सेन्सर सामग्री शेअर करण्यासाठी वाढत्या दबावाचा सामना करावा लागला. त्यानंतर ते रशिया सोडून गेले. “हे थोडे वेदनादायक होते. कारण- मी माझ्या पहिल्या कंपनीला स्वतःच्या बाळाप्रमाणे सांभाळले. पण, त्याच वेळी मला समजले की, मी यातून मुक्त होणेच योग्य असेल आणि मला कोणाकडूनही आता ऑर्डर घ्यायची नाही,” असे त्यांनी २०२४ च्या एका मुलाखतीत सांगितले होते.
हेही वाचा : बस अडवली, ओळख विचारली अन् २३ जणांना घातल्या गोळ्या; बलुच अतिरेक्यांनी का केले पंजाबी प्रवाशांना लक्ष्य?
१४ ऑगस्ट २०१३ रोजी पावेल आणि त्यांच्या भावाने टेलीग्रामची स्थापना केली. हे ॲप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला केंद्रस्थानी ठेवणारे आहे, असे सांगण्यात आले. निकोलाईने ॲपचे एन्क्रिप्शन डिझाइन केले. ॲपने मोठ्या गटांच्या निर्मितीलादेखील परवानगी दिली; ज्यामुळे सध्या ॲपमध्ये एका गटात दोन लाख सदस्य असू शकतात. टेलीग्राम वापरकर्त्यांच्या एकापेक्षा जास्त उपकरणांशीही जोडले जाऊ शकते. या वैशिष्ट्यांमुळे या ॲपने व्हॉट्सॲपसारख्या ॲप्सला टक्कर दिली. २०२४ च्या सुरुवातीला ९०० दशलक्ष वापरकर्त्यांसह टेलीग्राम ॲप जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ॲप्सपैकी एक ठरले आहे. या ॲपच्या यशामुळे दुरोव्ह यांचे नाव अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहे. त्यांच्याकडे फ्रान्स आणि यूएईचे नागरिकत्वदेखील आहे. आता त्यांच्याकडे रशियन नागरिकत्व आहे की नाही हे स्पष्ट नाही.
टेलीग्राम आणि दुरोव्ह विरुद्ध फ्रान्समध्ये सुरू असलेला खटला काय आहे?
फ्रेंच वृत्तपत्र ‘ले मोंडे’नुसार, ले बोर्जेट विमानतळावरून दुरोव्ह यांना अटक करण्यात आली. अमली पदार्थांची तस्करी, दहशतवादाचे समर्थन व सायबर स्टॉकिंगशी संबंधित असंख्य प्रकरणांमध्ये टेलीग्रामचा सहभाग असल्याच्या अशा अनेक आरोपांखाली ही अटक करण्यात आली आहे. टेलीग्रामच्या उच्च दर्जाच्या गोपनीयतेमुळे काही वापरकर्त्यांना औषधे विकण्यात, ऑनलाइन घोटाळ्यांद्वारे लोकांना फसवण्यात आणि ॲपद्वारे जगभरातील इतर बेकायदा क्रियाकलापांमध्ये गुंतण्यास मदत झाली आहे. कट्टरपंथीय आणि गुन्हेगार टेलीग्रामच्या एन्क्रिप्शनशी छेडछाड करून अवैध कामे करीत आहेत, असे अधिकार्यांचे सांगणे आहे.
टेलीग्रामच्या ‘एफएक्यू’ विभागाने ॲपवरील सामग्री (कंटेन्ट) काढून टाकण्याबाबत आपले धोरण स्पष्ट केले आहे. त्यात सांगण्यात आले आहे, “आम्हाला ॲपमधील बेकायदा सार्वजनिक सामग्री (उदा. स्टिकर सेट, ग्रुप किंवा चॅनेल) हटविण्यासाठी कायदेशीर विनंत्यांवर प्रक्रिया करावी लागेल.” परंतु, याला काही गोष्टी अपवाद आहेत. त्यांनी सांगितले, “हे भाषण स्वातंत्र्यावरील स्थानिक निर्बंधांना लागू होत नाही. उदाहरणार्थ- काही देशांत सरकारवर टीका करणे बेकायदा असल्यास, टेलीग्राम अशा राजकीय प्रेरित गोष्टींचा भाग होणार नाही. हे आमच्या संस्थापकांच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. आम्ही दहशतवादी (उदा. आयएसआयएस संबंधित) चॅनेल/ग्रुप यांना काढून टाकतो. मात्र, शांतपणे आपले मत व्यक्त करणाऱ्या कोणालाही आम्ही ब्लॉक करणार नाही.”
दुरोव्ह यांनीदेखील तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. ‘ले मोंडे’ने आपल्या वृत्तात दिले की, अल्पवयीनांवर होणार्या हिंसाचाराविरोधात लढणार्या ‘ऑफमिन’ या संस्थेने टेलीग्रामवर बाल पोर्नोग्राफीच्या प्रसाराची चौकशी सुरू केली होती. याच तपासात हळूहळू इतर गुन्ह्यांची भर पडली.
अटकेवर टीका
यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचे माजी कॉन्ट्रॅक्टर-टर्न-व्हिसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “दुरोव्ह यांची अटक म्हणजे भाषण आणि संघटनेच्या मूलभूत मानवी हक्कांवर हल्ला आहे. मला आश्चर्य वाटले आहे आणि मी अत्यंत दुःखी आहे की, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन खासगी संप्रेषणांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ओलीस ठेवण्याच्या पातळीवर उतरले आहेत.” एप्रिलच्या सुरुवातीला दुरोव्ह म्हणाले की, जगभरातील अनेक सरकारांनी ॲपवर नियंत्रण आणावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. मात्र दुरोव्ह यांनी आपल्या भूमिकेवर तटस्थ आहेत. त्यामुळे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले.
टेलीग्रामच्या प्रकरणात आणि मेटा (फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम आहे), एक्स व इतर टेक दिग्गजांच्या विरोधात झालेल्या सरकारी कारवाईशी साम्य आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ‘एक्स’ला जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवणाऱ्या खात्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. इलॉन मस्क यांनी हा आदेश पारदर्शक नसल्याबद्दल टीकाही केली होती. भारतातही खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सॲपशी संपर्क साधला आहे. व्हॉट्सॲपने काही बदल केले आहेत, जसे की फॉरवर्ड केलेले संदेश दर्शविणारे लेबल. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी संदेशांचे स्रोत उघड करण्यास नकार दिला आहे.
जुली वाविलोवा या महिलेचा दुरोव्ह यांच्या अटकेशी काय संबंध?
जुली वाविलोवा दुबईतील क्रिप्टो कोच आणि सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवरून असे दिसून येते की, दुरोव्ह आणि तिचे घनिष्ठ संबंध आहेत. त्या दोघांनाही कझाकस्तान, किरगिझस्तान व अझरबैजानसह विविध देशांमध्ये एकत्र पाहिले गेले आहेत. दुरोव्ह यांना अटक करण्यात आली तेव्हा जुली वाविलोवा त्यांच्याबरोबर होती. त्यामुळे अनेक अंदाज वर्तविले जात आहेत. अनेकांचा असा अंदाज आहे की, ती एक गुप्तहेर म्हणून दुरोव्हबरोबर फिरत होती. त्यामुळे अधिकार्यांना दुरोव्हपर्यंत पोहोचणे शक्य झाले, तर काहींचा असा अंदाज आहे की, तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने अधिकार्यांचे लक्ष वेधून घेतले; ज्यामुळे दुरोव्ह यांना अटक झाली.
तर दुसरी शक्यता अशी आहे की, वाविलोवाच्या सोशल मीडिया पोस्टने अनवधानाने त्यांचे स्थान आणि हालचाली उघड झाल्या. तिने कझाकस्तान, किरगिझस्तान आणि अझरबैजानमधील पोस्ट शेअर केल्या; जिथे दुरोव्हदेखील दिसले होते. या योगायोगामुळे तिच्या पोस्ट्सनी अधिकाऱ्यांना त्यांच्या ठावठिकाणाविषयी माहिती दिली असावी, असा अंदाज बांधला गेला आहे. अधिक खळबळजनक बाब म्हणजे वाविलोवा हनीट्रॅप किंवा मोसाद एजंट असू शकते, असेही अनेकांचे सांगणे आहे आणि दुरोव्ह यांना अडकवण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशनमध्ये जाणूनबुजून सहभागी झाल्याचा अनेकांचा अंदाज आहे. या दाव्यांना कोणत्याही पुराव्यांचा आधार नाही. त्यामुळे सध्या काय खरे, काय खोटे, हे समजणे कठीण आहे.