-अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्सचा तारांकित फुटबॉलपटू पॉल पोग्बा कायमच चर्चेत असतो. मात्र, सध्या तो एका विचित्र अडचणीत सापडला आहे. २९ वर्षीय मध्यरक्षक पोग्बाला काही दिवसांपासून एका गटाकडून (गँग) सातत्याने खंडणीची मागणी केली जात होती. परंतु धक्कादायक बाब म्हणजे या गटात आपलाच सख्खा थोरला भाऊ माथियासचा समावेश असल्याचे पोग्बाच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोग्बाने फ्रेंच पोलिसांना दिली. त्यानंतर माथियासने समाजमाध्यमाचा वापर करून पोग्बाला धमकी देण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा फ्रेंच पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

पॉल पोग्बा कोण आहे? 

पॉल पोग्बाची जागतिक फुटबॉलमधील सर्वोत्तम मध्यरक्षकांमध्ये (मिडफिल्डर) गणना केली जाते. तसेच तो चाहत्यांमध्ये सर्वांत लोकप्रिय असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. २०१०-११मध्ये इंग्लंडमधील बलाढ्य संघ मँचेस्टर युनायटेडकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केल्यानंतर तो इटलीमधील नामांकित संघ युव्हेंटसमध्ये दाखल झाला. या संघाकडून चार हंगाम खेळल्यानंतर त्याला पुन्हा मँचेस्टर युनायटेडने खरेदी केले. मग तो युनायटेडकडून सहा हंगाम खेळला. मात्र, गेल्या हंगामाअंती त्याचा करार संपुष्टात आला आणि त्याने यंदाच्या हंगामापूर्वी पुन्हा युव्हेंटसची वाट धरली. तसेच फ्रान्ससाठीही त्याने चांगली कामगिरी केली आहे. फ्रान्सने २०१८च्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि त्यांच्या या यशात पोग्बाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने क्रोएशियाविरुद्ध अंतिम सामन्यात गोलही केला होता. परंतु त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गेल्या काही हंगामांत त्याच्यावर बरीच टीका झाली आहे. 

पोग्बाबाबतचे प्रकरण कशा प्रकारे उघडकीस आले? 

पोग्बाचा थोरला भाऊ माथियाससुद्धा फुटबॉलपटू आहे. त्याने इंग्लंडमधील क्रीव्ह आणि क्रॉली यांसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, ३२ वर्षीय माथियास फारसा नावारूपाला आला नाही. त्याने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक चित्रफित प्रसिद्ध करत आपल्या धाकट्या भावाविषयी काही गोष्टी उघडकीस आणणार असल्याचे म्हटले. त्यामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले. ‘‘माझ्या भावाचे संघातील सहकारी आणि संयोजकांना काही गोष्टी कळणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याला इतके प्रेम आणि आदर मिळणे योग्य आहे का, हे लोकांना ठरवता येईल. मी जे खुलासे करणार आहे, त्याची बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे,’’ असे माथियास ‘इन्स्टाग्राम’वरील चित्रफितीमध्ये म्हणाला. 

पोग्बाच्या वकिलांनी काय प्रत्युत्तर दिले? 

माथियासने समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोग्बाच्या वकिलांनी एक पत्रक काढले. एका गटाकडून (गँग) पोग्बाला धमकी मिळाल्याची आणि त्याच्याकडून खंडणी मागितल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली. त्यामुळे माथियासने केलेल्या विधानाचे आश्चर्य वाटले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पोग्बाने सर्व घटनांची पोलिसांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. 

पोग्बाने पोलिसांना काय सांगितले? 

फ्रान्समधील माध्यमांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय संघाकडून दोन मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी फ्रान्समध्ये आल्यानंतर हातात बंदुका घेऊन काही जणांनी आपल्याला धमकवल्याचे पोग्बाने पोलिसांना सांगितले. यावेळी पॅरिसपासून जवळच मॅग्नी-सूर-मार्न येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी पोग्बा गेला होता. तेथे काही लहानपणीच्या मित्रांनी पोग्बाला एका जवळच्याच ठिकाणी नेऊन त्याला धमकावले. जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू झाल्यापासून आम्हाला तू आर्थिक मदत केलेली नाहीस, असे ते पोग्बाला म्हणाले. तसेच त्यांनी पोग्बाकडून एक कोटी, ३० लाख युरो आणि जेव्हापासून व्यावसायिक फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून प्रति वर्ष १० लाख युरोची मागणी केली. पोग्बाने ही रक्कम बँकमधून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला केवळ एक लाख युरो इतकीच रक्कम काढता आली. त्यामुळे या गटाने पोग्बाला धमकावणे सुरू ठेवले.

थोरल्या भावाच्या सहभागाबाबत कधी कळाले?

धमकी देणाऱ्या गटाला हवे तितके पैसे न मिळाल्याने त्यांनी एप्रिलमध्ये मँचेस्टर येथे पोग्बाला गाठण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जुलैमध्ये युव्हेंटसचा संघ सराव करत असलेल्या ट्युरिन येथील मैदानावरही पोग्बाने या लोकांना पाहिले. त्याच वेळी, या धमकी देणाऱ्या गटामध्ये आपला थोरला भाऊ माथियसचा समावेश असल्याचे पोग्बाच्या निदर्शनास आले. मग पोग्बाने याबाबतची माहिती युव्हेंटस संघाच्या वकिलांना दिली आणि त्यांनी हे प्रकरण पोलिसांमध्ये नेले. 

पोग्बावर काय आरोप करण्यात आले? 

पोग्बा गेल्या काही काळापासून दुखापतींशी झगडत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आपण आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेतल्याचे पोग्बाने पोलिसांना सांगितले. मात्र, माथियासने केलेल्या खुलाशानुसार, पोग्बा जादूटोणा करून आपल्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि स्वत:च्या संघातील सहकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होता. फ्रान्स संघातील सहकारी आणि तारांकित आघाडीपटू कायलियान एम्बापेला दुखापत व्हावी, यासाठी पोग्बाने जादूटोण्याचा वापर केला, असाही आरोप माथियसकडून करण्यात आला. परंतु हे सर्व आरोप पोग्बाने फेटाळून लावले आहेत. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French football player paul pogba witchcraft claims print exp scsg
Show comments