-दत्ता जाधव
संपूर्ण युरोपात बेडकांचे पाय चवीने खाल्ले जात असल्यामुळे बेडकांच्या पायांना मोठी मागणी आहे. युरोपीयन लोकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जगभरातून बेडकांच्या पायांची आयात केली जात आहे. परिणामी जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल ‘डेडली डिश’ या नावाने जर्मनीच्या ‘प्रो-वाइल्ड लाइफ’ आणि फ्रान्सच्या ‘रॉबिन डेस बोइस’ या दोन पर्यावरणवादी संस्थांनी संयुक्तपणे नुकताच प्रकाशित केला आहे.
केवळ युरोपियनच बेडकाचे पाय खातात?
लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडासह युरोपातही बेडूक किंवा बेडकाचे पाय पूर्वीपासूनच खाल्ले जातात. पण युरोपने २०११ ते २०२० या काळात ४०७०० टन बेडकांचे पाय फस्त केले आहेत, त्यासाठी सुमारे २०० कोटी बेडकांची शिकार करण्यात आली आहे. युरोपियन महासंघातील सदस्य राष्ट्रांपैकी बेल्जियम हा मुख्य आयातदार देश असून, तो एकूण तब्बल ७० टक्के आयात करतो. त्याखालोखाल फ्रान्स १६.७ टक्के तर नेदरलॅण्ड्स ६.४ टक्के करतो. त्याखालोखाल अन्य देशांचा नंबर लागतो. हे देश फक्त बेडकांचे पाय आयात करतात. स्वित्झर्लंड हा देश जिवंत बेडकाची आयात करतो. स्वित्झर्लंडच्या एकूण गरजेपैकी ७४ टक्के जिवंत बेडके पुरविण्याचे काम इंडोनेशिया करतो.
बेडकाचे पाय का खातात?
प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आणि अत्यंत चविष्ट असल्यामुळे बेडकांचे पाय खाल्ले जातात, असे अहवाल सांगतो. आफ्रिकेतील नायजेरिया, बेनिन, नामिबिया या देशांतील आफ्रिकन टायगर बेडकाला सर्वाधिक मागणी आहे. त्याखालोखाल आफ्रिकन बुल, ग्रास आणि आफ्रिकन नखे असलेल्या बेडकाच्या प्रजातींना मागणी आहे. या बेडकांना जागतिक बाजारातून मागणी असल्यामुळे त्यांची तस्करीही होते. औषधी गुणधर्मांमुळेही बेडकांची तस्करी होताना दिसते. आशियातील कंबोडिया, चीन, हाँगकाँग, लाओस, मलेशिया, व्हिएतनाम, भारत आणि इंडोनेशियातही बेडूक खाल्ले जाते. भारतात विविध प्रकारच्या बेडकांच्या प्रजाती आढळतात. सर्वाधिक तेरा प्रजाती नागालॅण्डमध्ये आढळतात, ज्यांचा स्थानिक पातळीवर खाद्य म्हणून उपयोग केला जातो. मणिपूर, सिक्कीममध्येही दुर्मीळ जातीची बेडके आढळतात. नेपाळमध्ये खाण्यासाठी बेडकांची शिकार करतात. चीनमध्ये क्वासिपा स्पिनोसा या जातीचे बेडूक स्वादिष्ट मानले जाते. प्रचंड शिकार झाल्यामुळे त्यांची संख्या ५९ टक्क्यांनी कमी झाली होती. त्यामुळे ही प्रजाती संरक्षित यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये बेडकांचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कुसरीनी आणि अल्फोर्ड या जातींची बेडके जंगलातून पकडून आणली जातात. इंडोनेशिया बेडकांचे पाय निर्यात करणारा जगातील सर्वांत मोठा देश आहे. करावांग, इंद्रमायू आणि बांटेन या पाय निर्यात करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत.
सर्वात मोठे निर्यातदार देश कोणते?
इंडोनेशिया हा युरोपला बेडकांचे पाय आणि जिवंत बेडके निर्यात करणारा सर्वांत मोठी निर्यातदार देश आहे. त्या खालोखाल अल्बानिया, तुर्कस्तान, व्हिएतनाम हे मोठे निर्यातदार आहेत. युरोपला होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी इंडोनेशिया सर्वाधिक ७४ टक्के, व्हिएतनाम २१ टक्के. तुर्कस्तान ४ टक्के आणि अल्बानिया १ टक्के बेडकांची निर्यात करतो. बेल्जियम २००९ पर्यंत युरोपला सर्वाधिक बेडकांची निर्यात करीत होता. त्यानंतर हे प्रमाण कमी झाले. त्यापूर्वी १९८० मध्ये बेडकांचे पाय निर्यात करणारा भारत सर्वांत मोठा निर्यातदार होता. १९८४ मध्ये भारतातून चार हजार टन बेडकांचे पाय निर्यात झाले होते. १९८५ मध्ये ही निर्यात अडीच हजार टनांवर आली होती. १९७० पासूनच पर्यावरणवादी या निर्यातीच्या विरोधात जागृती करीत होते. बेडकांची संख्या वेगाने घटल्याचा परिणाम शेती, अन्न साखळीसह एकूणच पर्यावरणावर होऊ लागल्यामुळे १९८७मध्ये भारतातून बेडकांच्या पायांची निर्यात करण्यावर बंदी आहे.
पर्यावरणावर काय परिणाम झाले?
बेडूक निसर्गाच्या अन्न साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीत आणि विशेषकरून भातशेतीत बेडकांचे महत्त्व मोठे आहे. लष्करी अळी, खोडकिडा, हिरवी अळीसह अन्य प्रकारच्या अळ्यांना बेडूक पतंग आणि अंडी अवस्थेतच खातो. बेडूक त्याच्या वजनाच्या इतके म्हणजे सरासरी तीन हजार कीटक एका आठवड्यात खातो. ज्या आशियायी देशातून बेडकांची निर्यात होते, ते देश तांदूळ उत्पादनातील आघाडीवरील देश आहे. हे देश जगाला तांदूळ पुरवितात. त्या-त्या देशात बेडकांची बेसुमार शिकार होत राहिल्यास भात उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन अन्न सुरक्षाच धोक्यात येऊ शकते. भात पिकांवर अळी, किडीचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होत नाही, त्यामुळे उत्पादन घटते. कीड आणि अळ्यांसाठी औषधे फवारली जात असल्यामुळे जमीन, पाणी आणि शेतीमालात कीडनाशकांचे अंश उतरतात. बेडके पावसाळा संपला की जमिनीत, शेतीच्या बांधात खोलवर जाऊन राहतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. बेडकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेडकांवर अवंलबून असणारे साप आणि अन्य जलचर, उभयचर प्राणीही अडचणीत आले आहेत. इंडोनेशियात १४ जातींची बेडके खाण्यासाठी वापरली जातात. या सर्व १४ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. इंडोनेशियाने २०१६ मध्ये सुमारे ८५ लाख बेडकांची निर्यात केली होती. ही निर्यात अशीच कायम राहिल्यामुळे बेडकांचे प्रमाण कमी झाले आहे २०२१मध्ये इंडोनेशियाने सुमारे ५७ लाख बेडकांची निर्यात केली आहे. अशीत अवस्था व्हिएतमान, तुर्कस्तान आणि अल्बानियाची झाली आहे.
बेसुमार बेडकांच्या कत्तलीवर उपाय काय?
जगभरात होत असलेल्या बेसुमार बेडकांच्या कत्तलीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे बेडकांच्या शेतीचा नवा पर्याय समोर आला आहे. जगभर बुल फ्रॉगची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. जागतिक अन्न संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०१०मध्ये बेडकांच्या शेतीतून जगभरात ७९,६०० टन बेकडांचे उत्पादन करण्यात आले होते. त्या मोठी भर पडून २०१८मध्ये १०७३०० टन बेडकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. बेडकांच्या शेतीचा हा कल असाच वाढत आहे. पण, अमेरिका वगळात अन्य युरोपियन देशात बेडकांच्या आयातीचे नियमन होत नाही. अमेरिकेत बेडकांच्या आयातीवर आणि कत्तलीवर कठोर निर्बंध आहेत. व्यावसायिक पातळीवर केलेल्या बेडकांच्या शेतीतून उत्पादित झालेल्या बेडकांचाच खाण्यासाठी उपयोग केला जातो. असे नियम संपूर्ण युरोपात करणे गरजेचे आहे. जे युरोपियन देश आपल्या देशातील पर्यावरण चांगले राहावे म्हणून देशात बेडकांच्या शिकारीवर बंदी घालतात, तेच देश जगभरातून बेसुमार बेडकांची आयात करतात, हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. बेडकांची वाढ वेगाने व्हावी, मांस जादा मिळावे, यासाठी संशोधन करून बेडकांच्या संकरित जाती निर्माण करणे शक्य आहे, तसे प्रयत्न झाले पाहिजेत. जागतिक पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी बेडकांच्या बेकायदा, बेसुमार व्यापारावर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे. कायदेशीर आणि कमीत कमी बेडकांच्या पायाची, प्रक्रिया केलेल्या हवाबंद पायाची, मांसाची आयात केली पाहिजे. जिवंत बेडकांच्या आतंरराष्ट्रीय व्यापारावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. बेडूक खाण्याचे पर्यावरणावर किती वाईट परिणाम होतात हे निदर्शनास आणून द्यावे. पर्यावरणाविषयी आपण किती जागृत असे दाखवून जगावर पर्यावरण संवर्धनासाठी दबाव आणणाऱ्या युरोपमध्ये बेडकांच्या पायाचा अन्न म्हणून वापर करू नये, या विषयीची जागृती होणे गरजेचे आहे.