अस्सलतेची हमी देणारं आणि स्थानिक उत्पादक, कलाकार यांचं हित जोपासत नक्कल टाळण्यात जीआय मानांकन महत्त्वाची भूमिका निभावतं. जीआय टॅगच्या माध्यमातून ग्राहकांनाही कोणत्या गोष्टी प्रमाणित आहेत ते कळतं. ओडिशाच्या सात वस्तूंनी जीआय मानांकन पटकावलं आहे. या सात गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाल मुंग्यांची चटणी ते एम्ब्रॉयडरी केलेली शाल अशा ओडिशाच्या सात खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी जीआय अर्थात जिऑग्राफिकल मानांकन पटकावलं आहे. जीआय मानांकनासह ओडिशाने आपली गुणवैशिष्ट्यं जपली आहेत.

कापगंडा शाल
डोंग्रिआ कोंढ समाजातील महिला विणकाम आणि भरतकाम करुन या शाली तयार करतात. ओडिशातल्या रायगाडा आणि कालाहंडी जिल्ह्यात नियामगिरी डोंगररांगात डोंग्रिआ कोढ समाजाची माणसं राहतात. लुप्त होत जाणारा असा हा आदिवासी समाज आहे. ही शाल त्यांच्या समाजातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचं प्रतीक आहे. पांढरट पिवळ्या रंगाच्या कपड्यावर लाल, पिवळा, हिरवे धागे विणून ही शाल तयार केली जाते. हिरवा रंग डोंगर, पर्वतांचा आहे. पिवळा रंग शांतता आणि आनंदाचा आहे. लाल रंग रक्ताचा रंग आहे. शालीवर रेषा आणि त्रिकोणांच्या आकृत्या तयार करण्यात येतात. आदिवासी समाजासाठी डोंगराचं महत्त्व यातून विषद करण्यात येतं. पुरुष आणि महिला दोघेही ही शाल वापरतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना तसंच नातेवाईकांना प्रेमाची भेट म्हणून ही शाल देतात.

लांजिआ सौरा चित्र
आदिवासी समाजातील कलेचा हा प्राचीन वारसा समजलं जातं. इडीतल असं त्याचं नाव आहे. सुंदर, सौंदर्यशास्त्र, परंपरेची मांडणी आणि प्रतिमाशास्त्र या साऱ्याची गुंफण या चित्रात दिसते. रायागाडा जिल्ह्यातल्या लांजिआ सौरा समाज या चित्रांची निर्मिती करतो. मातीच्या घरांच्या बाहेरच्या बाजूला ही चित्रं रेखाटण्यात आली आहेत. किरमिजी लालसर तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात ही चित्रं रंगवली जातात. लांजिआ सौरा समाज ज्या देवतेला मानतो त्यांच्याप्रति तसंच पूर्वजांप्रति आदर म्हणून ही चित्रं काढली जातात. या चित्रातून त्यांचं निसर्गाविषयीचं प्रेम दिसतं. झाडं, आदिवासी माणसं, पक्षी, प्राणी, चंद्र, सूर्य अशा गोष्टी या चित्रांमध्ये दिसतात.

कोरापूट काला जीरा राईस
काळ्या रंगाच्या तांदळाच्या या प्रजातीला तांदळाचा राजा असंही म्हटलं जातं. विलक्षण असा गंध, चव, पोत आणि पोषणमूल्य यासाठी हे तांदूळ ओळखले जातात. कोरापूट भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी १००० अधिक वर्ष तांदळाची ही प्रजात जोपासली आहे. हा तांदूळ जिऱ्यासारखा दिसत असल्याने त्याला काला जिरा म्हणूनही ओळखलं जातं. हा तांदूळ आहारात असेल तर रक्तातली हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि चयापचय प्रक्रियाही सुधारते. वाडवडिलांकडून मिळालेलं ज्ञान आणि पद्धती वापरुनच या शेतकऱ्यांनी या तांदळाची लागवड केली आहे. या तांदळापासून तयार झालेला भात खाल्ल्यामुळे मानसिक समाधान मिळतं अशा दंतकथा सांगितल्या जातात.

सिमलीपल काइ चटणी
ओडिशातल्या मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी लाल मुंग्यांपासून ही खास चटणी तयार करतात. आशियातील सगळ्यात मोठं जंगल असलेल्या मयुरभंजच्या जंगलात या मुंग्या आढळतात. ही चटणी औषधी आणि पोषणमूल्यांनी भरपूर अशी ओळखली जाते. प्रथिनं, कॅल्शियम, झिंक, जीवनसत्व ब १२, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचा ही चटणी उत्तम स्रोत आहे. लाल मुंग्या पाटा वरवंट्यावर वाटून ही चटणी तयार केली जाते. मयुरभंजमधील आदिवासी या मुंग्यांची चटणी विकून उदरनिर्वाह चालवतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी ही चटणी खाल्ली जाते.

नारायणगड कांटेमुंडी वांगं
देठाकडच्या भागावरील काटे हे नारायणगड कांटेमुंडी वांग्याची ओळख आहे. हिरव्या रंगाच्या या वांग्याची प्रजातीत भरपूर बिया असतात. या वांग्याची चव अप्रतिम असते आणि अतिशय कमी वेळात ते शिजतं. कीडेकीटक या वांग्याच्या झाडापासून दूर राहतात. कमीत कमी कीटकनाशकं वापरुन या वांग्याची लागवड करता येते. नारायणगड जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वांग्याचं उत्पादन होतं. पर हेक्टरी २०० क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात या वांग्याचं उत्पादन घेतलं जातं. ६० रुपये किलो दराने ही वांगी विकली जातात. डोंगराळ भागात ही वांगं होतात. स्थानिकांनी त्याचं बीज घेतलं आणि आपल्या घराजवळ त्याची लागवड करायला सुरुवात केली.

खजुरी गुडा
गजापती जिल्ह्यात खजुराच्या झाडापासून निघणारा नैसर्गिक गूळ आहे. दाट आणि घट्ट स्वरुपाचा हा गूळ तपकिरी रंगाचा असतो. त्याची चव वेगळी असते.

धेनकनाल मगजी
धेनकनाल मगजी हा गोड पदार्थ म्हशीच्या दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे. चव, रुप, आकार यामध्ये हा पदार्थ वेगळा असतो. त्यात प्रचंड पोषणमूल्यं असतात. चीजच्या अन्य पदार्थांच्या तुलनेत तो वेगळा असतो. ब्रिटिश काळात पशूसंवर्धन करुन लोक उदरनिर्वाह करत असत. म्हशीच्या दुधाचं घाऊक उत्पादन करणारा हा परिसर होता. दूध, दही आणि चीज उत्पादनात अग्रेसर भाग होता. मंदार सादंगी हा गोंदिया नजीकचा भाग या पदार्थाचं उगमस्थान आहे. चीजमधला ओलसरपणा काढून घेतला जातो आणि त्यानंतर तळला जातो. त्या मिश्रणाचे गोळे वळले जातात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From red ant chutney to black rice the 7 odisha products that have bagged gi tag