उत्तर प्रदेशमध्ये सत्ता पुन्हा मिळवायचीच, असा निर्धार करून रिंगणात उतरलेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मतांचे गणित जुळविण्याकरिता छोट्या-छोट्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे. जातीची समीकरणे साधण्याबरोबरच या मतांमध्ये फूट पडू नये या उद्देशानेच यादव यांनी ही खेळी केली आहे. छोट्या पक्षांना बरोबर घेऊन भाजपला आव्हान देण्याचा समाजवादी पक्षाचा प्रयत्न आहे.
आघाडी अथवा हातमिळवणी कोणाकोणा बरोबर ?
उत्तर प्रदेशात पक्षांच्या कामगिरीपेक्षा जातीवर आधारित मतदान मोठ्या प्रमाणावर होते. समाजवादी पक्ष म्हणजे यादव आणि मुस्लिम असे समीकरण तयार झालेले. यादव-मुस्लिम या समीकरणामुळे इतर समाज समाजवादी पक्षाला मतदान करीत नाहीत, असे पक्षाच्या नेत्यांचे निरीक्षण होते. यामुळेच जातींवर प्रभाव असलेल्या छोट्या पक्षांना यंदा अखिलेश यांनी बरोबर घेतले आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत यादव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी होती. परंतु या दोन्ही वेळेला समाजवादी पक्षाच्या पदरी अपयशच आले होते. २०१७ मध्ये समाजवादी पक्षाला सत्ता गमवावी लागली होती.
कोणते पक्ष समाजवादी पक्षाबरोबर आले आहेत ?
पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट मतदारांवर बऱ्यापैकी प्रभाव असलेले जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबर आघाडी झाली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी स्थापन केलेल्या या पक्षाबरोबर आघाडी केल्याने जाट समाजाची एकगठ्ठा मते मिळतील, असे पक्षाचे गणित आहे. दुर्बल घटकांमध्ये प्रभाव असलेल्या महान दल, नोईना समाजावर प्रभाव असलेला जनवादी पार्टी, कुर्मी समाजाचा पक्ष म्हणून मानल्या जाणाऱ्या अपना दलातील एक गट, पूर्व उत्तर प्रदेशातील मागासवर्ग व दुर्बल घटकांमध्ये बऱ्यापैकी स्थान असलेला सुहलदेव भारतीय समाज पार्टी आदी पक्षांनी समाजवादी पार्टीशी आघाडी केली आहे.
आघाडी करण्याचे टाळल्याबद्ल भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली टीका –
उत्तर प्रदेशातील दलित समाजावर बहुजन समाज पक्षाचा आतापर्यंत प्रभाव होता. पण दलित समाजाची मते ही केवळ बसपची मतपेढी राहिलेली नाही. हे २०१७ ची विधानसभा आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. दलित समाज व दुर्बल घटकांची मते भाजपकडे वळल्याचे निदर्शनास आले होते. चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीमुळे बसपला आव्हान उभे ठाकले,. यामुळेच बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आझाद यांचा जाहीरपणे पाणउतारा केला होता. आझाद यांनी समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु अखिलेश यादव यांनी आपल्याला भेट नाकारल्याचा आरोप आझाद यांनी केला. यादव यांना दलित मतदारांची अॅलर्जी असल्याचा आरोप चंद्रशेखर आझाद यांनी केला. आझाद यांच्याशी आघाडी केल्याने अन्य वर्ग नाराज होतील यातूनच अखिलेश यादव यांनी आझाद यांच्याबरोबर हातमिळवणी केली नसावी, असा अंदाज व्यक्त केला जातो.
जातीच्या आधारावर मतदान होते का ?
उत्तर प्रदेशात जातीच्या आधारावर मतदान होते हे अनेकदा अनुभवास आले. जातींवर प्रभाव असलेला नेता किंवा पक्षाच्या सांगण्यानुसार मते वळतात. अर्थात, ही प्रचलित मते वळविण्याची पद्धत यापुढे कायम राहीलच असे नाही.