इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे १९१४ पासून दर वर्षी होणारी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ ही विज्ञान परिषद जागतिक स्तरावर मान्यता पावली आहे. मात्र आता इंडियन सायन्स काँग्रेसचे भविष्यच अंधारात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ होत असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसवर ही वेळ कशी आली, याचा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन सायन्स काँग्रेस काय आहे?

देशातील सर्वांत मोठी विज्ञान परिषद म्हणून इंडियन सायन्स काँग्रेसची ओळख आहे. १९१४ पासून या परिषदेचे आयोजन करण्यात येते. देशभरातील वैज्ञानिकांना त्यांचे संशोधन मांडता यावे, विज्ञानाच्या क्षेत्रातील घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश त्यामागे असतो. इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेला केंद्र सरकारकडून दर वर्षी आर्थिक अनुदान दिले जाते. परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येते. देशभरातील वैज्ञानिक संस्थांसह देश-परदेशातील वैज्ञानिक, नोबेलप्राप्त शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विज्ञानशिक्षक, सर्वसामान्य नागरिक या विज्ञान संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होतात.

हेही वाचा – विश्लेषण : तलाठी परीक्षेतील ‘सामान्यीकरणा’चा वाद काय आहे? एकूण गुणांपेक्षा जास्तीचे गुण मिळतातच कसे?

इंडियन सायन्स काँग्रेसचे अनुदान बंद का झाले?

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सप्टेंबरमध्ये नोटीस प्रसिद्ध करून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करत इंडियन सायन्स काँग्रेसशी असलेले संबंध संपुष्टात आणण्याची कारणेही नमूद करण्यात आली. इंडियन सायन्स काँग्रेसचे काही पदाधिकारी कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा सरकार किंवा संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेची पूर्वपरवानगी न घेता एकतर्फी निर्णय घेतात. कोणत्याही पूर्वपरवानगीविना सायन्स काँग्रेस जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. त्या शिवाय आर्थिक अनियमिततेबाबतचे आरोप विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. त्यामुळे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या कार्यकारी सचिवांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय सरकारी तिजोरीतून खर्च करू नये. तसेच सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने इंडियन सायन्स काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमाची वैज्ञानिक समुदायातून समर्पकता संपुष्टात आली आहे. परिषदेच्या आयोजनात व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले.

इंडियन सायन्स काँग्रेसचे भविष्य अंधारात का?

जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये १०९ वी इंडियन सायन्स काँग्रेस होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ‘ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर सायन्स काँग्रेस होणार होती. मात्र लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये सायन्स काँग्रेस होणार नाही, नवीन स्थळ-दिनांक याबाबतचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनने संकेतस्थळावर दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान हा इंडियन सायन्स काँग्रेसचा आतापर्यंत महत्त्वाचा आर्थिक स्रोत होता. तो केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सायन्स काँग्रेसच्या आयोजनासाठी निधी उभा करण्यापासून आव्हाने निर्माण होणार आहेत. त्यामुळे सायन्स काँग्रेसचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – विश्लेषण : भाजपच्या आघाडीत अकाली दल, तेलुगू देसम? अजूनही मित्रपक्षांची गरज?

सायन्स काँग्रेसची जागा ‘आयआयएसएफ’ घेणार?

इंडियन सायन्स काँग्रेसचे अनुदान बंद करून केंद्र सरकार त्यातून बाजूला झाले आहे. मात्र केंद्र सरकारतर्फे विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने २०१५ पासून इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ) हा सायन्स काँग्रेसच्याच धर्तीवर स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा हा महोत्सव १७ ते २० जानेवारी या कालावधीत हरयाना येथील फरिदाबाद येथे होणार आहे. विज्ञान प्रदर्शन, युवा शास्त्रज्ञ परिषद, विविध कार्यशाळा अशा कार्यक्रमांचा महोत्सवात समावेश आहे. त्यामुळे विज्ञान क्षेत्रासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र पर्याय निर्माण केला आहे.

इंडियन सायन्स काँग्रेसच्या भविष्याबाबत शास्त्रज्ञ काय म्हणतात?

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू म्हणाले, की इंडियन सायन्स काँग्रेस हा अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक कार्यक्रम आहे. पूर्वी तो अतिशय अकादमिक पद्धतीने होत होता. मात्र गेल्या काही वर्षांत त्याला उत्सवाचे स्वरूप आले होते. या पद्धतीने हा कार्यक्रम होणे अयोग्य होते. सध्या या कार्यक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली, तरी येत्या काळात नव्या स्वरुपात हा कार्यक्रम होऊ शकेल.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Future of indian science congress in the dark why did the government subsidy stop print exp ssb
Show comments