Gaganyaan 2025: गगनयान ही भारताची मानवी सहभाग असलेली पहिलीच अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे- इस्रोद्वारे (ISRO) राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना (Gagannauts) स्वदेशी अंतराळयानाद्वारे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात येणार आहे. अशा प्रकारची पहिली अंतराळ मोहीम असल्याने भारतासाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या ४०० किमी कक्षेत तीन दिवस राहणार आहेत. या मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीचे ‘गगनयान’ (अंतराळयान) वापरण्यात येणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा मानवी सहभाग असलेला अवकाश प्रवास करणारा चौथा देश ठरणार आहे. अंतराळात मानवी अस्तित्व टिकवण्याची क्षमता विकसित करणे, भविष्यातील मोठ्या मानवयुक्त अंतराळ मोहिमांसाठी तंत्रज्ञान विकसित करणे, अंतराळ विज्ञान आणि जैववैज्ञानिक प्रयोगांसाठी नवीन संधी निर्माण करणे इत्यादी या मोहिमेची प्रमुख उद्दिष्ट आहेत. गगनयान मोहिमेच्या यशानंतर चंद्रयान-४, आदित्य एल-२ आणि भविष्यातील मानवी चंद्र व मंगळ मोहिमा शक्य होतील असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी मानवी अवकाश मोहीम गगनयानचा उद्देश स्वदेशी अंतराळयानाद्वारे भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याचा आहे. ही महत्त्वाची मोहीम भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातील मोठी झेप दर्शवते. ही मोहीम भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतीक असून भविष्यातील नवसंशोधन आणि प्रयोगांचा मार्ग मोकळा करून अंतराळाच्या गूढ रहस्यांवर प्रकाश टाकण्यास मदत करेल. किंबहुना यूएएस-धारवाडने विकसित केलेल्या २० फ्रूट फ्लाइज (फळमाशा) गगनयान २०२५ मोहिमेसाठी निवडल्या गेल्या असून त्यांनाही माणसाबरोबर अंतराळात पाठवले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या फळमाशा का महत्त्वाच्या आहेत? आणि त्यांना का पाठवण्यात येणार आहे? याचाच घेतलेला हा आढावा.

पण, फळमाशाच का?

इतर अनेक प्राणी, कीटक असताना फळमाशाच का? असा प्रश्न विचारला जात आहे. याचे कारण म्हणजे या सूक्ष्म जीवांचे मानवी जनुकांशी ७७% साम्य हे होय. त्यामुळे त्या वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाच्या ठरतात. गगनयान मोहिमेत त्यांचा सहभाग हा अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी केलेली तरतूद आहे. दीर्घकालीन अंतराळ प्रवासातील गंभीर आव्हानांपैकी एक म्हणजे अंतराळवीरांच्या हाडांचे होणारे नुकसान, मूत्रामधील आम्लता आणि निर्जलीकरण यांसारख्या कारणांमुळे मूत्रपिंडात खडे तयार होण्याचा धोका वाढलेला असतो. फळमाशांचा वापर करून अंतराळात मूत्रपिंडातील खडे कसे तयार होतात याचा अभ्यास केल्यामुळे वैज्ञानिकांना अंतराळवीरांच्या आरोग्य समस्यांवर नव्या शोधांचा मार्ग सापडू शकतो आणि जीव वाचवणाऱ्या उपाययोजना विकसित करता येतील. यूएएस-धारवाड आणि भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, तिरुवनंतपुरम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयोग राबवला जात आहे. भारतातील ७५ कृषी विज्ञान विद्यापीठांमधील कठोर स्पर्धेनंतर या प्रयोगाची निवड करण्यात आली. हा शोध भविष्यात पृथ्वीच्या कक्षेबाहेरील अंतराळ मोहिमांसाठी देखील मार्ग मोकळा करू शकतो.

मानवी जनुकांशी साम्य

यूएएस-धारवाडचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. किरण कुमार यांनी या प्रयोगाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “फळमाशा त्यांच्या मानवी जनुकांशी असलेल्या साम्यामुळे ते प्रयोगासाठीचा एक अद्भुत नमुनाच ठरतात. अंतराळ प्रवासादरम्यान या माशांमध्ये होणाऱ्या जैविक बदलांचे निरीक्षण करून आपण मानवी आरोग्याविषयी मौल्यवान माहिती मिळवू शकतो.” हा प्रयोग सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात (microgravity) मूत्रपिंडातील खडे कसे तयार होतात याचा अभ्यास करण्यावर विशेषतः केंद्रित आहे. अंतराळात हाडांमधील खनिजे कमी होणे, मूत्राच्या संरचनेत होणारे बदल आणि निर्जलीकरण यांसारख्या कारणांमुळे अंतराळवीरांना मूत्रपिंडात खडे होण्याचा धोका जास्त असतो.

आनुवंशिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी….

फळमाशांना अंतराळात पाठवून संशोधक मूत्रपिंडातील खडे तयार होण्यामागील प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच संभाव्य प्रतिबंधक उपाय शोधण्याचे उद्दिष्ट नजरोसमोर ठेवण्यात आले आहे. “या प्रयोगातून मिळणारी माहिती दीर्घकालीन अंतराळ मोहिमांदरम्यान अंतराळवीरांचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना विकसित करण्यास मदत करू शकते,” असे इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले. “याशिवाय, या संशोधनातून मिळालेली माहिती पृथ्वीवरील मानवांमध्ये मूत्रपिंडातील खडे तयार होण्याची प्रक्रिया आणि त्याच्या प्रतिबंधाबाबत व्यापक दृष्टिकोन प्रदान करू शकते.”

गगनयान मोहीम ही भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. ही मोहीम केवळ मानवी अंतराळ प्रवासाचा प्रारंभ नसून भविष्यातील संशोधन व नवसंशोधनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. फळमाशांच्या मदतीने अंतराळात मूत्रपिंडातील खडे तयार होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करून वैज्ञानिकांना केवळ अंतराळवीरांच्या आरोग्यावरच नव्हे, तर पृथ्वीवरील मूत्रपिंडविषयक विकारांवरही संशोधनासाठी नवी दारे खुली करणारी संधी असणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळ क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनात नव्या उंचीवर पोहोचेल आणि भविष्यातील चंद्र, मंगळ तसेच दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी सक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याचा मार्ग मोकळा होईल. गगनयान केवळ एक अंतराळ मोहीम नसून, भारताच्या आत्मनिर्भरतेचे आणि वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक ठरणार आहे.

Story img Loader