संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा (२२ सप्टेंबर) दिवस आहे. १९ सप्टेंबरला जेव्हा संपूर्ण देश श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी करत होता, तेव्हा देशातील सर्व खासदारांनी जुन्या संसदेला सोडून नव्या इमारतीमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे २०२३ रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन केले. त्यानंतर पहिल्यांदाच या नव्या इमारतीमधील सभागृहात संसदेचे कामकाज पार पडले. नव्या संसदेतील सभागृहात खासदारांना बसण्यासाठी, बोलण्यासाठी आणि कामकाज पाहण्यासाठी अद्ययावत अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संसदेच्या आवारातही अनेक कलाकृती आणि भारतीय संस्कृतीची साक्ष देणाऱ्या बाबी साकारण्यात आल्या आहेत.
नव्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी सहा दरवाजे आहेत. या दरवाजांना गज द्वार, अश्व द्वार, गरुड द्वार, मकर द्वार, शार्दुल द्वार आणि हंस द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. नावानुसार प्रत्येक दारावर त्या त्या प्राण्याचे किंवा पक्ष्याचे शिल्प उभारण्यात आले आहे. यापैकी काही प्राणी पौराणिक असून ते भारताच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. हे प्राणी आणि पक्षी या ठिकाणी द्वारपाल असल्याचे प्रतीत होते. नव्या संसदेत उभारण्यात आलेल्या या भव्य दरवाजांचे आणि त्यांच्या नावाचे महत्त्व समजून घेऊ ….
हे पहा >> Photos: नवी संसद..नवी लोकसभा..पाहा पहिल्यावहिल्या कामकाजाचे खास फोटो!
गज द्वार (Gaja Dwar)
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी सोमवारी (दि. १७ सप्टेंबर) नव्या संसदेच्या उत्तरेस असलेल्या गज द्वारावर ध्वज फडकवून या दरवाजाचे उदघाटन केले. गज म्हणजे हत्ती. या दरवाजावर दोन पांढऱ्या हत्तींचे शिल्प बसविण्यात आले आहेत. सरकारने आपल्या निवेदनात या दाराचे महत्त्व विशद करताना म्हटले की, हत्ती ज्ञान, संपत्ती, बुद्धी आणि स्मरणशक्ती यांचे प्रतिनिधित्व करते. तसेच लोकशाहीद्वारे निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या आकांक्षांना मूर्त रूप देण्याचे काम करते.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा बुध ग्रहाशी संबंधित आहे. ज्याचा अर्थ बुद्धिमत्तेचा स्त्रोत असा होतो. भारतीय वास्तुकलेतही हत्तीला महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्यामुळे समृद्धी आणि आनंद नांदतो, असेही म्हटले जाते.
अश्व द्वार (Ashva Dwar)
अश्व हे घोड्याचे संस्कृत नाव असून संसदेच्या दक्षिणेला असलेल्या दरवाज्याला अश्व द्वार नाव देण्यात आले आहे. तसेच येथे घोड्याचे शिल्प उभारले आहे. अश्वाचा उल्लेख वेद आणि रामायण यासारख्या धार्मिक ग्रंथातही आलेला आहे. अश्व हे सामर्थ्य, ताकद, संयम, धैर्य आणि वेग याचे प्रतीक मानले जाते. अश्वाच्या गुणाप्रमाणे शासनही न थांबता लोकहिताचे कार्य करत राहील, असा अर्थ यातून अभिप्रेत होत असल्याचे सांगितले जाते.
गरुड द्वार (Garuda Dwar)
संसदेच्या पूर्वेकडील दरवाज्याला गरुड द्वार नाव दिले आहे. या ठिकाणी गरुडाचे शिल्प उभे आहे. हिंदू शास्त्रानुसार, गरुडाला दैवाचा दर्जा देण्यात आला आहे. विष्णूचे वाहन म्हणूनही गरुडाचा उल्लेख होतो. पुराण, वेद आणि महाभारत अशा प्राचीन ग्रंथांमध्ये गरुडाचा उल्लेख आढळतो. पक्ष्यांचा राजा अशीही त्याची ओळख आहे. गरुड धर्म आणि शक्तीचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. जगातील अनेक देशांच्या राष्ट्रीय प्रतिकांवर गरुडाचे चिन्ह दिसून येते.
हे वाचा >> उत्साह, गोंधळ, सेल्फी घेण्याचा मोह; नव्या संसद भवनात खासदारांचा पहिला दिवस कसा होता?
संसदेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ असलेला गरुड पक्षी भारतातील लोकांच्या आकांक्षा दर्शवितो, असे फर्स्टपोस्ट संकेतस्थळावरील लेखात म्हटले आहे. पूर्व दिशेला सूर्योदय होतो, वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा आशा, विजय आणि यशाचे प्रतिनिधित्व करते, असे सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचाही उल्लेख फर्स्टपोस्टने केला आहे.
मकर द्वार (Makara Dwar)
जुन्या संसदभवनासमोरच नव्या संसदेचे मकर द्वार आहे. हिंदू पुराणातील कथांच्या आधारे मकर हे एक मिथक आहे. पुराणकथानुसार गंगा नदी आणि वरुण देवाचे मकर वाहन असल्याचे सांगितले जाते. मकर हा जलचल असल्याचे विविध कथांमधून कळते. काही कथांमध्ये याचा संबंध मगरशी जोडला गेला आहे. मकरचे शरीर अनेक ठिकाणी वेगवेगळया रुपांमध्ये पाहायला मिळते. शीर आणि धड वेगवेगळ्या प्राण्याचे असलेले मकर अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळतात, अशी माहिती भारत विश्वकोषमधून मिळते. पौराणिक संदर्भानुसार मकर हा समुद्री प्राणी आहे. राजवाडे, मंदिरांच्या गाभाऱ्याबाहेरच्या भिंतीवर त्याचे शिल्प कोरलेले आढळते.
देशातील विविध लोकसमुदायांच्या विविधतेतील एकतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘मकर’चे शिल्प मकर द्वारावर उभारण्यात आलेले आहे.
शार्दुल द्वार (Shardula Dwar)
संसदेतील पाचव्या प्रवेशद्वाराला शार्दुल द्वार नाव देण्यात आले आहे. हे नावही पौराणिक प्राण्याच्या नावावरून प्रेरित आहे. या प्राण्याचे धड सिंहाचे आहे, परंतु शीर घोडा, हत्ती किंवा पोपटाचे आहे. सर्व सजीव प्राण्यांमध्ये शार्दुला सर्वात शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. सरकारी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, नव्या संसदेच्या प्रवेशद्वारावर शार्दुलची उपस्थिती ही देशातील लोकांच्या शक्तीचे प्रतीक आहे.
आणखी वाचा >> संसद कर्मचाऱ्यांच्या गणवेशांवर कमळ; वाघ किंवा मोर का नाही? काँग्रेसचा आक्षेप!
हंस द्वार (Hamsa Dwar)
संसदेच्या ईशान्य दिशेला असलेल्या सहाव्या प्रवेशद्वाराला हंस द्वार असे नाव दिले गेले आहे, हे सार्वजनिक प्रवेशद्वार आहे. राजहंसावरून हंस असे नाव दिले आहे. ज्ञानाची देवता सरस्वतीचे वाहन अशी राजहंसाची ओळख आहे. लोकशाहीमध्ये विवेकबुद्धी आणि आत्म साक्षात्कार हे महत्त्वाचे गुण देशातील लोकांमध्ये असले पाहिजेत, या तत्त्वाची आठवण या नावातून प्रतीत करायची आहे.
वरील सहा प्रवेशद्वारांपैकी तीन ठिकाणांहून औपचारिक प्रवेश असणार आहे, तर इतर तीन प्रवेशद्वार हे विशेष अतिथी आणि विशेष कार्यक्रमांसाठीच वापरले जाणार आहेत.