केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पाअंतर्गत कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर आता गांधीसागर वन्यजीव अभयारण्य भारतातील चित्त्यांचा नवा अधिवास असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तयारी पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून पावसाळ्यानंतर चित्ते स्थानांतरित करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात त्यांना संसर्ग होण्याची शक्यतादेखील जास्त असते, त्यामुळे पावसाळ्यानंतरच चित्त्यांची तिसरी तुकडी भारतात आणण्यात येईल. चित्त्यांचे दुसरे अधिवास म्हणून गांधीसागर वन्यजीव अभयारण्याचीच निवड का करण्यात आली? चित्त्यांना अधिवासात आणण्यासाठी कोणती तयारी केली जात आहे? गांधीसागरमध्ये चित्त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? याविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्त्यांचे दुसरे अधिवास म्हणून गांधीसागर वन्यजीव अभयारण्याचीच निवड का?

गांधीसागर वन्यजीव अभयारण्य पश्चिम मध्य प्रदेशातील मंदसौर (१८७.१२ वर्ग किलोमीटर) आणि नीमच (१८१.५ वर्ग किलोमीटर) जिल्ह्यांमध्ये राजस्थानच्या सीमेवर ३६८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या अभयारण्याच्या मधून चंबळ नदी वाहते. १९६० मध्ये नदीवर बांधलेले गांधीसागर धरण अभयारण्याच्या क्षेत्रात आहे. हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे. या परिसरातील भूभाग खडकाळ आहे. हे अभयारण्य गांधीसागरच्या सवाना परिसंस्थेच्या मागे आहे. या परिसरात कोरडे पानझडी झाडे आणि झुडपांनी वेढलेला खुला गवताळ प्रदेश आहे. नदीखोर्‍यातील भाग मात्र सदाहरित आहे. मध्य प्रदेशचे वन्यजीव अधिकारी सांगतात की, गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी योग्य निवासस्थान आहे.

हा परिसर मासाई मारासारखा आहे. मासाई मारा केनियामधील एक राष्ट्रीय राखीव क्षेत्र आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : एनटीएने रद्द केले १,५६३ विद्यार्थ्यांचे वाढीव गुण; कारण काय? आता पुढे काय होणार?

“हा परिसर मासाई मारासारखा आहे. मासाई मारा केनियामधील एक राष्ट्रीय राखीव क्षेत्र आहे, (जे सवाना वाळवंट आणि सिंह, जिराफ, झेब्रा, पाणघोडे, हत्ती आणि अर्थातच चित्ता यांसह इतर वन्यजीवांसाठी ओळखले जाते). भारतात कुनो नंतर चित्त्यांसाठी गांधीसागरच सर्वोत्तम अधिवास आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. मुख्यतः अधिकार्‍यांना गांधीसागरमधील चित्त्यांच्या अधिवासाचा विस्तार सुमारे दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात करायचा आहे, पण ते राजस्थानच्या भैंसरोदगड अभयारण्य आणि मंदसौर व नीमचच्या प्रादेशिक विभागांमधील समन्वयावर अवलंबून असेल. “मुख्य क्षेत्राचा विस्तार केल्यास एकत्रित व्यवस्थापन योजना तयार करण्यासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागेल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चित्त्यांना गांधीसागरमध्ये आणण्यासाठी कोणती तयारी केली जात आहे?

चित्त्यांना या अधिवासात स्थानांतरित करण्यापूर्वी त्यांच्यासाठी हे अभयारण्य पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे. सध्या ६४ चौरस किलोमीटरचे क्षेत्र चित्त्यांसाठी विकसित करण्यात आले आहे, त्यासाठी १७.७२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. वन्यजीव अधिकारी सॉफ्ट रिलीझ एन्क्लोजर (बोमा) बांधत आहेत. या क्षेत्रात चित्त्यांसाठी एक रुग्णालयदेखील आबांधण्यात येत आहे. शिवाय, वन्यजीव अधिकारी सध्या अभयारण्यातील तृणभक्षी आणि भक्षक प्राण्यांच्या स्थितीचे सर्वसमावेशक मूल्यमापन करत आहेत. चित्त्यांना स्थानांतरीत करण्यासाठी अभयारण्य पुरेसे सुसज्ज आहे, याची खात्री करण्यासाठी अभयारण्याच्या एकूण तयारीचे निरीक्षण आणि मूल्यांकन करण्याचे काम चित्ता प्रकल्प सुकाणू समितीच्या अध्यक्षांना देण्यात आले होते.

चित्त्यांच्या या नव्या अधिवासात कोणती आव्हाने असतील?

नव्या अधिवासातील मुख्य आव्हान म्हणजे पुरेसे खाद्य. गांधीसागरमध्ये चित्त्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पहिली पायरी म्हणजे खाद्य पुरवठा वाढवणे. याचा अर्थ असा की, चित्ते शिकार करू शकतील अशा प्राण्यांची संख्या वाढवणे. नर चित्ता तीन ते पाच जणांचा कळप तयार करतात, तर मादी चित्ता एकाकी जीवन जगतात. सरासरी, प्रत्येक तीन ते चार दिवसांनी चित्त्यांचा कळप एका प्राण्याची शिकार करतो. ‘वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, “अनग्युलेटचा (खूर असलेले मोठे सस्तन प्राणी असतात (हरणांसारखे)) मर्यादित वाढीचा दर १.३३ लक्षात घेता, चित्त्याच्या एका कळपासाठी सुमारे ३५० अनग्युलेटची संख्या आवश्यक आहे.”

“सुमारे १५०० चितळ, १००० काळवीट आणि ३५० चिंकारा गांधीसागरमध्ये स्थलांतरित केले जावेत, जे सात ते आठ चित्त्यांच्या कळपासाठी पुरेसे असेल”, असे ‘वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या मूल्यांकनात सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या वन्यजीव अधिकाऱ्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “चितळ (स्पॉटेड हरीण) आणि गौर (भारतीय बायसन) या शिकारी प्राण्यांना कान्हा, सातपुडा आणि संजय व्याघ्र प्रकल्पातून गांधीसागर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.” अधिकारी आता सुमारे पाच हजार काळवीटांना गांधीसागर येथे स्थलांतरित करण्यावर भर देत आहेत. यातदेखील अनेक अडथळे येत आहेत. चितळ, काळवीट, हरीण यांसारख्या सस्तन प्राण्यांची संख्या नैसर्गिकरित्या वाढली नाही तर शिकारीच्या शोधात चित्ते बाहेर पडू शकतात आणि त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता उद्भवू शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गांधीसागरमध्ये चित्त्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पहिली पायरी म्हणजे खाद्य पुरवठा वाढवणे. (छायाचित्र-पीटीआय)

गांधीसागरमध्ये चित्त्यांना आणखी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?

कुनो प्रमाणेच, गांधीसागरमधील बिबट्याच्या संख्येमुळे चित्त्यांना धोका निर्माण होईल, या दोन्ही शिकारी प्रजाती एकाच शिकारीसाठी स्पर्धा करतील. शिकारीच्या कारणामुळे होणारा संघर्ष चित्त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो. खरं तर बिबट्यांव्यतिरिक्त, अभयारण्यात स्लॉथ अस्वल, पट्टेदार हायना, लांडगे, सोनेरी कोल्हे, जंगली मांजरी, कोल्हे आणि दलदलीतील मगरींसह इतर अनेक सह-भक्षक आहेत. तज्ज्ञांनी संपूर्ण प्रदेशात संरक्षित क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे महामार्ग आणि मानवी वस्ती गांधीसागरमधील संरक्षित क्षेत्राच्या सीमेबाहेर आहेत, ज्यामुळे येथील गावकर्‍यांनी या प्रकल्पाचा विरोधही केला होता.

हेही वाचा : मुस्लीम धर्मियांसाठी हज यात्रेचे महत्त्व काय? या यात्रेत मुस्लीम कोणते विधी करतात?

कालांतराने गांधीसागरचा विकास कसा होईल?

२०२१ च्या अहवालात असे सांगण्यात आले आहे, “संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यात चंबळ नदीच्या पश्चिमेकडील भागाला लक्ष्य केले जावे.” वन्यजीव अधिकाऱ्यांनीदेखील असेच सुचविले की, गांधीसागरमध्ये सुरुवातीला चंबळ नदीच्या बाजूला असणार्‍या नीमच क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. चंबळ नदी अभयारण्याच्या दोन भागांमध्ये वन्यजीवांच्या हालचालींमध्ये अडथळा ठरते. तसेच सध्या, पूर्वेकडील भागात (मंदसौर) अधिक मानवी क्रियाकलाप आहेत. गांधीसागर टाऊनशिप, धरणावरील जलविद्युत प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अभयारण्याच्या पूर्वेला आहेत. जलाशयाच्या काठावर शेती आणि पशुधन आहेत, जलाशयाचा वापर व्यावसायिक मासेमारीसाठी केला जातो. त्यामुळे सध्या चित्त्यांसाठी केवळ पश्चिम भागाला विकसित करण्याचा विचार करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi sagar wildlife sanctuary second home for cheetahs rac