गणेश मतकरी
मराठी साहित्यावर क्ष-किरणांचा मारा झाल्याच्या आधीपासून दोन पिढय़ांमधल्या वाचन-अंतरावर कुत्सित शेरा मारण्याची परंपरा आहे. ‘आदली पिढी पुढल्या पिढीचे वाचत नाही आणि पुढली पिढी आदल्या पिढीच्या साहित्याला बाद ठरविण्यास आसुसलेली असते’ असा दावा-आरोप कित्येक दशकांपासूनचा. ‘लोकरंग’मध्ये ‘आदले – आत्ताचे’ या सदराद्वारे या वर्षभर एका आठवडय़ात बुजुर्ग साहित्यिकांची मांदियाळी अलीकडच्या – ताज्या पुस्तकांवर चर्चा करेल. तर दुसऱ्या आठवडय़ात साहित्यपटलावर सध्या तळपत असलेल्या ताज्या लेखकांची फौज भक्कम वाचनीयता टिकून असलेल्या गेल्या शतकातील ग्रंथांची महत्ता आजच्या संदर्भात स्पष्ट करेल. ग्रंथप्रेमींना नव्या-जुन्यांतून उत्तम वाचनपर्याय सजगपणे निवडता यावा, यासाठी हा उपक्रम..
‘देव चालले’ ही कादंबरी पहिल्यांदा वाचली तेव्हा मी शाळेत होतो. तेव्हा माझं मुख्य वाचन मराठीच होतं आणि सर्व प्रकारचं होतं. अभ्यासात खास रस नसल्यानं वाचनासाठी भरपूर वेळही असायचा. आमच्या घरची पुस्तकं, आजोबांच्या घरची पुस्तकं, दोन वाचनालयांचं सभासदत्व, यामुळे वाचण्यासाठी भरपूर माल उपलब्ध असायचा; आणि नारायण धारपांसारख्या एखाद्या लेखकाचा अपवाद वगळता मी फार फेवरिट्स ठरवले नव्हते. त्यामुळे अनेक लेखकांचं आणि सर्व साहित्य प्रकारातलं लेखन वाचून होत असे. अशाच एके दिवशी दुपारी मी घरातच असलेली दि. बा. मोकाशी यांची ‘देव चालले’ घेतली आणि सलग वाचून काढली. सलग वाचून काढली यात काही आश्चर्य नाही, कारण ती कादंबरी काही फार मोठी नाही. नव्वदच्या आसपास पानांची आहे. शिवाय तेव्हा आजच्यासारख्या डिस्ट्रॅक्शन्स नसत. सतत फोनवर येणारी नोटिफिकेशन्स, सोशल मीडिआचा गदारोळ, दर पंधरा मिनिटाला ब्रेकिंग न्यूजचं पालुपद घेऊन येणारे न्यूज चॅनल्स आणि त्यातून सतत तयार होणारे व्यत्यय, हा प्रकारच नव्हता. पण त्यामुळे वाचन अधिक पोचायचं. आत झिरपायचं.
‘देव चालले’ वाचण्याआधी मी मोकाशींचा ‘चापलूस’ हा कथासंग्रह वाचला होता आणि माझ्या आवडत्या संग्रहांपैकी होता. त्यात भेटलेले मोकाशी वेगळे होते. त्या कथा त्यांच्या सहजसोप्या शैलीत सांगितलेल्या, बऱ्याचशा गमतीदार आणि उत्कंठा वाढवणाऱ्या होत्याच, पण ‘देव चालले’ तशी असावी अशी माझी अपेक्षा नव्हती. थोडेच दिवस आधी बाबांशी बोलताना तिचा उल्लेख आला होता आणि त्यांच्याकडून या कादंबरीचं साधारण स्वरूप माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तिच्या वेगळेपणाबद्दल मनाची तयारी झाली होती.
मोकाशींचं कुठलंच लेखन दुबरेध नाही, खोल आशय असला, तरी तो आपल्याला कळायला अवघड आहे असं होत नाही. कोणत्याही वयाच्या वाचकाशी सहज संवाद घडू शकेल, असं ते आहे. मग त्यांचे विषय कधी गंभीर असोत तर कधी गमतीदार. त्या दिवशी ‘देव चालले’ वाचत असताना मीही त्यांच्या कथनात अडकून गेलो. फार मोठं कथानक नसतानाही, त्या व्यक्तिरेखा आणि ते पळसगावातल्या जीर्ण घरातलं वातावरण माझ्या डोक्यात जाऊन बसलं. मी मोकाशींचं सगळं लेखन वाचलेलं नाही. का, असं काही सांगता येणार नाही, कारण जेवढं वाचलंय तेवढं आवडलेलं आहे. बहुधा दिसेल ते सगळंच वाचण्याच्या नादामुळे एकेक लेखक घेऊन पाठपुरावा करावा असं वाटलं नसावं. ‘चापलूस’, ‘लामणदिवा’, आणखी एक दोन कथासंग्रह, ‘देव चालले’ सारखीच मर्यादित पृष्ठसंख्येची आणि विलक्षण कादंबरी ‘आनंद ओवरी’, असं काही काही वाचून झालं होतं.
काही वर्षांपूर्वी सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘दिठी’ येतोयसं कळलं, तशी माझ्या लक्षात आलं की तो ज्यावर आधारित आहे, ती मोकाशींची कथा, ‘आता आमोद सुनासि आले’ आपण वाचलेली नाहीये, मग ती मिळवली आणि वाचली. ‘देव चालले’ची आमची जुनी प्रत एव्हाना कुठेतरी परागंदा झाली होती. मग तिही मिळवली आणि पुन्हा वाचून काढली. वाचताना लक्षात आलं की, ती बरीचशी आपल्याला जशीच्या तशी आठवते आहे. पण तरीही ती पुन्हा वाचताना त्या दिवसात लक्षात न आलेल्या गोष्टी नव्यानं जाणवायला लागल्या.
‘देव चालले’वर चित्रपट करण्यात आपल्या काही महत्त्वाच्या दिग्दर्शकांना रस असल्याचं मी मध्ये ऐकलं होतं. आता पुन्हा वाचताना त्यामागचं कारण स्पष्ट झालं. ते म्हणजे ही कादंबरी जवळपास सिनेमा असल्यासारखीच आहे. काळात विस्तारानं पसरलेलं कथानक मोकाशींनी इथे दोन दिवसांच्या घटनाक्रमात अतिशय कॉम्पॅक्टरीतीने बसवलेलं आहे. लोकेशन्स म्हणजे प्रामुख्यानं जोशी कुटुंबाचं घर आणि नावाला आसपासच्या काही जागा. गावाकडे जाणारा रस्ता, गावातली काही घरं, वगैरे.. इथल्या व्यक्तिरेखा अचूक ग्राफ असलेल्या आणि ठळक आहेत. लांबी चित्रपटाला सुसंगत. दृश्य डोळय़ासमोर सहज उभी राहणारी- अगदी कॅमेरा अँगल्स, ध्वनी आणि प्रकाशयोजनेसकट. एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी, ती म्हणजे हा सिनेमा कलात्मक धाटणीचा आहे, व्यावसायिक नाही. त्यात ढोबळ नाटय़निर्मिती नाही. हा सिनेमा व्यक्तिरेखांचा आहे, एका विशिष्ट काळाचा आहे, बदलत्या जाणिवांचा आहे, तो रूढार्थाने कथाप्रधान नाही. तरुण वाचकांसाठी मोकाशींनी एक छोटासा रोमॅण्टिक ट्रॅक त्यात ठेवला असला तरीही एकूण कथाविस्तार पाहता, कादंबरीत नायक, नायिका असा प्रकार नाही. इथली सारीच प्रमुख पात्रं साधारणपणे एका वजनाची आहेत, भूमिकाही एका लांबीच्या, पण तरीही ती सारी लक्षात राहण्यासारखी आहेत. कथानक जरी वर्तमानात घडत असलं तरी जागोजागी येणाऱ्या पुढल्यामागल्या संदर्भामधून आपल्याला या पात्रांची पूर्ण ओळख होते. त्यांचं आजवरचं आयुष्य कसं गेलं हे आपल्याला दिसतं. जोश्यांच्या घराण्यातला एक मोठा अध्याय संपत आला असताना या साऱ्या व्यक्तिमत्त्वांनी या विशिष्ट जागी येऊन पोचणं हाच या कथानकाचा गाभा आहे.
कादंबरीच्या शीर्षकात असणारे ‘देव’ हे जोशी घराण्याचे देव आहेत. त्यांचं मुख्य दैवत म्हणजे नरसिंह, ज्याला सारेच नरहरी म्हणतात. हा देवघरात सर्वोच्च स्थानी आहे, पण जोशींचा कोणी पूर्वज आपलं दैवत डोक्यावर घेऊन मजल दरमजल करत पळसगावमध्ये येऊन स्थिरावला. त्यानंतर मधल्या सुमारे तीनशे वर्षांत वेळोवेळी या देवांमध्ये भर पडत गेलेली आहे. मुळात गावातलं मोठं प्रस्थ असलेलं हे कुटुंब, पण अलीकडच्या काळात या घरात वृद्ध काकू वगळता वस्तीला कोणीच नाही. पुढल्या पिढीतली मुलं शहराकडे वळलेली आहेत. काकूला आता वयपरत्वे पूजाअर्चा शक्य होत नसल्यानं नरहरीचा मुक्काम आता सर्वात मोठय़ा मुलाकडे- आबाकडे हलवण्याचं ठरलंय. या देवांच्या प्रयाणाच्या आणि ओघानंच या जुन्या वडिलोपार्जित घरातल्या अखेरच्या कार्याच्या निमित्तानं आबा, रामू, नरु आणि जगू ही चारी भावंडं एकत्र येतात.
एका पर्वाचा अंत असल्यासारखी ही वेळ आहे आणि रचना म्हणून पाहिलं तर एका प्रसंगाचा विस्तार असल्यासारखंच या कथेकडे पाहिलं गेलंय. चारही भाऊ या घराशी, तिथल्या दैवताशी आणि त्यामुळेच एकमेकांशीही बांधले गेले आहेत. या दोन गोष्टी वगळता त्यांच्यात फार काही जवळीक असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. आणि आता दैवत हलल्यावर त्यांच्यातला हा धागाही तुटतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दोन नंबरचा भाऊ रामू आधीच कडवट झालेला आहे. त्याची परिस्थिती तशी बेताची आहे आणि आबाचं नीट बसलेलं बस्तान त्याला पाहवत नाही. इतर तिघं मिळून आपल्याकडे दुर्लक्ष करतायत असं त्याचं मत आहे. लहानपणी त्याचा देवधर्माकडे कल असल्यानं आपल्या वडिलोपार्जित दैवतावर खरं तर आपलाच हक्क आहे, जो आपल्यापासून हिरावून घेतला जातोय असं तो समजतो. नरु आणि जगू, या धाकटय़ा दोघांची लग्न अजून बाकी आहेत आणि त्यांचे जगाकडे पाहाण्याचे दृष्टिकोनही एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. नरु अधिक प्रॅक्टिकल आहे. नीट जम बसेपर्यंत लग्नाबिग्नापासून दूर राहायचं त्यानं ठरवलंय. जगू थोडा रोमॅंटिक आहे. अजून तो थोडा भूतकाळात जगतोय. प्रेमाबिमाच्या कल्पना त्याला अजून मोह पाडतायत. आबाच्या शांती या मेहुणीला त्यानं दिलेला प्रतिसाद, त्याच्या या स्वभावातूनच आलेला आहे. कादंबरीची सुरुवात आणि शेवट जरी रामूवर होत असला, तरी कथानक ही चारी भावंडं आणि त्यांची काकू, या साऱ्यांच्या मन:स्थितीच्या दर्शनातून उलगडत जातं. आपण जसं पुढे वाचत जातो, तशी मुख्य घटनाक्रमाबरोबरच आपल्याला जोशींच्या अनेक पिढय़ांच्या इतिहासाची झलकही दिसते. त्याशिवाय या दर व्यक्तिरेखेच्या आयुष्यातले महत्त्वाचे, त्यांना घडवणारे क्षणही समोर येतात. त्यामुळे प्रत्यक्षात कादंबरीकाल हा दोन दिवसांचा असला तरी आपल्या नजरेला होणारं या कुटुंबाचं दर्शन विस्तृत आणि संपूर्ण राहतं.
इथल्या अनेक प्रसंगांना सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. रामूचं रात्रीच्या अंधारात घरापर्यंत चालत येणं, काकूच्या मनात घर करून राहिलेलं बालपणीचं मारुतीचं देऊळ, नरुच्या आठवणीतले उत्सवाचा हिशेब करत बसलेले आईवडील, शेवटाकडे येणारा लोलकाचा वापर, अशा कितीतरी जागा सांगता येतील. जगूला आठवणारं आपटय़ांच्या नमूबरोबरचं एकतर्फी प्रेमप्रकरण मांडणारा प्रसंग तर अल्प शब्दात मांडलेला असूनही मोठा पल्ला गाठणारा आहे. जवळजवळ स्वतंत्र कथा असल्यासारखा याचा परिणाम आहे. गावात फेरफटका मारणाऱ्या जगूच्या आठवणींबरोबर सुरू होणारा हा प्रसंग त्याला लहानपणी आवडणाऱ्या नमूपर्यंत आपल्याला घेऊन जातो. पुढे तिचं नंतरचं आयुष्य, त्याची वर्तमानात तिच्याबरोबर होणारी भेट, याबद्दल बोलत बोलत अखेर जगूच्या डोळय़ासमोर आत्ताही येत राहिलेल्या त्या बालपणच्या नमूवर येऊन थांबतो. दृश्यात्मकतेच्या अनेक शक्यता, काळाची बदलती गती, वर्तमान आणि भूतकाळ यांची सरमिसळ, निश्चित सुरुवात आणि अंत असलेला हा प्रसंग अगदी लक्षात राहण्यासारखा आहे.
आपल्यातल्या प्रत्येकानं आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली एक गोष्ट ‘देव चालले’च्या केंद्रस्थानी आहे आणि ती म्हणजे स्थितीबदल. काहीतरी संपत जाणं आणि कुठल्यातरी नव्या सुरुवातीचं सूचन होणं- असं अंत आणि आरंभाच्या मधलं काहीसं बेचैन करणारं वातावरण मोकाशींनी या कादंबरीत अचूक पकडलेलं आहे. आजवरच्या आयुष्याबद्दल तयार होणारा संदेह आणि पुढल्या काळाबद्दलची धाकधूक, जे आहे ते तसच रहावं, बदलू नये अशी सुप्त इच्छा; पण तरीही समोर दिसणाऱ्या बदलाची अपरिहार्यता.. या सगळय़ा पार्श्वभूमीवर होणारं मानवी मनाचं समतोल चित्रण म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे. तिच्या तपशिलाची प्रादेशिकता, तिच्या आशयातल्या वैश्विक शक्यतांना अधिकच उठाव देते. ती जुनी होत नाही. आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर आपल्याला नव्याने भेटत राहते.
चित्रपट समीक्षा करता करता गेल्या दशकात साहित्याकडे वळलेले गणेश मतकरी हे समकालीन कथाकारांमधील आघाडीचे नाव. चित्रपट आस्वादावरील पाच पुस्तकांचे लेखन. ‘खिडक्या अर्ध्या उघडय़ा’, ‘(कदाचित) इमॅजिनरी’, ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हे गाजलेले कथासंग्रह.
ganesh.matkari@gmail.com