अल्लू अर्जुन त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ चित्रपटासह मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पुष्पा १’ चित्रपट गाजल्यानंतर ‘पुष्पा २’ चित्रपटाची वाट लोक आतुरतेने बघत होते. आता येत्या ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाची चर्चा रंगली, ती अल्लू अर्जुनच्या एका आगळ्या-वेगळ्या लुकची. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयकॉन स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल्लू अर्जुनने निळ्या रंगाची पट्टू साडी, नाकात नथ, कानातले, बांगड्या, हार आणि लिंबाचा हार घातला असून तो स्त्री वेशभूषा परिधान करून असल्याचे दिसत आहे. अशीच काहीशी वेशभूषा तिरूपतीतील गंगामा जतारा उत्सवातदेखील पुरुषांकडून साकारण्यात येते. यामागील नेमकी कहाणी काय? काय आहे तिरूपतीतील ही प्रथा? त्याविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथेमागील लोककथा काय?

प्राचीन लोककथेनुसार, एका स्थानिक सरदाराने (पलेगडू) गंगामाशी गैरवर्तन केले होते. त्याच्या वर्तनाने नाराज होऊन गंगामा यांनी त्याचा अंत करण्याची शपथ घेतली. आपला जीव वाचविण्यासाठी सरदार पालेगडू लपून बसला. त्याला बाहेर काढण्यासाठी, गंगामा वेगवेगळ्या वेषात आणि काही असामान्य पोशाख परिधान करून त्याचा शोध घेऊ लागल्या. शेवटच्या दिवशी जेव्हा गंगमा स्त्रीच्या आकर्षक रूपातील पोशाख परिधान करून गेल्या, तेव्हा लपून बसलेला सरदार बाहेर आला आणि त्याचा अंत झाला. दुष्ट शासकाच्या निधनाने, संपूर्ण तिरुपती गाव महिलांच्या विनयशीलतेसाठी लढल्यामुळे गंगामाचे आभारी आहे.

‘पुष्पा २’ मधील अल्लू अर्जुनचा लूक तिरुपती गंगामा जतारा उत्सवापासूनच प्रेरित आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : काय आहे ‘Parcel Scam’? कशी केली जाते ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक? बनावट कॉल कसा ओळखाल?

त्यामुळे ‘स्त्रीशक्ती’चे प्रतीक म्हणून त्यांची मूर्ती पूजा केली जाते. याच कथेचा एक भाग म्हणून गंगामा यांचे पुरुष भक्त स्त्रीच्या वेषात त्यांच्या आशीर्वादासाठी अशी वेशभूषा परिधान करतात. परंतु, कालांतराने, प्राचीन प्रथेचे आधुनिकीकरण केले गेले आहे. रेशीम साड्यांच्या जागी आता ड्रेस आणि स्कर्टही परिधान केले जातात. तसेच गॉगल्स, हाय-हिल्सदेखील घातले जातात. उत्सवादरम्यान, मंदिराच्या परिसरात ‘जतारा स्पेशल’ स्टॉल उघडून कलाकार नफा कमावतात.

गंगामा जतारा उत्सव कसा साजरा होतो?

‘पुष्पा २’ मधील अल्लू अर्जुनचा लूक तिरुपती गंगामा जतारा उत्सवापासूनच प्रेरित आहे. हा एक लोकोत्सव आहे, जो दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तिरुपतीमध्ये होतो. या वेळी देशभरातून भाविक तिरुपतीमध्ये गंगामाची प्रार्थना करण्यासाठी येतात. त्यांना भगवान व्यंकटेश्वर बालाजी यांची बहीण मानले जाते आणि हिंदू पौराणिक कथेनुसार या प्रदेशाचे कोणत्याही संकटापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. तैय्याहगुंटा गंगामा मंदिराचे भक्त तिरुपतीमध्ये गंगामा जतारा साजरे करतात. उत्सवादरम्यान, पुजारी उत्सवाची विधी करतात. यानंतर, ढोलवादक उत्सव सुरू झाल्याची घोषणा करण्यासाठी जुन्या शहरात ढोल ताशांचा गजर केला जातो. ढोल वाजवणे हादेखील देवीच्या आगमनाची आणि उत्सवात सामील होण्याचा एक मार्ग असतो. हा उत्सव आठवडाभर चालतो आणि मध्यरात्री चटिम्पूपासून सुरू होतो.

देशभरातून भाविक तिरुपतीमध्ये गंगामाची प्रार्थना करण्यासाठी येतात. त्यांना भगवान व्यंकटेश्वर बालाजी यांची बहीण मानले जाते. (छायाचित्र-ओम शक्ती/फेसबुक)

यानंतर भैरागी वेषम विधी असतो. या दिवशी, भक्त स्वतःला नमम कोमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाने रंगवतात आणि रेला कायापासून तयार करण्यात आलेल्या माळा घालतात. मग ते कडुलिंबाची पाने घेऊन कमरेला बांधतात. देवीची पूजा केल्यानंतर कडुलिंबाची पाने आणि रेला कायाचा हार मंदिरात सोडतात. ही मिरवणूक रोज सुरू असते. दुसऱ्या दिवशी, बंदा वेषम विधी होतो, जेथे भक्त कुंकुम लावतात. यानंतर, भक्त थोटी वेषमचे अनुसरण करतात; ज्यामध्ये त्यांचे शरीर कोळशाने झाकणे आणि कडुनिंबाचा हार घालणे समाविष्ट असते.

त्यानंतर डोरा वेषम विधी होतो. त्यात भक्त कडुनिंबाची पाने आणि लिंबू यांच्या हारांसह चंदनाचा लेप लावतात. दुसऱ्या दिवशी माथंगी वेषमची सुरुवात होते आणि ही विधी गंगामाचे प्रतीक आहे, जो सरदाराच्या पत्नीचे सांत्वन म्हणून केला जातो. त्यानंतर सुन्नपु कुंडलू विधी होतो. भक्त कोळशाचे ठिपके असलेला पांढऱ्या रंगाचा लेप लावतात आणि मंदिराभोवती भांडे घेऊन जातात. उत्सवाची सांगता गंगमा जताराने होते. या दिवशी गंगामा मंदिरात भाविक साडी परिधान करतात.

हेही वाचा : कर्करोगापासून मानसिक आजारावर प्रभावी ठरणारी जळू उपचार पद्धती आहे तरी काय? याचे महत्त्व काय?

मध्यरात्री, मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि उत्सवाच्या समाप्तीसाठी चेम्पा थोलगिंपू नावाचा प्रतीकात्मक विधी केला जातो. चिकणमाती उपासकांना वितरीत केली जाते. पालेगोंडुलुचा वध करणाऱ्या गंगामाच्या शौर्य कृत्याची स्तुती करण्यासाठी, तसेच सरदाराच्या स्त्रियांच्या विनयभंगाच्या राक्षसी स्वभावासाठी त्याला शिक्षा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे देवीला नमन करण्यासाठी स्त्रीचा पेहराव करणे हे स्त्रीत्वाचा सन्मान मानले जाते. अल्लू अर्जुननेदेखील तोच पोशाख आपल्या आगामी चित्रपटात परिधान केला आहे; ज्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangaama jatara that inspired the most talked scene in allu arjun pushpa 2 rac