उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारांची हत्या होण्याचे प्रकार वाढत आहेत. अतिक अहमद आणि त्याच्या भावाची पोलिसांसमोरच हत्या झाली, अतिक अहमदच्या मुलाचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आता लखनऊच्या न्यायालयातच गँगस्टर आणि पुढारी असलेल्या मुख्तार अन्सारी याचा हस्तक संजीव महेश्वरी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर वकिलाच्या कपड्यांमध्ये न्यायालयात आला आणि त्याने गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराला त्यांनी ताब्यात घेतले आहे. महेश्वरीला सुनावणीसाठी न्यायालयात आणल्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक महिलादेखील गंभीर जखमी झाली. भर न्यायालयात ज्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, तो महेश्वरी कोण आहे? त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? याबाबत घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४८ वर्षीय महेश्वरीवर अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ब्रह्म दत्त द्विवेदी आणि क्रिष्णानंद राय या दोन भाजपा नेत्यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. १९९७ साली द्विवेदी यांच्या खूनात महेश्वरी याला दोषी मानन्यात आले आहे तर, २००५ साली राय याच्या खूनप्रकरणातून त्याची मुक्तता झालेली आहे. ब्रह्म दत्त द्विवेदी यांची ओळख म्हणजे १९९५ साली बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना गेस्ट हाऊस कांडमधून वाचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मायावती आपल्या आमदारांसह गेस्ट हाऊसवर थांबल्या असताना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

हे वाचा >> Atiq Ahmed Murder : एखाद्या हिंदी वेब सीरिजप्रमाणे अतिक अहमदचे आयुष्य होते; नेहरूंच्या मतदारसंघातून झाला होता खासदार

संजीव महेश्वरी जीवा कोण होता?

मुळचा मुझफ्फरनगरचा असलेल्या संजीव महेश्वरीने २०१७ साली याठिकाणाहून राष्ट्रीय लोक दलाच्या तिकीटावर निवडणूकही लढविली होती. पण त्याचा निवडणुकीत पराभव झाला. महेश्वरीच्या पत्नीचे नाव पायल असून त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजीव महेश्वरी २४ प्रकरणात गुन्हेगार होता. त्यापैकी १७ गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महेश्वरीवर खून, अपहरण, खंडणी उकळणे, दरोडा टाकणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे मुझफ्फरनगर, शामली, हरिद्वार आणि फरुखाबाद याठिकाणी दाखल आहेत. गुन्हेगारी विश्वात येण्याआधी संजीव महेश्वरी एक सामान्य जीवन जगत होता. मुझफ्फरनगर येथे एका डॉक्टरकडे तो कम्पाऊंडर म्हणून काम करत होता.

लखनऊच्या न्यायालयात काय झाले?

बुधवारी लखनऊच्या न्यायालयात विजय यादव नावाचा मारेकरी हा वकिलाच्या वेषात आला होता. महेश्वरीवर गोळ्या झाडल्यानंतर विजय यादवला इतर वकिलांनी पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजय यादवला गंभीर जखम झाली आहे. महेश्वरीला गोळ्या झाडत असताना एक महिला आणि पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान भर न्यायालयात गोळीबार झाल्यामुळे संतप्त वकिलांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा बोलवावा लागला.

क्रिष्णानंद राय खून प्रकरणात निर्दोष मुक्तता

दिल्ली न्यायालयाने २०१९ साली संजीव महेश्वरी याच्यासह सहआरोपी मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ अफजल अन्सारी यांना भाजपा आमदार क्रिष्णानंद राय आणि इतर सहा लोकांच्या हत्येप्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यातील सर्व प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाचे साक्षीदार विरोधात गेल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

राय हे मोहम्मदाबाद मतदारसंघाचे आमदार होते, त्यांनी अफजल अन्सारी याचा २००२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. २९ नोव्हेंबर २००५ साली आमदार राय आणि त्यांच्यासह सहा लोकांची हत्या करण्यात आली. राय यांच्या वाहनावर काही हल्लेखोरांनी स्वयंचलित आणि इतर शस्त्रांच्या माध्यमातून अंदाधुंद गोळीबार केला.

ब्रह्म दत्त द्विवेदीच्या खून प्रकरणात दोषी

फारूखाबाद येथील भाजपाचे आमदार ब्रह्म दत्त द्विवेदी यांची १० फेब्रुवारी १९९७ रोजी हत्या करण्यात आली. द्विवेदी यांचा मुलगा सुनील दत्त यांनी २०१७ रोजी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ब्रह्म दत्त द्विवेदी फारूखाबाद जिल्ह्यातील कोतवाली परिसरात एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमस्थळावरून निघाल्यानंतर ते आपल्या गाडीत बसले असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. द्विवेदी यांचे बंदुकधारी अंगरक्षक बिके तिवारीदेखील मारले गेले, तर चालक रिंकू गंभीर जखमी झाला.

हे वाचा >> “तुम्हाला रस्त्यावर गोळीबार हवाय की प्रार्थना…”, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी योगींकडून भावनिक साद

१७ जुलै २००३ साली, लखनऊमधील सीबीआयच्या न्यायालयाने संजीव महेश्वरी आणि समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजय सिंह यांना दत्त यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांनीही या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. २०१७ साली लखनऊ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

भाजपाचे आमदार असलेल्या ब्रह्म दत्त द्विवेदी यांनी मायावती यांना गेस्ट हाऊस कांडमधून वाचविण्यात मोलाची मदत केली होती. २ जून १९९५ रोजी मायावती यांनी बसपा-सपा आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी १९९३ पासून दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत होते. मात्र आघाडीतून बाहेर पडल्यामुळे समाजवादी पक्षाला सत्तेपासून दूर जावे लागणार होते. याचाच राग धरून समाजवादी पक्षाकडून सदर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.

भाजपाचे एक वरिष्ठ नेते राजेंद्र तिवारी यांनी या घटनेबाबत द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ज्या गेस्ट हाऊसमध्ये मायावती आपल्या आमदारांसह थांबल्या होत्या, तिथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. मायावती तळमजल्यावरील खोली क्र. १ मध्ये थांबल्या होत्या. त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी भाजपा आमदार ब्रह्म दत्त द्विवेदी यांनी मायावतींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच त्यांनी या घटनेची माहिती अटल बिहारी वाजपेयी यांना दिली. भाजपाने मायावती यांना राज्यपालांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आणि त्यांना आमदारांचा पाठिंबा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मायावती यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.